मुंबईच्या ‘चक्रम हायकर्स’ संस्थेतर्फे दरवर्षी सहय़ाद्रीतील एखाद्या भागात पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले जाते. ‘सहय़ांकन’ नावाने चालणारा हा उपक्रम नुकताच पार पडला. यंदा ही मोहीम जावळी खोऱ्यातून महाबळेश्वर, जोर खोरे, रायरेश्वर, शिवथरघळ, मढेघाटमार्गे लिंगाण्याला स्थिरावली. सहय़ाद्रीचे दर्शन घडवणाऱ्या या मोहिमेचा वृत्तान्त.
होऊ दे खर्च ..’ तसेच ‘होऊ दे ट्रेक.., खुमखुमी असेल, तर या भिडा सहय़ाद्रीला..’
‘सहय़ांकन’ मोहिमेवर नजर टाकल्यावर सर्वप्रथम अशीच काहीशी प्रतिक्रिया उमटली. पोलादपूरजवळच्या दाभिळ गावातून सुरू होणारे हे ‘सहय़ांकन’ प्रतापगडजवळून महाबळेश्वर, जोर खोरे, कोळेश्वर-रायरेश्वर पठार, शिवथरघळ, मढे घाटातून लिंगाण्यापर्यंत पोहोचणारे होते. ..सारी वाटच सहय़ाद्रीच्या अंगाखांद्यावरून, त्याचा नव्याने शोध घेणारी होती.
२३ डिसेंबरच्या भल्या पहाटे दाभिळ गावातून आम्ही या मोहिमेचा येळकोट केला. सर्वच चेहरे नवीन, पण सहय़ाद्री तर होता ना! मग त्याच्याशीच संवाद साधत डोंगरचढाईला सुरुवात झाली. झाडाझुडपांची सोबत होतीच. तीन तासांच्या ‘घनगर्द’ चढाईनंतर, वाडा कुंभरोशीला पोहोचलो. उजवीकडे प्रतापगड हाकेच्या अंतरावर होता. त्याला मुजरा करत जावळी खोऱ्यात शिरलो. पहिलेच गाव दरे. या गावाचे ‘लोकेशन’ मात्र फारच भन्नाट. दऱ्याखोऱ्यातून उठून दिसणारे. काही काळ छायाचित्रण झाले आणि पुढे निघालो.
आता वाट निसणीच्या खडय़ा चढाईने श्रीक्षेत्र महाबळेश्वरकडे निघाली. इथेही झाडांमधून वाट काढत चढाई सुरू झाली. भीती दाखवणाऱ्या ‘ऑर्थरसिट’च्या खालून ‘श्रीक्षेत्र’ला पोहोचलो. मंदिरात गर्दी होती. मग कळसाचेच दर्शन घेत महाबळेश्वरचा रामराम घेतला. आता वाट जोरकडे कृष्णेच्या खोऱ्यात उतरली.
उतरू लागलो, तसे डोंगरदऱ्या, दूरवरचे कोळेश्वरचे पठार, धोम, बलकवडी धरणाचे निळेशार पाणी, काठावरची छोटी छोटी गावे या साऱ्यांचे विहंगम दृश्य दिसू लागले. जोर गावात उतरेपर्यंत संध्याकाळ दाटून आली. गावातील मंदिरात मुक्काम लागला. जेवण होईपर्यंत बाहेरचा आसमंत शुभ्र चांदव्याने भरून गेला होता. धोम धरणाचे पाणीही त्यावर चकाकत होता. त्याला साठवतच झोपी गेलो.
दुसरा दिवस पहाटे पाच वाजता उजाडला. चहा, नाश्ता, पॅक लंच घेत आम्ही कोळेश्वर पहाडाला भिडलो. प्रसन्न सकाळ उत्साह वाढवणारी होती. त्याच उत्साहात मग चढाई सुरू झाली. अडीच तासांत कोळेश्वरच्या देवळात पोहोचलो. क्षणभर विश्रांती आणि धनगरवाडीत ताक पीत पुढे निघालो.
आता मस्त जंगलसपाटी आली. जरा हायसे वाटले. काही वेळातच कोळेश्वर पठाराच्या काठावर आलो. समोर उत्तरेला रायरेश्वर पठाराची अफाट डोंगरधार, पायथ्याशी जांभळी गाव अन् दूरवर धोम धरणाचा पसारा दिसत होता. सर्व दृश्य अफलातून. अगदी ‘७० एमएम’चा नजराणा! मनसोक्त छायाचित्रण केले आणि जांभळी गावात उतरलो.
एका शेतक ऱ्याच्या अंगणात उतरलो. जेवण, घटकाभर विश्रांती घेत नाही तोच ‘लीडर भाऊं’नी लगीन घाई सुरू केली. ‘चला..चला..’ भर उन्हातच रायरेश्वराच्या डोंगराला भिडलो. नािखद्याला सलामी दिली. अफाट रायरेश्वराला या वेळी ओंजारून गोंजारून घ्यावेसे वाटले. आमच्या शिवबाने याच रायरीच्या मस्तकी स्वातंत्र्याचे अग्निकुंड पेटविले होते.
‘होऊन जाऊ दे’ अशी आरोळी ठोकत, कारवीचे रान कापत, मावळतीच्या वेळी आम्ही नािखद मुक्कामी पोहोचलो. ही जागा ज्यांनी निवडली त्या ‘चक्रमां’ना त्रिवार सलाम! सांजसंध्या दाटून आली होती. या मावळतीच्या रंगात दक्षिणेचा कोळेश्वर न्हाऊन निघाला होता.
रात्री जेवणे झाली आणि त्या शांतवेळी तंबूतून सारे पठार साद घालू लागले. नािखद्याचे पठार लख्ख चांदण्यात गूढरम्य अवस्थेत निपचित पडलेले. चांदण्यांच्या या सुखवर्षांवात मन न्हाऊन निघालेले. निखळ शांतता वातावरणाच्या अणुरेणूत दाटलेली. सहय़ाद्रीच्या तळहातावरची ती उत्तररात्र स्वप्नांच्या िहदोळय़ावर झुलत होती.
तिसरा दिवस. बेलभंडार उधळत उगवतीच्या रंगात सकाळ उजाडली. नािखदहून भल्या सकाळीच दाट जंगलांची मोठी वाट तुडवत कडय़ावर आलो अन् निखालस सौंदर्याने बेभान झालो. सहय़ाद्रीचे सौंदर्य किती म्हणून प्यावे? दूरदूरवर क्षितिजापर्यंत सामावलेला हा सहय़ाद्री ध्यानस्थ ऋषीसारखा! ..इतिहासाची कितीतरी गुपित यात दडलेली असतील! मनोमन कल्पनेनेही शहारायला झाले.
कॅमेऱ्यांचा किलकिलाट झाला आणि आम्ही पुढे निघालो.
कु डली खुर्दला दुपारचे जेवण झाले. आता दिशा होती मोहनगडाकडे. खडी जंगल चढाई मदमस्त. सहय़ाद्रीचा रांगडेपणा आता अंगाअंगात भिनू लागलेला. माथ्यावर पोहोचलो. महादेवापुढे नतमस्तक झालो आणि मग शिरगावात उतरलो. आज कुंड गावात मुक्काम होता. गावातील कुंडावर बॅटरीच्या उजेडात अंघोळीचा कार्यक्रम उरकला आणि गाणी गात-ऐकत झोपी गेलो.
चौथा दिवस! भल्या सकाळीच उभ्या महाराष्ट्राचे धार्मिकतेचे अधिष्ठान असलेल्या शिवथरघळीकडे निघालो. वाट भयंकर घसरडी-उतरणीची होती. घनदाट झाडांचा सहवास तेवढा सुखद वाटत होता. त्यांचाच आधार घेत, घाटमार्गाने शिवथरघळीत प्रवेशलो. रामदास स्वामींच्या सहवासाने पावन झालेली ही भूमी. दासबोधचे लिखाण याच निसर्गरम्य कातळ गुहेत झाले. शांत निवांत परिसर. दर्शन घेतले आणि पुढे मढेघाटाकडे निघालो. हा घाट खडय़ा चढईचा, तिरकस चालीचा. सिंहगडाच्या घनघोर लढाईत धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे यांचे धड याच घाटवाटेने त्यांच्या जन्मगावी उमरठला नेण्यात आले. यामुळे या घाटाचेच नाव मढेघाट झाले.
..सहय़ाद्री जेवढा कणखर तेवढाच तो हळवा!
तीन तासांच्या थकवणाऱ्या चढाईनंतर माथा गाठला. तिथून हाकेच्या अंतरावरील केळदला मंदिरात मुक्कामी पोहोचलो. ‘चक्रमां’बरोबरचा अन् सहय़ाद्रीतला आज शेवटचा मुक्काम.
पाचवा दिवस. सकाळीच मोहरी गावापर्यंत आलो. तिथून रायिलगच्या पठारावर पोहोचलो. िलगाणाचे मर्दानी वैभव बघून पाच दिवसांची सहय़ाद्री यात्रा सफल झाल्यासारखे वाटले. दूरवर रायगड दिसत होता. त्याच्या केवळ दर्शनाने आठवणींचे काहूर माजले. लिंगाण्याला साठवतच परतीला निघालो. सिंगापूर नाळेचा मार्ग. गच्च झाडांचे रान, लहान लहान वळणांची पाऊलभर वाट. माथ्यावर गर्दहिरव्या पानांची काळीभोर सावली आणि सोबतीला आनंदच आनंद!
सहय़ाद्रीच्या अनवट वाटेवरचा हा अखेरचा टप्पा होता. गेल्या पाच दिवसांच्या वाटचालीत त्याला अधिक जवळून पाहता-अनुभवता आले. त्याच्याशी असलेले मैत्र अधिक घट्ट झाले.
संजय अमृतकर