News Flash

तोरण्याचे रुदन!

गडकोटांवर नित्य भटकणाऱ्यांना तिथे ढासळणाऱ्या एखाद्या चिऱ्यानेही तीव्र ओरखडे उमटत असतात

तोरणगड

गडकोटांवर नित्य भटकणाऱ्यांना तिथे ढासळणाऱ्या एखाद्या चिऱ्यानेही तीव्र ओरखडे उमटत असतात. दुसरीकडे कुठे त्याच्या दुरुस्तीचे काम चालू असेल तर तोही त्यांच्या कुतूहलाचा विषय असतो. तोरणगडावरील याच पडझड आणि दुरुस्तीचा एका भटक्याने घेतलेला हा वेध!
अवघ्या सह्याद्रीत नुकतीच नवरात्र साजरी झाली. गडकोटांवरील देवतांचे नशीब थोर, की नऊमाळा चढवायला गावातली पोरंटोरं ‘व्हाट्स अप’मधून बाहेर येऊन मोठा थोरला चढाव चढून देवळापर्यंत आली होती. तोरण्यावरच्या मेंगाईदेवीलासुद्धा अशाच माळा चढल्या होत्या. दसरा झाल्यावर आम्हीही तिथवर पोहोचलो. दोन दिवस तोरण्यावर राहिलो व रविवारी सकाळी माघारी निघालो. निघायला तसा उशीरच झाला. तसा तो होतोच! कोणत्याही गडावरून पाय निघता निघत नाही. त्यात राजगडासारखीच इथेही भागाबाई ढेबे नावाची मावशी होतीच. दोन दिवस तिने ताकभात खाऊ घातला होता. अर्थात पसे घेऊनच. काय करणार? लांबवरच्या मढेघाटाजवळच्या एका खेडय़ातून ती दर शनिवार-रविवार तोरण्यावर येते ती ताक-दही विकायला.
खांद्यावर सॅकचे ओझे लादले, तोरणाईला नमस्कार केला व कोठी दरवाजाबाहेर पाऊल टाकले. समोरच दरवाजाच्या चिऱ्याचे दोन दगड पडले होते. तसे ते आपोआप वा वाऱ्याने तर पडलेले नव्हते. कुणीतरी ढकलल्याशिवाय ते तरी कसे पडतील? तटावर मावशी ‘पर्यटकांची’ वाट पाहात बसली होती. तटबंदीचे चिरे निसटले जातात वा ढकलले तरी जातात, तटबंदीवर माजणाऱ्या रानटी झुडपांमुळे तटाबुरुजांची शक्ती कमी होत जाते मग केव्हातरी त्या ढासळतात. त्याचे तिला सोयरसुतक अजिबात नव्हते. तसे ते कुणालाच नसते. स्वच्छ शुभ्र खमिस-सुरवार लेवून, भाळी नाम ओढून दरवर्षी गावातल्या शिवपुतळय़ाला हार घातला व जयजयकार केला, की सगळय़ांचीच जबाबदारी संपते.
तोरण्याचा कातळकडय़ातला तीव्र उतार उतरताना मनी काहूर उठले होते. कैक वर्षांनी घडलेली ही फेरी तशी उदासवाणीच झाली होती. गडावर आलो तर नेहमी स्वच्छ सुंदर दर्शन देणाऱ्या किल्ले राजगडाने आपला चेहरा धुकटाआड झाकून घेतला होता. उगवती पल्याडचे सूर्यदेवही दर्शन देण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मेंगाईच्या घुमटीला तटबंदीने मढवले होते. महादेवाचे राऊळही चौथरा तटबंदीने सजवले होते. मूळ राऊळासही अशी ही तटबंदी नसावी. आयताकार कोतीव कातळचिरे न रचता देवळांची तटबंदी रचली होती. असे वाटले, फार पूर्वी शिवकालातही हेच काम नीटसे झाले असते.
सदरेजवळ तात्पुरता ‘रोप वे’ लावलेला होता, त्याने वरती गडावर येत होती दगडांची रास! सभोवताली नजर फिरली. मावळतीच्या कोकण दरवाजाच्या डोई आधुनिक ‘सिमेंट काँक्रीट’ची मलमपट्टी दिसली. अच्छा! असे आहे तर, दुर्गसंवर्धनाचे काम चालू आहे तर, वा वा चांगले आहे. शासनाचा पुरातत्त्व विभाग एका कंत्राटदारामार्फत हे बांधकाम सध्या करून घेत आहे. अर्थातच उत्सुकता वाढली. ‘संवर्धना’चे काम प्रत्यक्ष पाहायला मिळणार होते तर. त्यात पुरातत्त्व विभागाचे काम म्हणजे शास्त्रीय पद्धतीनेच व जसे होते तसेच मूळ स्वरूप जतन करून केलेले काम पाहायला मिळणार!
आम्ही सुरुवातीला झुंजारमल अथवा झुंजारमाचीकडे वळालो. वाटेत उद्ध्वस्त सदरेचे अवशेष दिसले. नुसतेच जोते शिल्लक राहिले होते. गडाच्या पूर्वेकडील बुरुजावर गेले, की खालच्या पातळीवर अवकाशात घुसणारी झुंजारमाची दिसते. अप्रतिम स्थापत्यशास्त्राचा नमुना. ज्याने कुणी या माचीला ‘झुंजार’ हे नाव दिले त्याला मानायला हवे! या माचीच्या जबरदस्त रचनेला अत्यंत समर्पक असे हे नाव. कोणीही शत्रू या माचीचा नाद धरणार नाही. अग्निबाणासारखे आसमंतात घुसणाऱ्या या माचीने उदासपण घालवले व अंगावर रोमांच आणले. सतत पाहात राहावे असे सौंदर्य! छातीत धडकी भरावी अशी करारी रचना व आधार वाटावा असे रांगडेपणा! वा! जबरदस्त! ही माची पाहण्यासाठी तरी प्रत्येकाने या तोरण्यावर यावे. तटबंदीलगत वळसा घालून परत देवळात आलो. या बालेकिल्ल्यावर बरेच दुर्लक्षित व उद्ध्वस्त अवशेष दिसत होते. हवालदार, सरनोबत, सरनाईक यांच्या घरटय़ांची जोती होती. ती पाहात देवळात परत आलो.
दुपारी जेवताना भागाबाई व तुकारामबुवांची सोबत होती. बांधकामाचा विषय निघाला. भागाबाई म्हणाल्या, ‘‘आवो, गेल्या वर्षी निम्मा दरवाजा ढासळला. आता त्यो बांधायला घेतलाय.’’ अच्छा म्हणजे असे आहे तर! म्हणजे पुरातन वारशाचे नुकसान होऊ नये म्हणून जतनाची क्रिया नव्हती तर नुकसान झाल्यानंतर दुरुस्तीची ही प्रतिक्रिया होती. त्यांच्या गप्पाटप्पात दुपार कलंडली व आम्ही मावळतीच्या दिशेने बुधला माचीकडे चालू लागलो.
देवळापासून हाकेच्या अंतरावरच कोकण दरवाजा आहे. या दरवाजाच्या आसपास छोटय़ा छोटय़ा दगडांच्या राशी दिसल्या. या दरवाजावरचा भाग एखाद्या नाल्याच्या भिंतीसारखा बांधून काढला होता. खरेतर अशा मुख्य दरवाजाचा वरचा मुकुट अगदी मुकुटासारखा सजवलेला असतो वा नीटस तरी असतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे अजूनही बऱ्यापकी शाबूत असलेला राजगडाचा महादरवाजा. आम्ही दरवाजातून बुधल्याकडे निघालो. सहज पाठी वळून पाहिले. दरवाजाचा डावीकडील बुरूज पूर्ण ढासळला होता. त्या ढासळलेल्या बुरुजाच्या बांधकामाचे काम पुरातत्त्व विभागाने काढले होते. त्या बुरुजाचे मोठाले कातीव कातळखंड इतस्तत: पसरले होते व त्या जागी छोटय़ा छोटय़ा दगडांनी सिमेंट काँक्रीटचा वापर करून भिंत बांधून काढली होती. आधुनिक बांधकामाचे छोटे छोटे चिरे, तर शेजारीच शिवकालीन मोठाले चिरे. तिथल्या कामगारांना विचारले,
‘‘शिवकालातले ते मोठय़ा चिऱ्याचे व्यवस्थित बांधकाम व तुमचे हे छोटय़ा दगडातले बांधकाम, तेसुद्धा मूळ ढाच्याला शोभेल असे नाही.’’
‘‘आवो, ती पूर्वीची ताकदवार मान्स, आमी खातो ते खताचं धान, कसा दगुड उचलायचा?’’
मी चर्चा सोडून दिली, पण मनात गोंधळ साचूनच राहिला. सद्य:स्थितीत असलेली दुर्गरचना ढासळते हा आपल्या सर्वाचाच निष्काळजीपणा झाला. अवकाशाला गवसणी घालायचे तंत्र एकीकडे मिळवत असताना दुसरीकडे पुरातन वास्तूचे जतन करू शकत नाही आणि ती उभारताना मूळ वास्तूला साजेशी उभारणी करू शकत नाही हा विरोधाभास असावा. पसा, मानवी श्रम व तंत्राबाबत आधुनिक असलेला आमचा भारत या बाबतीत शिवकालापेक्षा निश्चितच मागासलेला वाटला. नाहीतर हे असे डोळय़ात खुपेल असे बांधकाम कसे झाले असते. का या पुढे अशाच प्रकारच्या बांधकामाचे ‘मानद’ नक्की करायचे? पुरातत्त्व शास्त्र नक्की काय म्हणते? नुकतीच ‘गडकिल्ले संवर्धन समिती’ शासनातर्फे स्थापन केली गेली आहे. यामध्ये देशी तज्ज्ञ मंडळीही भरपूर आहेत. मग त्यांच्या मार्गदर्शनानंतरही अशी बांधकामे कशी सुरू आहेत.
मुळात जतन वा संवर्धनाच्या प्रक्रियेत पुरातन वास्तूचा विनाश होऊ नये म्हणूनच प्रयत्न हवेत. ती मूळ वास्तू जगवण्यासाठीचे प्रयत्न हवेत. पण आपल्याकडे आधी ती पडू दिली जाते आणि मग उरलीसुरली उतरवून नवी ‘सिमेंट काँक्रीट’ची चढवली जाते. सगळेच दु:खद!
गड उतरत असताना, मन भिरभिरले होते. एका तरुण मुलांच्या घोळक्याने वाट अडवली. त्यातल्या एकाने विचारले, Anything worth there to see? या प्रश्नाला त्या क्षणीतरी माझ्याकडे उत्तर नव्हते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2015 4:17 am

Web Title: torna fort trekking
Next Stories
1 कुलाबा दीपोत्सव
2 ट्रेक डायरी
3 जुन्नरची पर्यटनवाट
Just Now!
X