भारत हा अशा काही देशांमधील एक आहे, की जिथे भूगोलामुळे विविध साहसी व थरारक खेळांची संधी उपलब्ध झाली आहे. हिमालय ही यातील सर्वात मोठी देणगी. हिमालयाच्या या पर्वतरांगांमुळे गिरिभ्रमण गिर्यारोहण, कातळारोहण, राफ्टिंग इत्यादी वेगवेगळे थरार आम्ही इथे अनुभवू शकतो. हिमालयातील उत्तम जंगले व मनोवेधक अभयारण्ये आपल्याला भुरळ  पाडतात. येथील सौम्य निसर्ग, प्रभावी धबधबे, खोऱ्यातील आगळी संस्कृती उल्लेखनीय आहे. आकाशाला स्पर्श करणारी हिमाच्छादित डोंगर शिखरे व सभोवताली असलेले बर्फाचे साम्राज्य आपल्याला भुरळ पाडतात आणि अपरिचित ताकद सगळ्यांना या निसर्गात रमवून टाकतात.
हिमालयाचे आमचे नाते प्राचीन आहे. आमच्या संस्कृतीचाच तो एक भाग असल्याने अनेक जण तो पाहायला येतात, तर काही तो अनुभवायला. हिमालयातील या भटकंतीला विशेष सराव अथवा कौशल्याची गरज नसते. चांगली शरीर क्षमता व दऱ्या-खोऱ्यांत हिंडण्याचे वेड असेल तर तुम्हीही गिरिभ्रमणात सहभागी होऊ शकता. सुरुवातीस सोपे ‘ट्रेक’ केल्यावर शरीराचा व आपल्या क्षमतांचा अंदाज घेऊन गिरिभ्रमण चालू ठेवता येते. यातूनच पुढे क्षमता व तयारी वाढवून गिर्यारोहणाकडे वळता येते.
हिमालय आणि केवळ बर्फ अनुभवायचा असेल तर मनाली- हमता- पास, भृगु तलाव, मनतैल ग्लेशियर, देव तिब्बा बेस हे ट्रेक करावेत. या वाटांवर उत्तम जंगल आहे. इथले पाईन वृक्ष, दऱ्या, झरे असे सारे निसर्गसौंदर्य बघत आपण आरोहण करतो. शेवटचे दोन दिवस बर्फात मजा करून पुन्हा मनालीकडे अवरोहण करता येते. मनालीत आल्यावर एक दिवस व्हॅली क्रॉसिंग किंवा पॅराग्लायडिंगसारखे साहसी खेळही खेळता येतात.
भारतातील सर्वात उंच शिखर- कांचनजंगा आहे. सिक्कीममध्ये पोहोचताच ही कांचनजंगा पर्वतरांग आणि त्यावरचे ते सर्वोच्च शिखर आपल्याला खुणावू लागते. सिक्कीमचा हा प्रदेश डोंगररांगांनी वेढलेला आहे. इथल्या डोंगररांगांवर चालू लागलो, की चमचमणाऱ्या रुपेरी शिखरांचे नेत्रदीपक दृश्यं दिसू लागतात. इथल्या भटकंतीसाठी उन्हाळा हा हंगाम तर आहेच, पण याशिवाय ऑक्टोबरमध्ये गेल्यास थंडीच्या आगमनामुळे ढगांनी भरून गेलेल्या दऱ्याखोऱ्याही दिसतात. जणू कापसाच्या नद्या वाहत आहेत असे वाटू लागते.
लडाखमध्ये ट्रेक करताना जम्मू-काश्मीरमधील त्या गूढ दऱ्या, अपराजित पर्वत, प्राचीन गुंफा व मोनेस्ट्री असे बरेच काही तुम्हाला आकर्षित करते. या प्रदेशातील कुठलीही डोंगरवाट चढून सर्वोच्च जागी जाऊ लागतो तसे टोकवरची मंदिरे व मंत्र लिहिलेले झेंडे खुणावू लागतात. लडाखच्या साऱ्या प्रवासात या खुणा आपल्याला पूर्णकाळ साथ देत असतात. छायाचित्रणासाठी तर हा भाग सर्वोत्तम! छायाचित्रकारांना काय पाहू आणि काय साठवू असे इथे होते.
दार्जिलिंग हे इंग्रजकाळात प्रसिद्धीस आलेले ठिकाण. ‘चहा’ची राजधानी म्हणून प्रसिद्ध! इथून सुरु होणाऱ्या ट्रेकची सर्वच प्रशंसा करतात. क्षितिजापर्यंत पसरलेल्या चहाच्या मळ्यांमधून इथे या वाटा पहाडात निघतात. या वाटेवरील विविध पशू, पक्षी, कीटक, वनस्पतींचे जैववैविध्य आपली भटकंती जिवंत करते. दऱ्या-खोऱ्यात लुभावणारा हा निसर्ग अनुभवणे हेच इथले खरे गिरिभ्रमण. सोनेरी मुकुट घातलेली इथली पांढरी शुभ्र शिखरे मनात घर करतात आणि पुन्हा हिमालयात परतण्याची आठवण करून देत राहतात. सध्या ज्या क्षेत्राचा सर्वाधिक प्रसार व प्रचार होत आहे असे क्षेत्र म्हणजे गढवाल हिमालय.  हिमालयातील अनेक तीर्थे याच भागात आणि भटक्यांच्या डोंगरवाटाही याच खोऱ्यात दडलेल्या. डेहराडून- उत्तरकाशी- हृषीकेश इथून हे ट्रेक सुरु होऊन हर की दून, दोडीताल, रेयुनसरा, गोमुख- तपोवन इत्यादी भागात फिरतात. या वाटेवर बर्फ कमी लागतो. पण पर्वतरांगांचे मनोवेधक देखावे जिंकून घेतात. आकाशाला छेद देणारी भव्य हिमशिखरे नजरेचे पारणे फेडतात. वेधक निसर्ग आणि रूजलेले पर्यटन यामुळे गिर्यारोहकांकडून अनेकदा या क्षेत्राला पहिली पसंती दिली जाते. ट्रेक संपून हृषीकेशला आल्यावर ‘बंजी- जंपींग’, ‘राफ्टिंग’ अशा साहसी खेळातही भाग घेता येतो. ‘हिमालय’ या शब्दातच एक सुखावणारी दृश्य कल्पना आहे, सुप्त आकर्षण आहे. भटक्यांना हा प्रदेश सतत बोलवत असतो ते त्याच्या याच गुणांमुळे. इथला निसर्ग भुलवत असतो. अशा या हिमालयात नवीन उंची गाठणे आणि त्या विशाल पर्वतरांगांचा एक भाग बनून राहणे वेगळेच आहे. साहस, सुख व स्वानुभूतीचे हे समिश्रण आहे. नेत्रदीपक व रोमांचकारी असा हा अनुभव आहे. हा अनुभव आम्ही घेतलाय तुम्हीही नक्की घ्या!    
ईशानी सावंत
adventureishani@gmail.com

हिमालयात जाण्यापूर्वी काळजी काय घ्याल
महाराष्ट्रात अनेक गिर्यारोहण संस्था आहेत, ज्यांच्यातर्फे हिमालयातील भटकंतीचे बेत आखले जातात. यामध्ये सहभागी होताना अनेकदा केवळ खर्च आणि कालावधीकडेच लक्ष दिले जाते. पण याशिवाय मोहिमेचा तपशील, त्याचा मार्ग, वाटेवरील आकर्षणे, आव्हाने, धोके याचा तपशील जाणून घ्या. संस्थेची निवड करण्यापूर्वी त्यांचा या क्षेत्रातील, प्रत्यक्ष या वाटेवरील अनुभव तपासा. संस्थेचे या विषयातील मनुष्यबळ किती अनुभवी-सक्षम आहे? आवश्यक साहित्य त्यांच्याकडे आहे का?  पूर्वानूभव काय आहे? जाणार त्या भागातील हवामान, भूगोल, आपतकालिन वेळी मदतीच्या संस्था, त्यांचे संपर्क क्रमांक या साऱ्यांची माहिती घेणे कधीही फायदेशीर पडते.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’