News Flash

धुंद पाबरगड

सोंड वाटली तितकी सहजसोप्पी नव्हती.. सरळसोट चढत जावे लागले होते. दम लागत होता पण वाऱ्याने प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले. आतापर्यंत नजरेआड असणारा पाबरगड समोर आला.

| March 19, 2014 12:57 pm

अक्षरभ्रमंती
सोंड वाटली तितकी सहजसोप्पी नव्हती.. सरळसोट चढत जावे लागले होते. दम लागत होता पण वाऱ्याने प्रोत्साहन देणे सुरूच ठेवले. आतापर्यंत नजरेआड असणारा पाबरगड समोर आला. वाटत होते की गड आता दूर नाही! पण उर्वरित सोंडेचे अंतर, मग डोंगराच्या शेंडय़ाचा भाग. शेंडय़ाला वळसा नि मग कुठे अंतिम चढाई ! एवढय़ा सगळय़ाची टोटल लावली नि मनात एकच आले. ‘‘पाबरा. पाबरा.’’
भल्या पहाटे चढाईला सुरुवात केली होती. डोंगराचा माथा गाठला तेव्हा अंदाज होताच की वळसा घालून जावे लागणार. झालेही तसेच. कातळकडय़ाला बिलगून जाणारी वाट पकडली. ही वाट तशी सरळ नि कारवीच्या झाडीने वेढलेली. या वाटेवरूनच रांगडय़ा पाबरगडाची उंची लक्षात येते. पुढे ही वाट घळीतल्या एका कातळटप्प्यापाशी आणून सोडते. हा सोप्पा चढ पार करूनच आम्ही खऱ्या अर्थाने पाबरगडाला हात घातला होता. आतापर्यंत इतके अंतर तुडवूनही आम्हाला अजून अपेक्षित असणारी गुहा काही सापडली नव्हती. खाली दिसणारा आजूबाजूचा परिसर धुक्यात अंधुक दिसत होता. बरीच उंची गाठल्याची साक्ष होती. पण वरती पाहिले तर पाबरगडाने अगदी आपल्या मानेपर्यंत जणूकाही ‘कारवी’चा मफलर गुंडाळला होता. या मफलरमधून मार्ग काढताना चढ जरा जास्तच अंगावर येत होता. आमचे त्रिकूट आता गळून पडले होते. जो तो आपापल्या दमाने चढू लागला. एकमेकांना आवाज द्यायचा तर सुसाट वारा नि त्याच्या तालावर फडफडणारी कारवीची झाडी यांनी एकच कल्ला सुरू केला! शेवटी तो कारवी पेशल मफलर पार झाला आणि गुहा सापडली.  इथून एक वाट कातळकडय़ात कोरलेल्या पायऱ्यांनी वरती घेऊन जाते तर एक वाट उजवीकडे या गुहेकडे. मुक्कामासाठी अगदी प्रशस्त!  बिलगून अजून एक गुहा. जिथे पाण्याचे टाके आहे. पाणी पिण्यास योग्य! बाजूस खडकातच कोरलेली शंकराची िपड आहे. सगळे वातावरण प्रसन्न नि शांत. उन्हाला या परिसरात शिरकावच नव्हता. त्यात मध्येच ढगांचे पुंजके गुहेच्या तोंडापाशी आले नि आमच्यासमोर जणू पडदाच उभा रहिला. पुढे वाऱ्याने ढग हलले तरी आम्ही वर नि ढग खाली अशी अवस्था झाली. कित्येक काळ पाहात राहावे असे ते दृश्य. धुंद करणारे! संपूर्ण ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी खालील लिंक पाहणे http://yorocks.wordpress.com/2014/03/10

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2014 12:57 pm

Web Title: trek to pabargad
टॅग : Hiking,Trekking
Next Stories
1 त्यांचे गिर्यारोहण
2 ‘स्लिपिंग बॅग’चे विश्व!
3 ट्रेक इट: हिमालयातील भटकंतीच्या वाटा
Just Now!
X