कुणी पायाने, कुणी हाताने, तर कुणी डोळय़ाने अपंग, काहींना पोलिओमुळे अधूपण.. पण या साऱ्या अपंगत्वावर मात करत जिद्दीच्या जोरावरच ‘त्यांनी’ सलग दुसऱ्या वर्षी एक नवी मोहीम पूर्ण केली. ही शौर्यगाथा आहे ‘प्रहार’ संस्थेच्या १२ अपंग गिर्यारोहकांची.
भटकंतीची खूप इच्छा असतानाही केवळ अपंगत्वाअभावी ज्यांना अशा छंदात भाग घेता येत नाही, अशा गिर्यारोहकांच्या मदतीसाठी ‘प्रहार’ संस्थेतर्फे या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या पूर्वी या उपक्रमाअंतर्गत या विशेष गिर्यारोहकांनी महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर कळसुबाईवर स्वारी केली होती. या भटकंतीमध्ये अपंगांच्या मदतीसाठी स्वयंसेवकही असतात. यामध्ये सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क घेतले जात नाही. यंदा ही मोहीम ६ सप्टेंबर रोजी शिवनेरी गडावर गेली होती.
यंदाच्या या मोहिमेत शिवाजी गाडे, धर्मेद्र सातव, सुरेखा ढवले, शशिकांत सूर्यवंशी, रेवननाथ कर्डीले, विकास उगले, दीपक चव्हाण, वनिता जाधव, भास्कर मनसुख, दिनेश वाघ, दिलावर पठान, योगेश उगले आदी अपंगांनी भाग घेतला होता. या सर्व गिर्यारोहकांनी मदतनिसांची मदत घेत गडावर चढाई केली. वर पोहोचल्यावर या सर्वानी गडावर फेरफटका मारला. या वेळी गडाचा इतिहास-भूगोल समजून घेतानाच या परिसरात साचलेला कचराही त्यांनी गोळा केला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वानीच कौतुक केले.
ट्रेकिंग, गिर्यारोहण असे शब्द म्हटले, की अगदी सुरुवातीला धडधाकट शरीरे डोळय़ांपुढे येतात. डोंगरदऱ्यांमधून खडतर आव्हानांचा सामना करत धावणाऱ्या या विश्वामध्ये हे तितकेच खरेही आहे. पण या निसर्गनियमाला अपवाद अशी काही कणखर मनेही असतात. अशाच काही गिर्यारोहकांनी जिद्दीच्या जोरावर शिवनेरीवर पुढचे पाऊल टाकले होते.