गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दुर्गसाहित्य संमेलनाचे चौथे पर्व यंदा ७ ते ९ फेब्रुवारी २०१४ दरम्यान सातारा जिल्ह्य़ातील सज्जनगड किल्ल्यावर आयोजित केले आहे. डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू आणि ज्येष्ठ मूर्तिशास्त्र तज्ज्ञ डॉ. गो. बं. देगलूरकर हे या संमेलनाचे अध्यक्ष, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत.
ज्येष्ठ साहित्यिक गोपाल नीलकंठ दांडेकर यांना एक दुर्गप्रेमी म्हणून सारा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचे साहित्य आणि अनेक उपक्रमांतून महाराष्ट्रातील या दुर्गाचे मनोज्ञ दर्शनच घडते. अशा या ‘गोनीदां’च्या नावाने महाराष्ट्रभरातील त्यांच्या प्रियजनांकडून या गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळाच्यावतीने अन्य उपक्रमांच्या जोडीने दरवर्षी एका किल्ल्याच्या सान्निध्यात ‘दुर्ग साहित्य संमेलन’ भरवले जाते. यापूर्वी राजमाची, कर्नाळा आणि विजयदुर्ग या तीन किल्ल्यांवर या संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. २०१४ सालच्या संमेलनासाठी सज्जनगडची निवड करण्यात आली असून याचे आयोजकत्व ‘किल्ले सज्जनगड दुर्गसाहित्य संमेलन समिती, सातारा’ यांनी स्वीकारले आहे.
‘किल्ले सज्जनगड दुर्गसाहित्य संमेलन समिती, सातारा’ या आयोजक संस्थेत रानवाटा निसर्ग आणि पर्यावरण संवर्धन मंडळ, श्री रामदास स्वामी संस्थान, श्री समर्थ रामदास स्वामी सेवा मंडळ, शिवस्मृती मावळा प्रतिष्ठान, श्री शिवप्रतिष्ठान, स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच, भारतीय इतिहास संकलन समिती, उर्वी संस्था, जागृती महिला मंडळ आदी संस्थांचा समावेश आहे.
सज्जनगड हा छत्रपती शिवरायांच्या गडकोटांमधील एक महत्त्वाचा दुर्ग! शिलाहार राजा भोजची निर्मिती असलेला हा गड अश्वलायनगड, परळी आणि नवरसतारा या अन्य नावांनी देखील इतिहासात ओळखला जातो. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्य आणि समाधीस्थळामुळे ही दुर्गभूमी पुनीत आणि महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली. अशा या दुर्गमंदिरी यंदाच्या चौथ्या दुर्ग साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे.
यंदाच्या या तीनदिवसीय सोहळय़ात ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, दुर्गविषयक परिसंवाद, व्याख्याने, माहितीपट, सज्जनगड दर्शन, गडकोटांच्या छायाचित्रांची प्रदर्शने, गोनीदांच्या कादंबरीचे अभिवाचन,  आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी विजय वैद्य (९४२११७७१९८), नंदकुमार सावंत (९४२२६०४५०९), सीमंतिनी नूलकर (९८२२३२३८४७) यांच्याशी संपर्क साधावा.