महाराष्ट्रातील गिर्यारोहकांची मांदियाळी असलेल्या गिरिमित्र संमेलनासाठी यंदा ‘सह्याद्री आणि वनखात्याचे योगदान’ ही मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. येत्या १३ व १४ जुल रोजी महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड येथे हे संमेलन भरत आहे. संमेलनाचे हे १३ वे वर्ष आहे.
भटक्यांचे डोंगराशी आणि पर्यायाने तेथील जंगलाशी अनोखे नाते तयार झालेले असते. त्यामुळेच वनखाते आणि डोंगरभटके यांचा एकमेकांशी समन्वय व्हावा, त्यातून डोंगरभटक्यांचा वनखात्याच्या उपक्रमात सहभाग वाढावा आणि वनखाते गिरिमित्रांच्या विश्वाशी जोडले जावे या उद्देशाने यंदाच्या विषयाची निवड केली आहे. चर्चासत्रे, सादरीकरण या माध्यमातून हा विषय मांडला जाणार आहे. याशिवाय पुण्यातील गिरिप्रेमी संस्थेची मकालू आणि कोलकात्याचे बसंत सिंघा रॉय यांच्या ‘अन्नपूर्णा १’ या मोहिमांचे सादरीकरण संमेलनात होणार आहे. या सर्व मोहीमवीरांचा संमेलनात विशेष सत्कार होणार असून या मोहिमेतील थरारक क्षणही त्यांच्याकडूनच ऐकता येतील. याशिवाय गिरिमित्र सन्मान प्रदान सोहळा, विविध मोहिमांचे सादरीकरण व परिसंवाद होणार आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने छायाचित्र, गिर्यारोहण माहितीपट, ट्रेकर्स ब्लॉग, प्रश्नमंजूषा अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गेल्या वर्षभरातील गिर्यारोहण क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर आधारित गिर्यारोहण वार्तापत्रही प्रकाशित केले जाणार आहे.
यंदाच्या या संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी ‘शैलभ्रमर’ या संस्थेला देण्यात आली आहे. महाराष्ट्र सेवा संघ मुलुंड, लागू बंधू मोतीवाले दादर या दोन ठिकाणी संमेलन प्रवेश पत्रिका उपलब्ध आहेत. संमेलनास प्रवेश मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील. संमेलनाचे
विस्तृत माहितीपत्रक व सर्व स्पर्धाच्या माहितीसाठी http://www.girimitra.org या संकेतस्थळास भेट द्यावी अथवा ०२२-२५६८१६३१ या क्रमांकावर अथवाgirimitra. sammelan@gmail.com वर संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर,
पुणे – ४११००५. Email-abhijit.belhekar @expressindia.com