अक्षरभ्रमंती
वर्षअखेर! ३१ डिसेंबरची ती संध्याकाळ, कण्हेरगडाच्या तटावर बसलो होतो. मावळत्या सूर्याला पाहता-पाहता सहज मनात विचार येऊन गेला, तो वर्षभराच्या भटकंतीचा. किती ट्रेक झाले, किती नवे दुर्ग पाहिले, कुठल्या मोहिमा पार पाडल्या.. आणि क्षणात भटकंतीचा एक मोठा आलेखच चमकून गेला. मग लगोलग नवा विचार, नव्या दिशा, नव्या मोहिमांही आकार घेऊ लागल्या.. आणि मावळतीच्या त्या सूर्याला साक्षी ठेवत भटकंतीची दिनदर्शिका तयार झाली.
दरवर्षी ३१ डिसेंबर हा दिवस उजाडला, की प्रत्येक जण सरत्या वर्षांची आठवण काढत आपल्या कामाचा, उद्दिष्टांचा आढावा घेत असतो. आम्हा भटक्यांचेही असेच असते. आम्ही कुठलेही नवे वर्ष सुरू झाले, की या वर्षी हा किल्ला, ही मोहीम, तो सुळका, हा कडा अशी स्वप्ने गाठी बांधू लागतो. मग ऋतू -हंगामानुसार आपल्या, मित्रांच्या सुटय़ांनुसार त्याचे नियोजन होते. दिनदर्शिकेचे तारखांचे रकाने आणि भटकंतीचे मनोरे भरले जातात. ..जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कुठे नाशिकची ती सातमाळ रांग, बागलाणातील किल्ले, थोडे उन वाढू लागले, की सह्याद्रीच्या ऐन गाभ्यातील सावली देत फिरणारी जंगलातील भटकंती, मध्येच कुठे वासोटय़ाच्या परिसरात, शिवसागराच्या तीरावरून फिरणे; रसाळ, सुमार, प्रचित, प्रताप, भैरव गडाची मोहीम..असे बरेच काही आकार घेत जाते.
पावसाळी भटकंतीसाठी फुलांची पठारे, राजगड-रायरेश्वरचे ट्रेक, धबधब्यांच्या आडवाटा, घाटवाटांवरचे फिरणे, असे मोठे नियोजन होते. हिवाळय़ात तर या भटकंतीला नाना धुमारे फुलतात. गडकोट, गिरिशिखरे, दऱ्याखोऱ्यांमधून फिरणारी मोठी भटकंती या साऱ्यांत हा हंगाम भरून जातो.
वर्षांच्या सुरुवातीला नियोजन होते. आमचे भटक्यांचे हे कॅलेंडर बनते आणि मग पाहता-पाहता या कॅलेंडरवरील एकेक दिवस, एकेक पान आणि त्याबरोबर भटकंतीची एकेक वाट पुढे सरकू लागते. भटकंतीची शिदोरी गाठीला जमू लागते.
इथे चालणारी पावले आणि भटकणारी मने मग कुठे-कुठे एकमेकांना भेटत राहतात. एकमेकांना पुसतात, ‘अरे तुझा लिंगाणा झाला कां?’, ‘तू ढाकचा बहिरी केलास कां?’, ‘धोडपला एकदा जाऊन ये.’, ‘बोराटय़ाची नाळ खतरनाक आहे.’ ..असे संवाद घडत राहतात आणि मग पुन्हा नववर्षांच्या दिनदर्शिकेसाठी स्थळसंशोधन सुरू होते.
या अशा दिनदर्शिकेत मध्येच कुठे एखादी अभ्यास सहल असते, कुठे दुर्ग संवर्धनाचे कार्य असते, निसर्गजतनाची हाक असते आणि कुठे आम्हा भटक्यांचे खास दुर्ग साहित्य संमेलनही असते. या अशा भटकंतीवरील विशेष थांब्यांनाही आमच्या या दिनदर्शिकेत हक्काची जागा असते.
वर्षांच्या सुरुवातीला ठरते ते वर्षभरात घडतेच असे नाही. काही ठरल्याप्रमाणे घडत नाही तर बरेच काही न ठरवताही घडते. आता माझेच पाहा ना, कोकणदिव्यासाठी गेलो आणि तिथलय़ा ‘कावल्या’ घाटानेच प्रेमात पाडले. ढाकचा बहिरी केला आणि गोनीदांची ‘गडदेचा बहिरी’ ही कादंबरी आयुष्यात आली. तर, पावनखिंडीत पाऊल टाकले आणि बाजींच्या पराक्रमाने माझीच छाती चार इंच रुंदावली.
..वर्षांअखेरीस एक ना दोन तब्बल ४६ ट्रेक झाले. अनेक नव्या गडकोटांचा पाहुणचार झाला. नवा प्रदेश, नवी माणसे भेटली. भटकंतीच्या या प्रत्येक पावलाने, वाटेने जणू आयुष्य समृद्ध केले. आज इथे मावळत्या दिनकराच्या साक्षीने मनातल्या मनात हाच जमाखर्च चालू होता. दिवसभर चालून शरीर थकले होते पण तरीही मन मात्र जमेचीच बाजू वरचढ असल्याचे सांगत होते.
(हा ब्लॉग  http://sanjayamrutkars.blogspot.in/2014/12/blog-post_ 30. html?m=1 वर वाचता येईल.)
संजय अमृतकर