बिदर आणि गुलबग्र्याचा नुकताच एक अभ्यास दौरा केला. या वेळी केवळ कुतूहल म्हणून बसवकल्याणला भेट दिली, आणि अचानक धनाचा हंडा सापडावा तसे झाले. हा हंडा म्हणजेच बसवकल्याणचा किल्ला.
चालुक्य घराण्याची प्राचीन राजधानी कल्याणी म्हणजेच आजचे बसवकल्याण.चालुक्यानंतर येथे कलचुरी राजवट होती. बिज्जल कलचुरी या राजाकडे बसवराज हे भांडारप्रमुख होते, त्यामुळे त्यांना ‘भक्ति भंडारी’ असेही म्हणत.हे धार्मिक होते व त्य़ांना समाजातल्या विषमतेचा तिटकारा होता. यांनीच वीरशैव (िलगायत) पंथाची स्थापना केली. यांचे नावावरूनच या गावाला बसवकल्याण हे नाव पडले.
बसवकल्याण, सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गालगतच आहे. येथे येण्याकरिता सोलापूर, गुलबग्र्याहून अनेक बस उपलब्ध आहेत. गावात शिरणाऱ्या रस्त्याने तसेच सरळ गेल्यावर अध्र्या किमीवर किल्ला आहे. किल्ला एका छोटयाश्या टेकाडावर आहे. किल्ल्यात शिरताना एक भव्य दगडी दरवाजा लागतो. येथून आत प्रवेश केल्यावर एक मशीद, एक पटांगण, एक छोटीशी इमारत आणि काही ओवऱ्या लागतात. पण हे सर्व काम अलिकडच्या काळातले, हैदराबादच्या निजामाचे आहे. या नंतर किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार लागते. ह्य़ा द्वारानंतर एक खन्दक आहे. त्यावरून पुढील दरवाजाशी येतो. या गोमुखी दरवाजाचे वर एक गुप्त सज्जा असून येथून लक्ष तर ठेवले जातच असे; पण वेळप्रसंगी येथून उकळते तेल अथवा निखारे खाली सोडण्याची व्यवस्थाही होती. आतमध्ये ओवऱ्या असून येथे आवश्यक त्या नोंदी ठेवल्या जात.या पुढे वळणा वळणाच्या मागोने पाच दरवाजे लागतात. हे सर्व दरवाजे वैशिष्टय़पूर्ण आहेत. हे ओलांडल्यावरच मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो. म्हणजेच कोणाही गर व्यक्तीला प्रवेश केवळ अशक्यच. वाटेतील सर्व िभतींवर अनेक शरभ(राजसत्तेचे प्रतीक असलेला काल्पनिक प्राणी)आहेत. किल्ल्यात रंगीन महल, हैदरमहल, दरबारमहल असे काही महाल आहेत आणि ते बऱ्यापकी शाबूत आहेत. रंगीन महल हे विलास मंदिरच होते. याच्या िभतींवरील गिलाव्यात सुरेख नक्षीकाम आहे, कारंजे आहे.दरबारमहल या वास्तूला दरबार हॉल म्हणत असले तरी त्याच्या एकंदर स्वरूपावरून हे जनान्यासाठी बाग आणि क्रीडास्थान असावे. येथे एक ओटा असून त्या समोरील विस्तीर्ण आयताकृती प्रांगणात मधोमध एक संपूर्ण लांबीचा पाण्याचा पाट आहे. याच्या एका बाजूला पाण्याचा कृत्रिम धबधबा आहे. िभतीवर वेलबुट्टया आहेत. हे सर्व स्थापत्य मुस्लीम शैलीचे आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लीम राजवटीत येथे कधीही राजसत्ता नव्हती. महम्मद तुघलकाने कलचुरींचा पाडाव केला. या नंतर मोगल, विजापूर आणि अखेरीस हा किल्ला हैदराबादच्या निजामाचे ताब्यात होता. या किल्ल्याचे मध्यभागी एक मंदिर आहे. आत कोणतीही मूर्ती नाही. येथे आधी देवी होती असे सांगतात, मग येथे बसवराजाची मूर्ती होती. याचे बाजूला एक दर्गा आहे पण बांधणीवरून हेसुध्दा देऊळच असावे असे वाटते.
या किल्ल्याला एकूण १६ देखणे बुरूज आहेत. प्रत्येक बुरूजावर वॉचटॉवर असून त्यावर तोफ आहे. एका बुरूजावर नऊगज नावाची अजस्र तोफ आहे. आणि यातील सर्वोच्च बुरूजावर आहे एक आश्चर्य, ‘कडकबिजली’ तोफ. ही एक दिमाखदार तोफ आहे. ही मकरमुखी (तोंड मगरीच्या तोंडासारखे) पंचरशी तोफ असून तिच्यावर अप्रतिम कोरीव काम केलले आहे. हिच्या वरील कोरीव कामात मीनावर्क केलेले असून सोनेरी नक्षीकामही आहे. ऊन-पाऊस खाऊन आजही हे नक्षीकाम सुस्थितीत आहे.आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ही  एका आसावर बसविली असून ती ३६०अंशात आजही सुलभतेने फिरविता येते. या तोफेची सर्व यंत्रणा आजही व्यवस्थित आहे. मी तरी आजपावेतो अशा अवस्थेतील तोफ पाहिली नव्हती.या बुरूजावरून अतिदूरच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येते. या किल्ल्यातले आणखी एक नवल म्हणजे येथील हैदरमहालाजवळ असलेला तालीमखाना. ही तालीम इमारतीच्या तळघरात असून ती केवळ खाशांकरिता होती. किल्ल्याच्या मागील बाजूस जलतरण तलावही आहे. पाणी खेचण्याकरिता मोटेची व्यवस्था आजही दिसते. पाणी साठवण्याचीही सोय होती.                                                                 
या लेखाचा शेवट कर्नाटक सरकारचे आभार मानल्याशिवाय करताच येत नाही, कारण येथे सरकारी रक्षक नेमलेले आहेत आणि महतत्त्वाचे म्हणजे ते जागेवर असतात. आवश्यक ठिकाणी कुलुपे लावलेली आहेत आणि ती अभ्यासकांकरिता, पर्यटकांकरिता उघडली जातात. अशीच सोय बिदर आणि गुलबर्गा येथेही आहे. काश! महाराष्ट्र सरकार असे काही करेल तर काय होईल? याला जोडून आपण बिदरलाही भेट देऊ शकता. बिदरमध्येही आपणास खूपकाही बघता येईल. तीच गोष्ट गुलबग्र्याची.  रस्त्यातच जलसंघी येथे चालुक्यकालीन विष्णुमंदिर(सध्या शिवमंदिर) आहे. उन्हाळा सोडून येथे कधीही जाऊ शकता. निवास आणि भोजनही अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहे.