पुण्याच्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या वतीने नुकतीच ‘एव्हरेस्ट’ ची विजयगाथा रचण्यात आली. संस्थेच्या वतीने एक ना दोन तब्बल आठ गिर्यारोहकांनी हे सर्वोच्च शिखर सर केले. संस्थेची, मराठी गिर्यारोहकांची हीच गौरवगाथा येत्या शनिवारी (दि. २५) एका माहितीपटाद्वारे उलगडणार आहे. कुठल्याही नागरी मोहिमेने तयार केलेला हा एव्हरेस्टवरील पहिला भारतीय माहितीपट ठरणार आहे.
तब्बल २९,०३५ फुटांची अस्मानी उंची, उणे ३० ते ४० डिग्री सेल्सिअस तापमान, ऑक्सिजनचा अभाव असलेले विरळ वातावरण आणि चढाईच्या मार्गातील असंख्य धोके यामुळे खरेतर ‘एव्हरेस्ट’ हे तसे सामान्यांसाठी एक दिवास्वप्नच आहे. अशा या स्वर्गाला स्पर्श करणाऱ्या सगरमाथा ऊर्फ ‘माऊंट एव्हरेस्ट’ वरील हा माहितीपट! ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या गिर्यारोहकांनी नुकत्याच यशस्वी केलेल्या त्यांच्या मोहिमेतून या नगाधिराजाची ही सारी अंगे त्यांच्यासोबत असलेल्या कॅमेऱ्यांनी टिपली आहेत, ज्यातूनच हा आगळावेगळा माहितीपट आकारास आला आहे. तब्बल एक तासाच्या या माहितीपटात ‘एव्हरेस्ट’च्या या अंगाउपांगाबरोबरच त्याच्या अंगाखांद्यावरील गिर्यारोहणाची माहिती आहे. मुख्यत्वे ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या यंदाच्या मोहिमेचा आढावाही या माहितीपटात घेण्यात आलेला आहे. तब्बल २३ हजार नागरिकांच्या सहभागातून यशस्वी झालेल्या ‘गिरिप्रेमी’ संस्थेच्या या मोहिमेची सारी वाटचालच डोळे दीपवणारी अशी आहे. मोहिमेची घोषणा, संघ निवड, सदस्यांची शारीरिक-मानसिक तयारी, निधीची उभारणी, प्रत्यक्ष मोहीम, त्यातील अडथळे-आव्हाने आणि या साऱ्यांवर मात करत मिळवलेले लक्षणीय यश.. पुन्हा या साऱ्या यशाला सामाजिक उत्तरदायित्वाची म्हणून विविध कार्याची दिलेली जोड.. या साऱ्यांची नोंद या माहितीपटातून घेतली आहे. ‘गिरिप्रेमी’च्या मोहिमेतील एक सदस्य मिलिंद भणगे यांनी या माहितीपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. येत्या शनिवारी पुण्यात होणाऱ्या एका कार्यक्रमात नामंवत गिर्यारोहकांच्या उपस्थितीत या माहितीपटाचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी १९६५ मध्ये भारतातून गेलेल्या पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेचे नेते निवृत्त कॅप्टन एम. एस. कोहली हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याशिवाय यंदाच्या वर्षी एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत केलेले १५ शेर्पा खास नेपाळहून या कार्यक्रमासाठी येणार आहेत. यामध्ये यंदा केवळ ९ दिवसात ३ वेळा एव्हरेस्ट शिखर सर केलेले कामे शेर्पा यांचाही समावेश आहे. याशिवाय एव्हरेस्टवीर लवराजसिंग धरमसक्तू हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.