scorecardresearch

रम्य सासवने

अलिबाग अष्टागरची हद्द खरेतर अगदी उत्तरेला असलेल्या त्या रेवसच्या खाडीपासून सुरू होते.

सासवन्याचे नाव घेतले, की आणखी एका महान व्यक्तीची आठवण होते.
अलिबाग अष्टागरचा परिसर हा पर्यटकांना कायम खुणावणारा भाग. या अष्टागरमधील सासवने गाव असेच पर्यटकांच्या पायांना गुंतवणारे आणि डोळय़ांना भुरळ पाडणारे. निळय़ाशार समुद्राचे सान्निध्य, नारळी-पोफळीच्या बागा आणि करमरकरांचे शिल्पालय हे सारे पाहताना हरवून जायला होते.
अलिबाग अष्टागरची हद्द खरेतर अगदी उत्तरेला असलेल्या त्या रेवसच्या खाडीपासून सुरू होते. या अष्टागरातील पहिलाच थांबा तो सासवने गाव! माडा-पोफळीच्या बागा, टुमदार घरे, घाटदार मंदिरे, पाण्याने भरलेले तलाव आणि शांत-रम्य समुद्रकिनारा! कोकण म्हणून डोळय़ांपुढे येणारे सारे चित्र सासवन्यात गेले, की समोर उभे राहते आणि या भूमीच्या प्रेमात पडायला होते.
अलिबागहून सासवने साधारण पंचवीस किलोमीटर! अलिबागहून इथे येण्यासाठी रिक्षा, एस.टी. बसची सोय. गावात येण्यासाठी अलिबाग-रेवस रस्त्यावरून एक फाटा फुटतो. वळणावळणाचा हा छोटा रस्ता, पण कोकणची एकेक दृश्ये दाखवत हळूच गावात दाखल करतो. गावच्या शिवेवरच एक मोठा तलाव, पाण्याने भरलेला. भोवतीच्या गावाचे सारे प्रतिबिंब जणू त्यात साठवलेले! काठाशीच एक शिवमंदिर एका मोठय़ा वृक्षाखाली सावलीला बसलेले. गावात शिरतानाच दिसू लागलेली ही अफलातून दृश्ये पुढे गावातून बाहेर पडेपर्यंत आपल्याला आणि बरोबरच्या कॅमेऱ्याला सतत अस्वस्थ करत राहतात.
समुद्रकिनारीचे हे गाव. नारळी-पोफळीत झाकलेले
आणि उतरत्या छतांमधून जमिनीला टेकलेले! या वाडी-वस्तींमधूनच काही घरांमधून पर्यटकांची उतरण्याची सोय होते. तिथे आपली पथारी लावायची आणि स्वच्छंद भटकायला बाहेर पडायचे.
या गावापासून ऐन समुद्रात असलेल्या खांदेरी-उंदेरी या जंजिऱ्यावर मुस्लीम राजवटीत कोणा सरदार शाहसिंगचे
राज्य होते. असे म्हणतात, त्याच्या नावावरूनच इथे ‘शाहसने’
या नावाची वस्ती वसली. जिचेच पुढे आजचे हे सासवने झाले.
पेशवेकालीन काही मंदिरे गावचा इतिहास सांगत असली, तरी स्वातंत्र्य चळवळीतील ‘गांधी आश्रम’ नावाची वास्तू आज गावच्या इतिहासातील खरी भूषण ठरत आहे. स्वातंत्र्यलढा ऐन भरात असताना या सासवन्यातही त्याचे यज्ञकुंड धगधगले होते. यातूनच मग अण्णासाहेब मोरे, गजाननशेठ देवळेकर, आचार्य ढवण, तात्यासाहेब कोलते आदींच्या पुढाकारातून १० मे १९२१ रोजी गावात एक आश्रम आणि शाळा सुरू करण्यात आली. या आश्रमाला १९२७ मध्ये प्रत्यक्ष महात्मा गांधींनी भेट दिली. ते आले होते दिवसभरासाठी, पण इथल्या निसर्गसौंदर्याच्या प्रेमात पडून त्यांनी आपला मुक्काम चार दिवसांसाठी वाढवला. त्यांच्या या भेटीपासून ही वास्तू ‘गांधी आश्रम’ नावाने ओळख देऊ लागली. स्वातंत्र्यलढय़ाचा साक्षीदार बनलेल्या सासवन्यातील हा ‘गांधी आश्रम’ जरूर पाहावा.
सासवन्याचे नाव घेतले, की आणखी एका महान व्यक्तीची आठवण होते. ती म्हणजे जगविख्यात कलाकार विनायक पांडुरंग करमरकर! विसाव्या शतकात होऊन गेलेल्या या जगप्रसिद्ध कलाकाराने आपली उभी हयात चित्र आणि शिल्प घडविण्यात घालवली. त्यांची ही जन्म आणि कर्मभूमी! त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी तयार केलेल्या ‘त्या’ सर्व कलाकृती इथल्या त्यांच्या टुमदार घरात मांडून ठेवल्या आहेत. हा संग्रह आणि त्याचे प्रदर्शन म्हणजे करमरकर शिल्प संग्रहालय! करमरकरांनी घडवलेली ही माणसे, जिवंत केलेले देखावे आणि व्यक्त केलेले प्राणिप्रेम असे इथले सारेच विषय मंत्रमुग्ध करून टाकतात. त्यांचा मोरू नावाचा नोकर, त्या मायेच्या पुतळय़ा-सुरसुंदरी, लहानग्यांचे निरागस भाव, छत्रपती शिवरायांच्या करारी मुद्रा, अंध महिलेचे चाचपडणे आणि अशाच कितीतरी..या सर्व कलाकृती पाहताना भान हरपायला होते आणि आपलाच पुतळा होतो.
सासवन्यातील या दोन वास्तू पाहून झाल्या, की इथल्या शांत-रम्य भवतालाकडे वळावे. इथले प्रत्येक घर, त्याभोवतीची वाडी म्हणजे एक प्रेक्षणीय स्थळ! नारळी-पोफळीच्या या बागांमध्ये निवांत पहुडणे हे फक्त अनुभवण्यातले आहे. गावाला खेटून तो खाऱ्या पाण्याचा समुद्र, पण या प्रत्येक वाडी-बागेत एकेक गोड-थंडगार पाण्याचा आड! एखाद-दुसऱ्यावरचा रहाट अद्यापही कानी गुंजत असतो. सासवन्यातील हा शांत-निवांत वेळही मनाला एक ‘सुकुन’ देऊन जातो.
गावाला खेटूनच समुद्रकिनारा आहे. फक्त त्याचा काठ खडक आणि खड्डय़ांनी भरलेला. यामुळे पाण्यात उतरण्यासाठी तो थोडासा धोकादायक. पण संध्याकाळी इथे या किनारी यावे. सुरूचे बन आणि मऊशार वाळूतून समोर त्या अथांग सागरावरून मावळत्या दिनकराला डोळे भरून पाहावे आणि सासवन्याची आपली भेट चिरंतन करावी!

– अभिजित बेल्हेकर
abhijit.belhekar@expressindia.com

मराठीतील सर्व Trek इट ( Trekit ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article on alibaug scenery

ताज्या बातम्या