पन्हाळा ते विशाळगड भ्रमंती
ठाण्यातील ‘भ्रमंती’ संस्थेच्यावतीने येत्या २५ -२६ जानेवारी रोजी पन्हाळा -पावनखिंड – विशाळगड अशी पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या मोहिमेत तज्ज्ञांच्या मदतीने माहिती दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अनुप मालंडकर (९७०२०१०५०७) यांच्याशी संपर्क साधावा.

रणथंबोर टायगर सफारी
राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्य़ातील रणथंबोर राष्ट्रीय उद्यान हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. अरवली आणि विंध्य पर्वतरांगांमध्ये हे जंगल वसलेले आहे. या जंगलाची व्याप्ती ३९२ चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात २५ वाघ, ४० बिबटे, चिंकारा, अस्वल, चितळ, सांबर, निलगाय, काकर आदी वन्यप्राणी दिसतात. तसेच २६४ प्रकारचे पक्षीही इथे पाहण्यास मिळतात. या जंगलातच इसवीसन ९४४ साली बांधलेला रणथंबोर ऐतिहासिक किल्लाही आहे. देशातील एक महत्वाच्या किल्ल्यांमध्ये रणथंबोर किल्ल्याचा समावेश होतो. या किल्ल्यावरूनच या जंगलाला रणथंबोर राष्ट्रीय उद्यान असे नाव मिळाले. हे जंगल आणि किल्ला भटकंतीचे ९ ते १५ मार्च दरम्यान निसर्ग टूर्सच्या वतीने आयोजन केले आहे. तसेच या सहलीला जोडून जयपूर शहराचीही भटकंती केली जाणार आहे. यामध्ये जयपूरमधील ऐतिहासिक इमारती, जंतर-मंतर वेधशाळा, सिटी पॅलेस, अंबर फोर्ट आदी स्थळांना भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी
विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.

राजगड -तोरणा मोहीम
‘आनंदयात्रा’ तर्फे येत्या २४-२५ जानेवारी दरम्यान तोरणा ते राजगड पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. यामध्ये तोरणागडाहून राजगडापर्यंतचा प्रवास डोंगररांगेवरून केला जाणार आहे. या भ्रमंतीत दोन्ही किल्ल्यांची तज्ज्ञांच्या मदतीने माहिती
दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी अजित टाकळकर (९५५२५६४४७८) उमेश धालपे (९६०४५५२६५३) यांच्याशी संपर्क साधावा.

महिलांसाठी जंगल सफारी
‘वाइल्ड डेस्टिनेशन’तर्फे येत्या ११ ते १४ मार्च रोजी फक्त महिलांसाठी ताडोबा जंगल सफारीचे आयोजन केले आहे. ताडोबा जंगल हे वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथे वाघांशिवाय बिबटय़ा, रानकुत्री, सांबर, चितळ, अस्वल, रानडुक्कर आदी प्राणी दिसतात. तसेच अडीचशेहून अधिक प्रजातींच्या पक्ष्यांचेही इथे दर्शन घडते. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी अमित भुस्कुटे (९८१९२१५१२७) यांच्याशी संपर्क साधावा.

राजगड, पुरंदर पदभ्रमण
‘आव्हान’ संस्थेतर्फे येत्या २५- २६ जानेवारी दरम्यान राजगड, पुरंदर पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी राजू देसाई (९८३३३४४५१०) यांच्याशी संपर्क साधावा.

कळसूबाई पदभ्रमण
‘माऊंटन हायकर्स’ तर्फे २५ जानेवारी रोजी कळसूबाई शिखर मोहिमेचे आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी आदित्य फडतरे (९७३०८९५६७८) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com