बांधवगड दर्शन
‘निसर्ग टूर्स’तर्फे येत्या ४ ते ८ जून दरम्यान मध्य प्रदेशमधील बांधवगड राष्ट्रीय उद्यान सफारीचे आयोजन करण्यात आले आहे. बांधवगड हे ऐतिहासिक काळापासून राजघराण्याचे राखलेले जंगल आहे. परंतु या राजेशाहीच्या काळातच झालेल्या मोठय़ा शिकारीनंतर महाराज मरतडसिंह यांनी शिकारीवर बंदी घातली. या जंगलाचे एका राखीव वनामध्ये रूपांतर केले. वन्यप्राण्यांना संरक्षण दिले, त्यांच्यासाठी जागोजागी लहानमोठे बांध घातले. हे संपन्न जंगल पुढे १९७५ साली व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाले. एकूण ४४८ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या या जंगलात वाघांशिवाय बिबटे, जंगली कुत्री, नीलगाय, चौशिंगा, भेकर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, चितळ, हनुमान लंगूर अशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. अडीचशेहून अधिक जातींच्या पक्ष्यांचीही इथे नोंद झाली आहे. अशा या जंगलात हत्ती आणि जीपमधून हे प्राणी दाखवण्याची सोय आहे. या सहलीमध्ये बांधवगडच्या जोडीनेच जबलपूरमधील भेडा घाटलाही भेट दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी विनोद काठे (९८७००८५०६२) यांच्याशी संपर्क साधावा.
उंबरखिंड मोहीम
‘शिवशौर्य ट्रेकर्स’तर्फे येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ऐतिहासिक उंबरखिंड मोहिमेचे आयोजन केले आहे. ही मोहीम लोहगड, विसापूर या गडांवाटे उंबरखिंडीत जाणार आहे. भूगोलाचे एक अद्वितीय रूप असलेल्या उंबरखिंडीत इतिहासातील एक महत्त्वाच्या लढाईची घटना घडली होती. छत्रपती शिवरायांनी या खिंडीचा योग्य रीतीने उपयोग करत शत्रूला नामोहरम केले होते. हा सारा इतिहास आणि भूगोल अनुभवण्यासाठी या मोहिमेचे आयोजन केले आहे.
अधिक माहितीसाठी अमित (९३२०७५५५३९) यांच्याशी संपर्क साधावा.
कच्छ रणाची भटकंती
कच्छचे रण हा एक विस्तीर्ण खारजमिनीचा प्रदेश आहे. अनेक प्राण्यांचे इथे दर्शन घडतेच पण पक्षिनिरीक्षकांसाठी ही पंढरी म्हणून ओळखली जाते. येथील तलाव व पाणथळींमध्ये विविध पक्षी प्रजाती पाहायला मिळतात. थंडीत क्रौंच, रोहित, झोळीवाला, करकोचा, शराटी, चमचा व विविध बदकं मोठय़ा संख्येने दिसतात. त्याशिवाय विविध प्रकारचे गरुड, बाज व ससाणे तिथे दिसतात. वन्यप्राण्यांमध्ये रानगाढवांव्यतिरिक्त लांडगा, भारतीय खोकड, वाळवंटी खोकड, कोल्हा, रान मांजर, वाळवंटी मांजर, तरस, नीलगाय, चिंकारा व काळवीट इथे  दिसतात. अशा या कच्छच्या रणच्या भटकंतीचे ‘इनसर्च आउटडोअर्स’ तर्फे येत्या २४ ते २७ जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी ९८५०८२६४३१ किंवा ८४१९९५४९८४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक
अन्नपूर्णा हे जगातील १० उंच शिखरांपैकी एक असून त्याची उंची ८०९१ मीटर (२६ हजार ७०० फूट) आहे. नेपाळमधील या शिखराच्या पायथ्यापर्यंत जाणारा ‘अन्नपूर्णा बेस कॅम्प’ हा हिमालयातील एक प्रसिद्ध ट्रेक आहे. हिमच्छादित डोंगर-दऱ्या, झाडी-जंगल, छोटी-छोटी गावे, नद्या-घरे यामधून जाणारा हा ट्रेक वेगळ्याच जगात घेऊन जातो. अशा या ट्रेकचे ‘हिमगिरी ट्रेकर्स’तर्फे १२ ते १८ मे दरम्यान आयोजन केले आहे. अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.
‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन ‘ट्रेक इट’ दर बुधवारी आपल्याला भेटते! ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी –  ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता,  ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com