नाशिकच्या पश्चिमेला त्रंबकेश्वरची डोंगररांग आहे. या त्र्यंबकेश्वरपासूनच दुगारवाडीच्या या जलसौंदर्याकडे जाण्यासाठी वाट आहे. या त्र्यंबकेश्वरपासूनच जव्हारकडे एक रस्ता जातो. या वाटेवर चार किलोमीटर गेले, की सापगावकडे एक वाट वळते. या सपागावहून काचुर्ली गावाकडे एक फाटा फुटतो. या गावातूनच या दुगारवाडी धबधब्याकडे पायवाट निघते.
काचुर्ली हे गाव अगदी डोंगरदरीतले. भोवतीने गर्द झाडी आणि त्यातून दुगारवाडी धबधब्याची ही पायवाट निघते. साधारण एक किलोमीटर अंतर गेलो, की आपण डोंगराच्या एका दरीत खोलवर येतो. जवळ जाताच आधी ‘त्याचा’ आवाज येतो आणि पुढच्या काही क्षणात अचानकपणे ती कोसळणारी शुभ्र धार दिसते.
गर्द हिरवाई आणि काळय़ाभोर कडय़ाची पाश्र्वभूमी घेत ती जलधारा कोसळत असते. या रंगसंगतीत उठून दिसणारा हा देखावा प्रथम दर्शनातच मनाचा ताबा घेतो. त्या उंच कडय़ावरून कोसळणारी ती धार निसर्गाचे ते थोरपणच उभे करत असते. तिच्या या जलशक्तीतून खाली पाण्याचा एक मोठा डोहच तयार झालेला आहे. दुरून दिसणाऱ्या या दृश्याच्या जवळ जाण्यासाठी मात्र थोडेसे साहस आणि सावधपण अंगी असावे लागते. या जोडीलाच गिर्यारोहणाचे दोर बरोबर असतील तर पाण्याचा हा प्रवाह ओलांडणे शक्य होते. अन्यथा हे सौंदर्य दुरून पाहण्यातही मोठी मजा वाटते. निसर्गशांततेत हे दृश्य मनात खोलवर उतरते आणि चार अविस्मरणीय क्षण गाठी बांधले जातात.