News Flash

मराठवाडय़ातील दुर्गभ्रमंती

एप्रिल महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी मी, माझे दोन मित्र आणि ज्येष्ठ शिलालेख संशोधक आनंद कुंभार सोलापूर किल्ल्याच्या परकोटातून हिंडत होतो. चौघांच्या शोधक नजरा तटाचे दगड

| May 21, 2014 08:46 am

एप्रिल महिन्यातल्या एका रणरणत्या दुपारी मी, माझे दोन मित्र आणि ज्येष्ठ शिलालेख संशोधक आनंद कुंभार सोलापूर किल्ल्याच्या परकोटातून हिंडत होतो. चौघांच्या शोधक नजरा तटाचे दगड अन् दगड न्याहाळत होत्या अन् अचानक एका चर्येच्या दगडापाशी आमची नजर स्थिरावली. जवळ जाऊन पाहावं म्हटलं तर घाणेरीचं एक झुडूप वेडंवाकडं पसरलेलं होतं. चौघेही त्या झुडपावर तुटून पडलो. दगड मोकळा केला. चक्क कानडीतला एक शिलालेख होता. मग आनंद कुंभार लागले कामाला. त्यांनी तो दगड स्वच्छ धुऊन, पुसून घेतला. मग त्याचे ठसे घेतले. काहीतरी नवीन हुडकल्याच्या आनंदात आम्ही चौघेही परतलो. आता उत्सुकता होती त्याचं वाचन होऊन येण्याची. साधारणपणे एक महिन्यानंतर धारवाडहून त्याचं वाचन होऊन आलं. सोलापूरच्या किल्ल्याच्या ठिकाणी असलेल्या बाराव्या शतकातल्या मंदिर संकुलाला गोव्यातल्या कदंब राजवटीनं दिलेल्या जमिनीचं ते दानपत्रं होतं. अर्थ असा की बाराव्या शतकात सोलापूर किल्ल्याच्या जागी असलेलं मंदिर संकुल गोव्याच्या कदंब राजवटीनं नावाजलं होतं. आता त्याच मंदिर संकुलाच्या जागेवर किल्ला उभा आहे. त्या किल्ल्याच्या बांधकामात गाडलं गेलेलं हे मंदिर पुढे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला एका इंग्रज कलेक्टरनं उत्खनन करून बाहेर काढलं. या मंदिराच्या इतिहासावर या शिलालेखाने मोठा प्रकाश टाकला. मोडी, देवनागरी, कानडी, अरबी, फारसी, पर्शियन, मराठी अशा सर्व लिपींतले कमीतकमी विसेक शिलालेख सोलापूरच्या किल्ल्यात आढळतात. अशा या सुक्ष्म नजरेने आमचे दुर्गदर्शन सुरू झाले.
एकदा मनात आलं की याच पद्धतीनं जवळपासचे किल्ले एकदा नीट पाहिले पाहिजेत. विचार मनात यायचा अवकाश, नेहमी याच गोष्टीसाठी उतावीळ असणाऱ्या माझा मित्र राजू टिपरेला आवतन धाडलं. तो येताच या मोहिमेला सुरुवात झाली. एका सकाळी आम्ही औशाच्या किल्ल्यात शिरलो. नानाप्रकारचे पक्षी, मोर असं सगळं निसर्गवैभव पाहात गवतात हरवलेल्या तोफा शोधून काढत दुपापर्यंत वेळ कसा गेला कळालंच नाही. पुढचा मुक्काम किल्ले उदगीर, मग कंधार, मग धारूर, शेवटी परांडा असा एक टप्पा करून परतलो. ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर गेल्यानं उन्हाचा त्रास बराच जाणवत होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त होताना धारूरच्या किल्ल्याच्या बुरुजावर उभे होतो. समोर गोडय़ा पाण्याचा विस्तीर्ण जलाशय पसरला होता. खरोखर धारूरचा किल्ला म्हणजे निसर्गरचना आणि मानवनिर्मित कल्पकता यातून साकारलेलं एक अलौकिक आश्चर्य होते. समोरच्या बाजूनं भुईकोट, कडेनं जंजिरा अन् शेवटी टोकाला डोंगरी किल्ला अशी आश्चर्यजनक रूपं एकाच किल्ल्यात पाहायला मिळतात. एक तेवढा जलाशय सोडला तर किल्ल्यावरची एकही वास्तू धड नाही. चांगले चौकोनी दगडांचे चिरे लोकांनी काढून काढून तटाला, बुरुजाला भगदाड पाडलेली. सगळय़ा गावाच्या म्हशी किल्ल्यात चरत असलेल्या, विषण्ण मनानं आम्ही दोघे परतलो.
आश्चर्य असं की रचनात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास या सगळय़ा किल्ल्यांची बांधकामं एकाच पद्धतीची. भोवती खंदक, मग ओळीनं दरवाजांची मालिका, तिसऱ्या दरवाजावर बहुधा राजवाडय़ाचं बांधकाम, आत विस्तीर्ण आवार, क्वचित उदगीर किंवा कंधारसारख्या किल्ल्यात या आवारातही वेगवेगळे महाल, घोडय़ाच्या पागा, मशिदी अशा इमारती. खंदक सगळय़ा ठिकाणचे अजूनही पाण्यानं भरलेले. क्वचित कुठे खंदकात अतिक्रमण केलेली शेती. उदगीर, औसा आणि कंधारला किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं. दुरुस्ती म्हणजे चक्क सिमेंटचे कारखाने काढल्यासारखे दर्जा भरणं, गिलावे करणं आणि आरसीसीचे स्लॅब ओतले जात  होते. किल्ल्याच्या तटावरून चक्क वाळूचे डंपर फिरत होते. अशा वेळी पुरातत्त्व खातं कुठं जातं कुणास ठाऊक? असो. पण एक जाणवलं की या सर्व किल्ल्यांमधील बहुतांश बांधकाम सुस्थितीत आहेत. आणखी एक आश्चर्य असं की या सर्व किल्ल्यांच्या बांधकामात भग्न देवळांचे अवशेष जागोजागी वापरलेले दिसत होते.  मग नंतर निमित्त मिळायचा अवकाश, हे सगळे किल्ले दोनदोनदा अभ्यासासाठी फिरून आलो. एक कंधारचा किल्ला वगळता एकाही किल्ल्याबाबत माहिती देणारं एकही पुस्तक मिळालं नाही. सगळे किल्ले गावाच्या एका टोकाला असल्यानं संध्याकाळी तिकडे कुणी फिरकत नाही. गावातल्या रिकामटेकडय़ा मंडळींचा मग तो स्वर्गच. दारू, पत्ते, जुगार अशा खास सुलतानी खेळांचा मग इथं बाजार. किल्ला मग पुन्हा जिवंत होतो. तीन-चारशे वर्षांपूर्वीचा काळ तिथं नांदता होतो. सकाळ होता होता हे सारे अतृप्त आत्मे तिथं आपल्या अस्तित्वाच्या खुणा सोडून वर्तमानात परत येतात! आपण जाऊन पाहावं तर कुठल्यातरी तोफेची कडीच तोडून नेलेली, कुठल्यातरी मूर्तीचं नाकच तोडलेलं असा सारा दैवदुर्विलास.
रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, विसापूर, कर्नाळा, तुंग, तिकोना हे सगळे शिवशाहीतले परिचित किल्ले. त्यांना शिवस्पर्शाचं, स्वराज्याचं वलय आहे. पण सोलापूरच्या आसपासचे हे सारे किल्ले भूतकाळात हरवलेले. गरज आहे त्यांच्या संवर्धनाची, त्यांच्या अभ्यासाची. मध्यंतरी शासनानं म्हणे हे किल्ले दत्तक देण्याची योजना सुरू केली होती. कुठला किल्ला कुणाच्या मांडीवर दत्तक गेला कुणास ठाऊक? किल्ल्यांची अवस्था मात्र होती तशीच. सरकारी कागदोपत्री हे किल्ले पुन्हा बांधले गेले अशी नोंद झाली नाही म्हणजे मिळवले. खरेतर हे सगळे किल्ले म्हणजे ऐन मध्ययुगाच्या, बहमनी राजवटीच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार. पण आज मात्र त्यांची अवस्था बिकट आहे.
सारं काही सरकारनंच करावं हेही मत बरोबर नाही. त्या त्या ग्रामस्थांनी हे किल्ले स्वच्छ ठेवून, गावातल्याच चार-दोन जणांना मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण देऊन हे किल्ले पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र केलं तर गावालाही त्याचा फायदा होईल. तिथला इतिहास जिवंत राहील. त्या परिसरातल्या लोकांच्या अस्मिता जागृत होतील, पण.. हा पणच सगळय़ात अवघड आहे.
नुकतीच सुरू झालेली दुर्गसाहित्य संमेलनाची चळवळ या दिशेनं खूप चांगली संधी ठरू शकते. या किल्ल्यांच्या परिसरात तिथल्या ग्रामस्थांनी एकेक दिवसाचे दुर्गमेळावे घेतले तरी हे किल्ले प्रकाशात येतील. त्यांच्या जतनाचे, संवर्धनाचे प्रयत्न सुरू होतील, पण पुढाकार मात्र स्थानिक ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीनं किंवा स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी घ्यायला हवा. आम्ही सारेजण त्या दिवसाची वाट पाहात आहोत. अगदी हे किल्लेसुद्धा!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 8:46 am

Web Title: trek on fort
टॅग : Marathwada,Treck It
Next Stories
1 अक्षरभ्रमंती: एका आडवाटेची सफर
2 ट्रेक डायरी:वन्यजीव छायाचित्रण शिबिर
3 दापोलीचा निसर्ग
Just Now!
X