News Flash

वासोटा

अनेक पक्षी, असंख्य किडे-नाकतोडे आणि फुलपाखरं पहात आपण १५ मिनिटांत ‘मारुती गणेश’ कट्टय़ावर पोहोचतो. ‘वासोटा ३.५ कि.मी.’ असं लिहिलेला हा मारुती कट्टा गडाचा ‘स्टार्टिग पॉईंट’

| January 17, 2013 02:04 am

साताऱ्याचा परिसर ट्रेकर्समध्ये फार प्रसिद्ध; म्हणूनच सुट्टय़ा लागल्या रे लागल्या की अस्सल भटक्यांची पावलं आपोआपच इकडे वळतात. कोयनेचा शिवसागर जलाशय आणि त्याच्या भोवतीचे  जंगल तर भटकंतीसाठी नंदनवनच! या निबीड अरण्यातच एक ढाण्या वाघ कधीचा दबा धरून बसला आहे, – वासोटा!
राजा भोजने बांधलेला शिलाहारांचा हा एक महत्त्वाचा गड! पुढे मराठय़ांच्या हाती असलेला आणि नंतर ताई तेलिणीच्या प्रसिद्ध लढय़ामुळे लक्षात राहिलेल्या या वासोटय़ाबद्दल प्रत्येकच भटक्याच्या मनात प्रचंड कुतूहल असते. पण दुर्गम भाग आणि ‘व्याघ्रगड’ हे नाव सार्थ ठरवेल असे घनदाट अरण्य; भोवतीने पुन्हा कोयनेचा जलाशय यामुळे या गडाला भेट देणं तसे सहजशक्य नाही. गिरीदुर्ग, वनदुर्ग आणि  काही अंशी जलदुर्ग असलेल्या या किल्ल्यावर मित्र आणि सुट्टय़ांचा मेळ जमवत मोहीम आखली.
वासोटय़ाला जाण्यासाठी पहिले सातारा गाठावे लागते. साताऱ्याहून बामणोलीला भल्या सकाळी यायचे.  पहाटे निघालो, की वाटेत धुक्यात हरवलेला समर्थाचा सज्जनगड दिसतो. पुढे ते जगप्रसिद्ध कासचं पठार लागते. ते जाते तोच केवळ ‘स्वर्गीय’ म्हणावा असा कास तलाव येतो. मुळा मुठेच्या काठी राहणाऱ्या पुणेकरांस इतकं विशुद्ध पाणी बघून धक्काच बसतो! तो पचवत आपण पुढे जायचे तो एका वळणानंतर दूरवर धुक्याच्या दुलईत पहुडलेला वासोटा पहिलं दर्शन देतो आणि त्याच क्षणी  आपल्या मनात तो घर करतो. तासाभराच्या या प्रवासाअंती आपण बामणोलीत पोहोचतो.
वासोटा आणि आजूबाजूचा प्रदेश आता ‘कोयना व्याघ्र प्रकल्पां’त येतो. त्यामुळे गडावर येण्या-जाण्यासाठी काही नियम आहेत. सूर्यादयानंतर जायचे आणि सूर्यास्तापूर्वी परतायचे. ते देखील वनखात्याची परवानगी घेत. हे सोपस्कर पार पडले, की लांॅच बुक करावी लागते. हे सगळे सोपस्कार संपवून आपण लॉंचमध्ये जाऊन बसायचं.
निळंशार पाणी कापत बोट पुढे जाऊ लागते. हिरव्या झाडांनी गच्च भरलेल्या डोंगरावर मध्येच ऐनाची लाल झाडं खुलून दिसतात. काही झाडं काठावर डुंबत, तर काही चमचमणाऱ्या पाण्याच्या चक्क मधोमध उभी असतात. बोट थोडी वळते तेव्हा एका रेषेत जुना वासोटा, वासोटा आणि नागेश्वर सुळका असा अतुलनीय नजारा दिसतो. नशीब असेल तर किनाऱ्यावर पाणी पिणारे रानगव्याचे कळप आणि आकाशात भराऱ्या मारणारा गरुडही दिसू शकतो. मग बोट शेवटी आपल्याला ‘मेट इंदवली’ येथे उतरवते. इथले माहिती दालन पाहायचे. त्या बाजूच्या एकुलत्या अनेक पक्षी, असंख्य किडे-नाकतोडे आणि फुलपाखरं पहात आपण १५ मिनिटांत ‘मारुती गणेश’ कट्टय़ावर पोहोचतो. ‘वासोटा ३.५ कि.मी.’ असं लिहिलेला हा मारुती कट्टा गडाचा ‘स्टार्टिग पॉईंट’ आहे. फ्रीजचे पाणी गरम वाटावं इतकं थंड पाणी बाजूच्याच एका झऱ्यातून वाहत असतं. ते बरोबर घ्यायचं आणि गड चढू लागायचा.
पावसाळ्यात इथे येणं अशक्य. त्यामुळे डिसेंबर हा सर्वोत्तम काळ. माती अजूनही थोडी ओलसर असते. भर दिवसा रातकिडय़ांचा आवाज येत असतो, वाघाच्याही अंगावर काटा येईल इतकं दाट जंगल!
पायवाट धरून, आरडा ओरडा न करता आपण चाललो तर जंगलाचा खजिनाच आपल्यासाठी खुला होत जातो. बिबटे, तरस, रानमांजर, हरणं, गवे आणि पट्टेरी वाघही आपल्याला दिसू शकतात. आपली नजर आणि कान थोडे सरावले की दूर कुठूनतरी सुतारपक्ष्याचा ‘टकटक टकटक’ असा आवाज ऐकू येतो. जवळच प्राणी असल्याची चाहूल लागते,पण जंगलाच्या अनेकविध रंगांमध्ये बेमालूमपणे लपलेले प्राणी दिसणे महामुश्कील! जिथे झाडं कोसळलेली असतात अशा ठिकाणीच ऊन जमिनीपर्यंत पोहोचू शकतं. इथे हमखास रंगीबेरंगी छत्र्या उगवलेल्या दिसतात. यांचे रंग इतके जादुई, की हे हॉलीवूडचे ‘स्पेशल इफेक्टस्’ आहेत की काय असं वाटतं.
असो. काही वेळाने एक फाटा उजवीकडे नागेश्वरकडे जातो. आपण आपला मोर्चा डावीकडे वळवायचा. मजल दरमजल करत, थकलेल्या पायांस धीर देत हे जंगल आणि त्यापुढे एक खडकाळ  पॅच पार करून शेवटी आपण गडमाथ्यावर पोचतो. मागे वळून पाहिल्यास दूर बोटीने जिथे सोडले तो पॉईंट दिसतो आणि मधले अफाट जंगल आपण खरंच पार करून आलोय यावर विश्वासच बसत नाही.
वर आल्यावर एक छोटं मारूती मंदिर आणि बाजूला एक तळं लागतं. इथे थोडावेळ विसावायचं आणि मग निघायचं उत्तरेला. एक जुनं पुराणं जीर्ण असं महादेवाचं मंदिर पुढे दिसतं. शंकराला नमस्कार करायचा आणि समोर जाऊन एक दगडी कमान आणि पुढची मोकळी जागा म्हणजे कोठडी असे अजब ‘ओपन जेल’ बघायचे. सिद्दी जौहरला मदत करून मराठय़ांना दगा देणाऱ्या टोपीकरास महाराजांनी इथेच डांबून ठेवलं होतं.
मग पुढे जाऊन उत्तर टोकावर जायचं आणि उत्तुंग नागेश्वर सुळके न्याहाळायचे. ते कातळकडे पाहून वेगळाच थरार अनुभवता येतो. मग परत मागे येऊन पश्चिम टोकावर म्हणजेच अद्भुत  कोकणकडय़ावर जायचं. निळ्या रंगाच्या अनेकविध छटा धारण केलेल्या असंख्य डोंगररांगा कोकणभूमीकडे धावत असतात. इथून कोकणातल्या चोरवणेत उतरणारी वाटही दिसते. आता जायचे गडाच्या दक्षिण टोकावर. समोर पाहतो तर अजस्त्र, महाकाय हे शब्दही खुजे पडावेत असा जुना वासोटा आपला ताशीव कडा मिरवत उभा असतो. गंमत अशी, की छातीत धडकी भरवणाऱ्या या कडय़ाचे नाव ‘बाबू कडा’ असे आहे.
हे सारे पाहताना आपल्या पुढय़ात भगवा ध्वज डौलाने फडकत असतो. वर आकाशात वाऱ्याशी स्पर्धा करत ससाणा झेपावत असतो. चोहीकडे नजर फिरवायची. असा रौद्रगिरी जो साधं चढणं कर्मकठीण, तिथे गड बांधून, राखून आणि लढवून दाखवणाऱ्या मराठय़ांबद्दल आदर चौगुणीत होतो. स्वत:च्या मोठेपणाबद्दलच्या नसत्या कल्पना, माज तत्क्षणी उद्ध्वस्त होतो.

  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 2:04 am

Web Title: vasota
टॅग : Forest,Satara
Next Stories
1 विजयदुर्ग संमेलनात परिसंवाद, प्रदर्शने, माहितीपटांचे आकर्षण
2 ‘साहस’ दर्शन!
3 चिलिका सरोवर
Just Now!
X