वर्षां ऋतूचे आगमन झाले, की काही दिवसांतच साऱ्या डोंगरदऱ्या हिरवाईने नटून जातात. हिरवाईने नटलेल्या या गिरिशिखरांवरून असंख्य जलधारा वाहू लागतात. पश्चिम घाटात तर जागोजागी या अशा जलधारांमधूनच पाऊस दिसू लागतो. या अशाच काही महत्त्वाच्या जलधारांची ही भटकंती.


मार्लेश्वर धबधबा

रत्नागिरी जिल्हय़ातील हे प्रसिद्ध ठिकाण. देवरूखपासून २०, साखरपापासून ३० तर रत्नागिरीपासून ६० किलोमीटरवर मार्लेश्वर हे स्थळ आहे. शंकराचे देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या स्थळी भाविकांची नित्य वर्दळ असते. मार्लेश्वरचे हे स्थळ म्हणजे एक गुहा असून, या गुहेच्या पाठीमागे तो प्रचंड धबधबा दरीमध्ये कोसळतो. मुख्य धबधब्याशिवाय भोवतीच्या डोंगरांमधून असंख्य जलधारा वाहात असतात. या साऱ्या पुढे मुख्य जलधारेस येऊन मिळतात. धबधब्याचा भोवतीचा भाग निसरडा असल्याने कठडे लावत तो सुरक्षित केलेला आहे. पण केवळ दर्शन झाले तरी मार्लेश्वरचा हा धबधबा आणि त्याभोवतीचा निसर्ग मन प्रसन्न करतो.


नापणे धबधबा

तळेरे ते वैभववाडी रस्त्यावर हा धबधबा आहे. अर्थात मुख्य रस्त्यापासून तो ४ ते ५ किलोमीटर आत गेल्यावर दिसतो. वैभववाडी रेल्वेस्थानकापासूनही एक रस्ता थेट धबधब्यापर्यंत जातो. या धबधब्याच्या वरील बाजूस रांजणखळगे आहेत. या खळग्यांमध्ये अनेक जण अंघोळ करतात. पण पाण्याचा वाहता प्रवाह आणि निसरडी जागा यामुळे यात धोका संभवतो. हा धबधबा शंभर फूट खोल कोसळतो.


सवतसडा धबधबा

चिपळूणपासून मुंबईच्या दिशेला ५ किलोमीटरवर हा धबधबा आहे. मुख्य रस्त्यापासून उजव्या बाजूस ३०० मीटर झाडीत हा धबधबा दडलेला आहे. रस्त्यावरून हा धबधबा दिसत असल्याने अनेक प्रवासी मुद्दामहून इथे थांबत या धबधब्याचे सौंदर्य लुटतात. तब्बल दोनशे फुटांवरून एका मोठय़ा रांजणखळग्यात हा धबधबा कोसळतो. जांभ्या दगडाच्या पाश्र्वभूमीवर पडणारी ही पांढरीशुभ्र जलधारा पाहताना वेगळाच आनंद होतो.


ओझर्डे धबधबा

कोयनानगर धरणापासून नवजा रस्त्यावर ५ किलोमीटरवर हा महाकाय धबधबा कोसळतो. एकाशेजारी एक अशा तीन प्रवाहांमधून जन्म घेणारा हा धबधबा तब्बल ५०० फुटांवरून खाली कोसळतो. खूप मोठा पाऊस झाल्यावर हे तीनही प्रवाह एकत्र होत त्यांचे एका महाकाय प्रपातात रूपांतर होते. या धबधब्याचे विशाल रूप दुरूनही दिसते. त्याच्या जवळ जाऊ लागतो, तसे त्याच्या उडणाऱ्या तुषारांनी भिजून जायला होते.

ताडोबा जंगल सफारी
ट्वाईन आऊटडोअर्सतर्फे १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान ताडोबा अभयारण्यामध्ये जंगल सफारी आयोजित करण्यात आली आहे. विदर्भातील ताडोबाचे जंगल वाघांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. वाघाबरोबरच येथे बिबळ्या, मगर, अस्वल, रानकुत्रे, हरिण, सांबर असे खूप वन्यप्राणी दिसतात. तसेच स्वर्गीय नर्तक, नीलपंख, गरुड, घुबड असे स्थानिक आणि विविध स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधीही या सफारीमध्ये मिळेल. अधिक माहितीसाठी संपर्क अर्चिस सहस्रबुद्धे ९८९२१७२४६७ किंवा पराग जोशी ९८३३५२४२४८. संकेतस्थळ – http://www.twineoutdoors.com