03 June 2020

News Flash

स्वर्गीय साल्हेर!

शेवटचा दम टाकून, पाणी पिऊन निघालो. कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या. त्या ओलांडून दोन दरवाजांच्या मालिकेत आलो. हा आणि वरचा आणखी एक दरवाजा पार केला आणि

| January 22, 2014 06:43 am

शेवटचा दम टाकून, पाणी पिऊन निघालो. कातळात खोदलेल्या पायऱ्या लागल्या. त्या ओलांडून दोन दरवाजांच्या मालिकेत आलो. हा आणि वरचा आणखी एक दरवाजा पार केला आणि साल्हेरच्या पठारावर पोहोचलो.  माचीवर सुंदर ढग दाटून आले होते. मध्येच एखाद्या खिडकीतून सूर्य डोकावून जाई आणि प्रकाशाची ही लाट सगळी हिरवीगार माची सोनसळी करुन टाकी. डावीकडे उंचावर परशुरामाचे मंदिर आणि शिखर अजूनही ढगांमध्येच हरवले होते. एवढा सुंदर नजारा आजवर कुणी पाहिला नसेल. दूर थोडी उंचावर गुहा आणि त्यासमोरचा झेंडा दिसला आणि आम्ही मुक्कामाच्या जागेजवळ आल्याची खात्री झाली. आता अधिक काम नव्हते. मुख्य काम होते ते समोरचे महानाटय़ अनुभवायचे. म्हणून माचीच्या कडय़ावर अगदी टोकाला येऊन पाय पसरुन बसलो. सूर्यास्त व्हायला अजून अवकाश होता. तिथे ध्रुवने सोबतच्या कागदांवरुन गडाचा इतिहास आणि प्राचीन पत्रांतील उतारे वाचून काढले. काही लाखांच्या दिल्लीच्या पातशहाच्या फौजेस उघड मदानात पाणी पाजून शिवरायांनी संपूर्ण बागलाण प्रांतावर आपला वचक बसवला होता. मावळत्या सूर्याला ढगांआडून साक्षी ठेवून अजोड पराक्रमाची ही गाथा ऐकून ऊर अभिमानाने भरुन आला. जागेवरुन उठलो. सूर्य आता बाहेर आला होता. समोरच्या दरीत हळद्या उन्हाचा खेळ मांडला होता. सूर्यनारायण मुक्तहस्ते सृष्टिदेवतेवर भंडारा उधळत होता. दरीच्या तळाला जीवनाचा एक सोनेरी पट उलगडला जात होता. जीवनदायिनी नद्या, अडवलेले पाणी, तलाव आणि दूरवर अनंतापर्यंत दिसणारा माझा सह्य़ाद्री. कितीही फोटो काढले तरीही कुठलाच फोटो या दृश्याला न्याय देत नव्हता. शेवटी कॅमेरा बंद केला आणि फक्त डोळ्यांनी तो क्षण अनुभवून रोमारोमांत साठवून घेतला.
(खालील लिंकवर ‘स्वर्गीय साल्हेर’ ही ब्लॉगपोस्ट संपूर्ण वाचता येईल. http://www.pankajz.com/posts/salher
पंकज झरेकर

उपक्रम: दुर्ग संवर्धनाची पालखी
वसईतील किल्ल्यांचे संवर्धन करायचा वसा श्रीदत्त राऊत या उत्साही इतिहासप्रेमी तरुणाच्या नेतृत्वाखालील ‘किल्ले वसई मोहीम’ ने घेतला आह़े  गेली तब्बल दहा वष्रे किल्ल्यांच्या संवर्धनाचे शक्य ते सर्व मार्ग या मोहिमेच्या माध्यमातून अवलंबिले जातात़  याचाच एक भाग म्हणून लोकांना किल्ल्यांकडे वळविण्यासाठी मोहिमेने विविध किल्ल्यांवर उत्सव सुरू केले आहेत़  मग १५ ऑगस्टला भारताचा पहिला स्वतंत्र ध्वज किल्ल्यावर फडकाविणे असो किंवा दिवाळी-दसऱ्यासारखे सण किल्ल्यांवर साजरे करणे असो़  यामुळे किल्ल्यांना पुन्हा जागृतावस्था आली आह़े असाच एक पालखी सोहळा मोहिमेकडून गेल्या दहा वर्षांपासून साजरा करण्यात येतो़ चिमाजी आप्पांनी किल्ल्यात वज्रेश्वरी देवीची स्थापना केली़  देवीचा पालखी सोहळाही त्याकाळी सुरू झाला़  मध्यंतरी खंडित झालेली ही परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली़  या सोहळ्याचे वैशिष्टय़ म्हणजे एका किल्ल्यापासून निघणारी ही पालखी दुसऱ्या किल्ल्यापर्यंत नेण्यात येत़े  त्यानिमित्त जमणाऱ्या मंडळींना किल्ल्यांचा इतिहास आणि संवर्धनाची आवश्यकता याबाबत माहिती देता येत़े  त्यातूनच नवे कार्यकर्ते आणि दुर्गप्रेमी तयार होतात़  ऐतिहासिक वास्तूंबद्दल आत्मियता निर्माण होऊन किल्ल्यांची स्वच्छता राखण्यात येत़े  किल्ल्यांचे निखळणारे दगड बसविण्याची प्रेरणा निर्माण होत़े  या वर्षी ११, १२ जानेवारी या दोन दिवशी झालेल्या सोहळ्यात पहिल्या दिवशी पालखीचा मान ‘वसई गावा’ ला देण्यात आला होता़  वसई किल्ला ते राममंदिर भंडार आळी आणि भंडार आळी ते केळवे जंजिरा अशा दोन टप्प्यांत हा सोहळा पार पडला़  यात हजारो दुर्गप्रेमींनी भाग घेतला़  दुसऱ्या दिवशीच्या सोहळ्याचा मान भिवंडी शिवस्पर्श प्रतिष्ठानचे शेखर फरमन आणि केळवे संवर्धन मोहिमेचे योगेश पालेकर यांना देण्यात आला होता़.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2014 6:43 am

Web Title: trek it loksatta trek it
टॅग Loksatta Trek It
Next Stories
1 ट्रेक डायरी
2 ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’पहिले पाऊल, दिशा देणारे!
3 सज्जनगडावर दुर्गसाहित्य संमेलन
Just Now!
X