तमाम लद्दाखी लोकांचे लद्दाखबाबत म्हणणे असते, की लद्दाख हा असा प्रदेश आहे, जिथे जिवाला जीव देणारा जिवलग मित्र किंवा जिवावर उदार होऊन लढायला आलेला शत्रूच फक्त येण्याचे धाडस करू शकतो.
ग्रेटर हिमालयन रेंज, झान्स्कर रेंज, काराकोरम रेंज आणि लद्दाख रेंज या चार महापर्वत रांगांचा हा दुर्गम प्रदेश. वर्षांतले ७/८ महिने बर्फात बुडालेला. पूर्ण ठप्प! खरंच, इथल्या लोकांची प्रतिकूल हवामानाला, खडतर परिस्थितीला तोंड देण्याची ताकद अफाट आहे.
ग्यालत्सेन या आमच्या जीप ड्रायव्हरला मी एकदा विचारले, ‘‘चार महिने काम केले की पुढचे ७/८ महिने सुटी. मजा असेल ना?’’ त्यावरचे ग्यालत्सेनचे उत्तर मला आजही ओशाळवाणे करते. या चार महिन्यात, दूर झान्स्कर व्हॅलीमध्ये ग्यालत्सेनचे कुटुंब, पुढच्या ७/८ महिन्यांची बेगमी म्हणून, रात्रीचा दिवस करून शेण्या, लाकूडफाटा, धान्य, बटाटे गोळा करण्याच्या मागे असते; तर ग्यालत्सेन लेहमधे जीप चालवून जास्तीत जास्त कमाई करण्याचा प्रयत्न करतो. कशासाठी? तर पुढच्या ७/८ महिन्यांसाठी त्याला गोश्त (मटण) खरेदी करायचे असते. जवळपास पन्नास एक हजार रुपयांचे! (गोश्त, बटाटा आणि धान्य एवढेच साठवता येते. फळे, भाज्या वगैरे काही नाही.) ग्यालत्सेन पुढे असेही म्हणाला, ‘‘मॅडमजी, ये गोश्त इतना बर्फीला हो जाता है कि तोडनेके लिये ५/६ घंटे लगते है। उसके बाद-पकाना। फिर खाना।’’ अंघोळ नाही. मणामणाचे ऊनी कपडे अंगावर. आणि या अशा आयुष्याला, मी ‘मजा असेल नं’ असे, चुकून का होईना म्हणाले, याची लाज आजही वाटते. या कमाईच्या चार महिन्यात मुख्य उत्पन्न पर्यटन व्यवसायातून येते. लद्दाखच्या पर्यटनाचे, निसर्गपर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, साहसी पर्यटन असे अनेक पैलू आहेत. इथला निसर्ग, कुठेच नाही असा! लुभावणारा पण तितकाच रौद्रभीषण! इथली संस्कृती वेगळीच. प्राचीन आणि तितकीच समृद्ध! इथली प्रदेशागणिक, विविध पारंपरिक नृत्ये-काही लयदार- नाजूक साजूक, काही आक्रमक! इथले पोलो, आर्चरी सारखे मर्दानी खेळ- सळसळता जोश उत्पन्न करणारे. इथल्या अवघड वाटा ट्रेकर्सना खुणावणाऱ्या, बाईकर्स- सायकलिस्टना आव्हान देणाऱ्या! केवळ साहस पर्यटन इतकाच विचार केला तरी लद्दाखमध्ये अनेक संधी उपलब्ध आहेत. याक सफारी, कॅमल सफारी, ट्रेकिंग, पॅराग्लायडींग – पॅरासेलिंग, राफ्टिंग, स्कीईंग, मोटरबाईकिंग, पोलो, आर्चरी – एक ना अनेक!
लद्दाख अलीकडे पर्यटनासाठी Hot Spot म्हणून झोतात आला; पण तसे पाहिले तर १९ व्या शतकापासून लद्दाखमध्ये अ‍ॅडव्हेंचर टूरिझम सुरू झाले. १९११ मध्ये आर्थर नीव्जचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे-
kTourist Guide to Kashmir, Ladakh and skardu. २० व्या शतकापर्यंत ब्रिटिश ‘श्रीनगर- लेह’ असा ट्रेक करायचे. ‘१४ टप्प्यांचा ट्रेक’ असे त्याचे नाव! अ‍ॅडव्हेंचर टूरिझमचे काही प्रकार आम आदमीसाठी सुद्धा आहेत. त्यापैकी याक सफारी आणि कॅमल सफारी हे दोन धमाल प्रकार! नुब्रा व्हॅलीमधल्या शीत वाळवंटात दोन वशिंडांचे (double hump)  उंट आहेत. बॅक्टेरियन अ‍ॅनिमल्स! फार पूर्वी मध्य आशियाच्या व्यापारी मार्गावर यांचा वाहतुकीसाठी वापर व्हायचा. या उंटांवर सवार होणे, तो उठता-बसताना स्वत:चा तोल सांभाळणे आणि त्याच्या त्या लचकत मुरडत चालीला अ‍ॅडजस्ट होत, सफारीचा आनंद मिळवणे, ही कसरत केल्यावरच ‘उंटावरचे शहाणे’ हा किताब मिळतो. या कॅमल सफारीमुळे Nubra  किंवा Ldumbra म्हणजेच लद्दाखच्या ‘फूलों की घाटी’ चे दर्शन घडते. झर्द-आलू (जर्दाळू)च्या शेंदरी-हिरव्या बागा, सँड डय़ून्स, शीत वाळवंट असे नजारे नजरेस पडतात. याक सफारीचा अनुभव आणखीच वेगळा. काळेकभिन्न, केसाळ, १ टनी धूड- त्याला झूल घालून, गोंडे लावून नटवलेले. त्यावर स्वार झाले की स्वत: ‘दैत्य’ असल्याची अनोखी भावना, मनात उत्पन्न होते. (आणि एक अनामिक-सूक्ष्म आनंदही मिळतो.) हा प्राणी शांत, मवाळ दिसतो पण त्याला लडदू, मूर्ख समजण्याची चूक चुकूनही करू नये.
लद्दाखमध्ये बाईकिंग, कार/जीप ड्रायव्हिंग, पॅरासेलिंग/ ग्लायडिंगचे अनुभव खूप जण, खूप वेळा घेतात. पण राफ्टिंगची मजा मात्र औरच! लद्दाखमधल्या मुख्य नद्या सिंधू, झान्स्कर, शयोक, सुरु वगैरे; पण राफ्टिंग प्रामुख्याने सिंधु-झान्स्करमध्ये होते. सिंधू म्हणजे भारताचा मानबिंदू. सिंधू ही ‘नदी’ नव्हेच. जिच्या वाहत्या पाण्याचा रौद्र भीषण नाद स्वर्गापर्यंत पोचतो असे म्हणतात, तो हा महानद सिंधू! लद्दाखी भाषेत सिंधूला ‘सिंघे खब्बाब’ म्हणतात, म्हणजे सिंहमुखातून पडणारे पाणी! पण लद्दाखमध्ये सिंधूचा मिजाज खूप वेगळा आहे. इथल्या सौम्य-शांत बौद्ध संस्कृतीचा आब राखत सिंधू लद्दाखभर शांत-संथ वाहते. या सिंधूतले राफ्टिंग २, ३ आंतरराष्ट्रीय ग्रेडींग स्केलचेही आहे. पण राफ्टिंगचा ‘र’माहीत नसलेल्यांनाही या सिंधूतल्या राफ्टिंगचा आनंद लुटता येतो. स्पीटुक ते निमू किंवा सासपोल हा सर्वसामान्य राफ्टिंग रुट! कारु गावापर्यंतच्या राफ्टिंगचे वर्णन तर ‘सिनिक फ्लोटिंग’ म्हणजे ‘तरलपणे तरंगणे’ असेच करता येईल. पण झान्स्करमधले ‘पदुम ते निमू’ राफ्िंटग, खरे राफ्टिंग! एक आठवडय़ाचे! या दरम्यान रात्रीचे मुक्काम थंडी वाऱ्यात, विल्डरनेसमधे, तंबू-राहुटय़ात करावे लागतात. यासाठी ट्रेंड राफ्टर्स, रेस्क्यु बॅकअप अत्यावश्यक! थोडक्यात, हे ऐऱ्यागैऱ्याचे काम नाही. राफ्टिंगच्या वेळी कधी आपण रॅपिड (उसळत्या पाण्याचा पॅच) वर स्वार होतो. कधी रॅपिड आपल्यावर रोब जमवतो. अचानक भिडणारे – बर्फाळ पाणी शरीराला, मनाला घुसमटून टाकते. पण रॅपिडची मजा एकदा अनुभवली की कोणत्याही वयाची व्यक्ती चेकाळल्याशिवाय राहात नाही.
सिंधूचे अथांग-शांत पाणी, दोन बाजूचे काळे चकचकीत कडे आणि नीरव शांतता! माणसात असून माणसांपासूनच नव्हे तर स्वत:पासूनही दूर अशी एक अवस्था येते. निसर्गाचा हा आविष्कार, असा अनुभव इतर कुठे अनुभवता येईल?
एसडी बर्मनचे एक गाणे आहे-
कहाँ ऐसा हिमाला, कहाँ ऐसा पानी
यहीं है वो जमीं, जिसकी दुनिया दिवानी
सुंदरी ना कोई ऐसी, धरती हमारी
हम है प्रेमके पुजारी, रसके भिखाम्री..
प्रेमके पुजारी..
काळ्या कडय़ातून ‘राफ्ट’ जात असताना म्हटलेल्या या गाण्याचे सूर-शब्द अंगावरच येतात. जन्माला आल्यास एकदातरी लद्दाखला जावे आणि सिंधूतले राफ्टिंग करावेच करावे.
एकीकडे हा अनुभव, तर ट्रेकर्सना अनेक ट्रेक रुट्स भुरळ घालत असतात. चांगथांग रीजन मधला रुपशू व्हॅली ट्रेक किंवा मरखा व्हॅली ट्रेक किंवा लेहच्या दक्षिण आकाशात घुसलेल्या स्तोक कांगरीचा ६१५० मी. उंचीवरचा ट्रेक हे पॉप्युलर ट्रेक्स! ग्रेटर हिमालयन रेंजमधला नूनकून मॅसिफ ट्रेक किंवा काराकोरमचा ससेर कांगरी हाही मानाचा ट्रेक! उत्तुंग (Mighty) खर्दुंग, बारालच्छा किंवा तंगलंग या ‘ला’ (खिंडी) चा ट्रेकही मानाचा! बाकी लेह-हेमिस वगैरे चिटुक-मिटुक (त्या मानाने) ट्रेक्स! मध्य मे ते ऑक्टोबरमध्य हा इथला ट्रेकिंगचा उत्तम काळ! आमचा मित्र सोनम लोटस मात्र म्हणतो, लद्दाखमध्ये ट्रेकिंगसाठी परदेशीच जास्त येतात. भारतीय येत नाहीत. खरे आहे.
लद्दाखमधला ‘चद्दर ट्रेक’ हा एक अत्राप- ऐन हिवाळ्यातला ट्रेक. थंडीने थिजलेला झान्स्कर म्हणजे जणू बर्फाची चादर. त्यावरून चालत जायचे! खरे तर हा शतकापासूनचा ‘ट्रेड रुट’ आणि आताचा ट्रकरुट!  ऑक्टोबर मध्यानंतर लद्दाख हळूहळू बर्फावर्षांवात न्हाऊन निघतो. बर्फाळ शांतता पसरते. या दिवसात लद्दाखी लोक जीवाला विरंगुळा म्हणून गुरगुरचा (चहा) किंवा छांग (स्थानिक मद्य) पितात, नाचगाण्यात रमतात आणि पोलो – आर्चरी खेळतात. पोलो, आर्चरी आणि लद्दाख यांचे अतूट नाते आहे. लद्दाखमधला ‘पोलो’ हा मुक्तशैली पोलो म्हणता येईल, असा. खेळाडूंची संख्या, मैदानाचा आकार, मोजमाप, याबाबत कडक कायदे कानून, नियम नसतात. कुठेही केव्हाही खेळला जाऊ शकतो. अगदी लेह बझारमध्ये सुद्धा! घराच्या पायऱ्यांवर बसून लोक खेळाचा आनंद लुटतात.
या खेळाचे मूळ बाल्टीस्तानमध्ये आहे. लद्दाखचा राजा सिंघे नमग्यालची आई, बाल्टीची राजकन्या. या सूतावरून बाल्टीतून पोलो लद्दाखच्या स्वर्गात पोचला. त्यावेळच्या पोलो मॅचेसचे वर्णन मूर, कनिंगहॅम अशा अनेक प्रवाशांनी लिहून ठेवले आहे. लद्दाखी पोलो म्हणजे Hot and Fast ! आणि त्या उंचीवर, त्या थंडीत झान्स्कर पोनी(घोडे)च  पोलोचा खेळ निभावून नेऊ शकतात. आर्चरी किंवा नेमबाजी हेही लद्दाखचे वैशिष्टय़च म्हणावे. नेमबाजी स्पर्धांच्या वेळी लद्दाख स्त्री-पुरष पारंपरिक वेशभूषा करून, गोन्चा वगैरे घालून, टरकॉईजचे दागदागिने घालून येतात. छांगचे फव्वारे उसळतात. गाण्यात interludes असतात तशी या नेमबाजी स्पर्धा- दरम्यान interludes असतात. मनोरंजनात्मक कार्यक्रमांची किंवा पारंपरिक नृत्यांची!
आर्चरीचा सीझन मार्चमध्ये असतो. पेरणीपूर्वीचे हे मोकळे दिवस! त्यासाठी तयारी, सराव मात्र वर्षभर चालू असतो. विलोच्या लाकडांची नक्षीदार धनुष्ये बनवली जातात. या धनुष्यांची स्प्रिंग अ‍ॅक्शन वाढावी, बाणाची गती वाढावी म्हणून, ‘आयबेक्स’च्या शिंगाच्या पातळ थराचा वापर केला जातो. ‘गेझर सागा’ या मूळ तिबेटी महाकाव्यातला धनुर्धर नायक, दारपोनचेमो हा ‘आर्चरी’ आशिकांचा हिरो! या नेमबाजी स्पर्धेत कुणीही भाग घेऊ शकतो. जो कोणी ‘त्सा गा’चा म्हणजे लक्ष्याचा वेध घेतो त्याला ‘खटक’ (पांढरा रुमाल) दिले जाते आणि स्पर्धेच्या शेवटी होणाऱ्या नृत्याचा म्होरक्या होण्याचा मान दिला जातो. ‘अगरेन-ए-दारस्ते’ हा नेमबाजीचा एक आविष्कार. अर्गोन्स म्हणजे लेहमधले मुस्लीम. त्यांची स्टाईल जरा वेगळी. तशी कारगिल आर्चरीही एक स्टाईल. पण शेवटी  विरंगुळा आणि आनंद तोच! याच दिवसांत ट्रान्स हिमालयन रीजनमध्ये स्काईंगचे इव्हेंट असतात. लद्दाखमध्ये सतत काहीतरी घडत असते. लडाखमध्ये पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे खूप काही आहे. कधी मन भरणार नाही असे, इतके!
लद्दाखला Land of Lamas म्हणतात किंवा Land of Passes (La) म्हणतात. पण Land of Endless Discoveries म्हणतात, ते अधिक सार्थ वाटते.