सज्जनगड दुर्ग साहित्य संमेलन
परिसंवाद, व्याख्याने, प्रदर्शन, माहितीपट आणि गडदर्शन
अभ्यासकांची व्याख्याने, परिसंवाद, मुलाखती, चर्चासत्रे, माहितीपट, कादंबरी अभिवाचन आणि विविध स्पर्धा-प्रदर्शने ही यंदाच्या चौथ्या दुर्ग साहित्य संमेलनाची वैशिष्टय़े आहेत. हे संमेलन सज्जनगडावर येत्या ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले आहे.
गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी एखाद्या किल्ल्याच्या सान्निध्यात दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यंदा या संमेलनात उद्घाटन आणि समारोप सोहळय़ासह ग्रंथदिंडी, विविध विषयांवरील परिसंवाद, मुलाखती, चर्चासत्रे, माहितीपट, सज्जनगड दर्शन, कादंबरी अभिवाचन, विविध स्पर्धा, प्रदर्शने आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गडकोटांच्या ऐतिहासिक पुस्तकांसह निघणाऱ्या ग्रंथदिंडीपुढे विविध साहसी आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. संमेलनात ‘दुर्ग आणि विज्ञान’, ‘दुर्ग साहित्याच्या नव्या वाटा’ आणि  ‘दुर्ग संवर्धन दशा-दिशा’ या तीन विषयांवर परिसंवादाचे आयोजन केले आहे. ‘प्राचीन साहित्यातून घडणारे दुर्गदर्शन’वर दोन विशेष व्याख्याने होणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची एखाद्या गडावरील प्रकट मुलाखत हे या संमेलनाचे वैशिष्टय़ आहे. गोनीदांनी काढलेली दुर्मिळ कृष्णधवल प्रकाशचित्रे, दुर्ग संवर्धनाचे काम करणाऱ्या संस्थांचे कार्य आणि सातारा जिल्हय़ातील गडकोटांवर आधारित अशी तीन प्रदर्शने यंदाच्या संमेलनात आयोजित केली आहेत. या जोडीनेच मुलांसाठी सहय़ाद्री आणि दुर्गावर आधारित चित्रकला आणि  प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘गोनीदां’च्या राजगडावर साकारलेल्या ‘वाघरू’ कादंबरीचे अभिवाचन, रायगडावरचा माहितीपट, सज्जनगड दर्शन, मनाचे श्लोकांचे सामुदायिक पठण, कीर्तन, नृत्य आदी कार्यक्रमही यंदाच्या संमेलनाचे आकर्षण आहे.
डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्रतज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे स्वागताध्यक्ष आहेत. साताऱ्यातील ‘किल्ले सज्जनगड दुर्ग साहित्य संमेलन समिती’आयोजक असलेल्या या संमेलनात सहभागी व्हायचे असेल तर श्रीनिवास वीरकर (मुंबई – ०२२-२४९५२०९९), जितेंद्र वैद्य (ठाणे- ९३२२५९७१३९) विशाल देशपांडे (पुणे -९८८१७१८१०४), संजय अमृतकर (नाशिक-९४२०००२२११) यांच्याशी संपर्क साधावा.