29 February 2020

News Flash

स्वर्गारोहिणी

हिमालय हा सौंदर्याची खाणच आहे. इथल्या कुठल्याही वाटेवर चालू लागलो, की निसर्गाचे भांडार खुणावू लागते. उत्तराखंडमधील स्वर्गारोहिणी ते सतोपंथ भटकंतीही अशीच सौंदर्य, साहस आणि अध्यात्माच्या

| June 4, 2015 07:17 am

हिमालय हा सौंदर्याची खाणच आहे. इथल्या कुठल्याही वाटेवर चालू लागलो, की निसर्गाचे भांडार खुणावू लागते. उत्तराखंडमधील स्वर्गारोहिणी ते सतोपंथ भटकंतीही अशीच सौंदर्य, साहस आणि अध्यात्माच्या वाटेवर घेऊन जाणारी. हिमालयाचे परिपूर्ण दर्शन या ट्रेकमध्ये घडते.
बद्रीनाथ मंदिराच्या मागून अलकनंदा नदीच्या किनाऱ्याने स्वर्गारोहिणी सतोपंथचा ट्रेक सुरू होतो. बद्रीनाथचा परिसर उत्तराखंड राज्यामध्ये हिमालयातील चमोली गढवाल परिसरामध्ये आहे. बदरीनाथ ते सतोपंथ स्वर्गारोहिणी हा परिसर अत्यंत अद्भुत अशा निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हिमालयाची भव्यता तेथील हिमशिखरे, हिमनद्या आणि तलाव यांनी स्वर्गारोहिणीला जणू स्वर्गासारखेच बनविले आहे. हिमनद्या, हिरवाई, गुहा, पहाड, नद्यांचे संगम, धबधबे, वने असे हिमालयातील सर्व प्रकारचे आविष्कार स्वर्गारोहिणीच्या परिक्रमेमध्ये अनुभवायला मिळतात.
सतोपंथ हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १५,१०० फूट उंचीवर असून स्वर्गारोहिणी १८,००० फुटांहून अधिक उंचीवर आहे. विश्वातील सर्वात उंच ठिकाणी असणाऱ्या सरोवरांपकी सतोपंथ हे एक अप्रतिम सरोवर आहे. याचा आकार त्रिकोणी असून तीन कोनांवर जणू ब्रह्मा, विष्णू आणि शंकर वास्तव्य करून आहेत अशी त्याची रचना आहे. पौर्णिमा आणि इतर शुभ दिवशी ही त्रिमूर्ती येथे येऊन स्नान करते अशी श्रद्धा आहे.
बद्रीनाथपासून स्वर्गारोहिणीच्या ट्रेकच्या वाटेवर माणागाव, लक्ष्मीवन, बेंस ऑफ नीळकंठ, सहस्रधारा, वसुधारा, चक्रतीर्थ, सतोपंथ इत्यादी ठिकाणे लागतात. ही ठिकाणे म्हणजे जेथे पाच पांडव आणि द्रौपदी यांनी आपले प्राण सोडले ती. माणागावाजवळ द्रौपदीने देह सोडला. सहस्रधारा येथे सहदेवाने, लक्ष्मीवन येथे नकुलाने, चक्रतीर्थ येथे अर्जुनाने आणि सतोपंथ येथे भीमाने देह सोडला. युधिष्ठिर पुढे चालत होता आणि शेवटी स्वर्गारोहिणीवरून यमराज त्याला सदेह स्वर्गाला घेऊन गेले अशी ही कथा आहे. बद्रीनाथ पासून ८ कि.मी. अंतरावर १२,००० फूट उंचीवर वसुधारा धबधबा आहे. वसुधारेच्या पुढे अलकापुरी हिमनदी आहे. या ठिकाणी यक्षांचा निवास आहे असे म्हटले जाते. सतोपंथ सरोवरापुढे सोमकुंड आणि विष्णूकुंड आहे. त्या जवळ रामगुहा नावाची एक गुहा आहे. याच परिसरामध्ये चौखंबा शिखर असून येथे नर आणि नारायण पर्वतांचे मिलन होते. यापुढे स्वर्गारोहिणी पर्वत शिखर आहे. या पर्वतशिखरावर बर्फाच्छादित पायऱ्या सारखा मार्ग दिसतो. या ठिकाणी रावणाने पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारा पूल बांधायचा प्रयत्न केला होता, अशी कथा सांगितली जाते. सतोपंथ आणि स्वर्गारोहिणी परिसरामध्येच कोठेतरी गौरीशंकर या ठिकाणी महावतार बाबाजींचा आश्रम आहे, अशी श्रद्धा आहे. ‘योग्याची आत्मकथा’ या परमहंस योगानंद लिखित पुस्तकामध्ये आणि ‘दिव्य स्पर्श’ या राम भोसले यांच्या चरित्रामध्ये महावतार बाबाजींचे उल्लेख सापडतात.
स्वर्गारोहिणी ट्रेकच्या मार्गावर नर आणि नारायण पर्वत, नीळकंठ पर्वत, बाळकुम पर्वत लागतात. रस्त्याने जाताना कुबेर पर्वत, चौखंबा पर्वत आणि स्वर्गारोहिणी पर्वत आदी हिमशिखरांचे दर्शन होते. या ट्रेकमध्ये सतोपंथ, अलकापुरी, धनो आणि कुबेर आदी हिमनद्या लागतात. अलकनंदा, सरस्वती या नद्यांचे दर्शन होते. सहस्रधारा आणि वसुधारा हे धबधबे लागतात. स्वर्गारोहिणी पर्वत भागीरथी आणि यमुना या दोन नद्यांना वेगळे करतो. या मार्गामध्ये कुठेही कसलीही सोय नसून मार्गावर तंबू रोवून मुक्काम ठोकावे लागतात. एका वेळी जास्तीत जास्त ३० जणांच्या गटाला या परिक्रमेमध्ये सहभागी होता येते. स्वर्गारोहिणी परिक्रमा करायच्या आधी परवानगी आणि ओळखपत्र घ्यावे लागते. सोबत पंधरा ते वीस भारतीय शेर्पा घ्यावे लागतात. त्यांना या परिसराची खडान् खडा माहिती असते आणि गाठीशी अनुभवही असतो. त्यांच्या साहाय्याने आणि मार्गदर्शनाखालीच ही परिक्रमा पूर्ण करता येते. जुल आणि ऑगस्ट हा या परिक्रमेसाठी चांगला काळ. या महिन्यामध्ये ही परिक्रमा सुरक्षितपणे करता येते. या ट्रेकसाठी ऋषीकेशवरून पुढे रस्ता मार्गाने बद्रीनाथला जावे लागते. ऋषीकेश हे शहर रेल्वे आणि बसने जोडलेले आहे. जवळचे विमानतळ डेहराडून हे आहे.
कैलास मानसरोवर यात्रेला किमान २१ दिवस ते एक महिना इतका कालावधी लागतो. खर्चही लाख दीड लाखांहून अधिक येतो. मात्र स्वर्गारोहिणीचे वैशिष्टय़ हे, की कैलास मानसरोवरच्या यात्रेइतकाच किंबहुना त्याहूनही जास्त सृष्टिसौंदर्य आणि अद्भुत अनुभूती देणारा ट्रेक केवळ ७ दिवसांमध्ये पूर्ण करता येतो. शिवाय कैलास मानसरोवरच्या एक तृतीयांश खर्चामध्ये स्वर्गारोहिणी परिक्रमा करता येते. स्वर्गारोहिणी परिक्रमा श्रद्धेची, विश्वासाची आणि शारीरिक क्षमतांची कसोटी पाहणारी परिक्रमा आहे. अतिशय उंचीवरची ही परिक्रमा असून येथील हवामान सतत बदलत असते. हिमालयाचे आकर्षण प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेच. त्यातही श्रद्धावान, धार्मिक आणि भक्त मंडळींना ते अधिक आहे. पर्यटन, ट्रेकिंग, जैवविविधता, पर्यावरणाचा अभ्यास, औषधी वनस्पती इ. अनेक कारणांनी सर्वाना हिमालयामध्ये परिक्रमा करावी असे वाटते. या साऱ्यांसाठी स्वर्गारोहिणीची ही वाट सौंदर्याने नटलेली आहे.

 

First Published on June 4, 2015 7:17 am

Web Title: swargarohini and satopanth trek in himalaya
Next Stories
1 ‘गिरिप्रेमी’चे ‘आव्हान’!
2 ट्रेक डायरी : ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’
3 ‘एव्हरेस्ट’चे भारतीय यश
X
Just Now!
X