हरिश्चंद्रगडला भटक्यांच्या जगात वेगळे स्थान आहे. या गडावर जाण्यासाठी विविध वाटा जातात. पुण्याकडून जाणारी खिरेश्वरची वाट, नगर-राजूरकडून येणारी पाचनईची वाट, जुन्नर दरवाजाची आडमार्गे वर जाणारी वाट तसेच कल्याणहून चढणारी सावर्णे-बेलपाडाकडील उभ्या कडय़ाला अंगावर घेत चढणारी वाट अशा अनेक वाटा या गडावर चढतात. यातील नळीची वाट ही जातीच्या भटक्यांना सतत खुणावत असते. आम्ही मित्रांनी नुकतीच या ऐन कडय़ावरून हरिश्चंद्रगडाची मोहीम केली.
नळीची वाट डोंगरदऱ्यातून, कडय़ावरून वर चढणारी आहे. या वाटेवर येण्यासाठी अगोदर माळशेज-कल्याण रस्त्यावरील सावर्णे गावी यावे लागते. या गावाच्या पुढे बेलपाडा मार्गे नळीच्या वाटेने गडावर जाता येते. आम्ही या मोहिमेसाठी आदल्या रात्रीच सावर्णे गावी मुक्कामी आलो. तिथेच एका अंगणात विश्रांती घेतली आणि सकाळी मोहिमेला सुरुवात केली.
बरोबर भरपूर सामान होते. त्याचे ओझे सांभाळत आमची ही मजल-दरमजल सुरू झाली. सुरुवातीची बरीचशी वाट ही नदीपात्रातून होती. नदीतील दगडगोटय़ांमधून वाट काढणे अवघड जात होते, पण चालणे क्रमप्राप्त होते. हा रस्ता आणि पाठीवरच्या ओझ्यामुळे थकायला झाले. शेवटी एका ठिकाणी विश्रांती घेतली आणि पुढे निघालो. पुढे आम्ही एका झाडीत शिरलो. याच दरम्यान काही ढोरवाटांमुळे आमची वाट चुकली आणि मूळ वाट शोधण्यात पुन्हा तास-दीड तास वाया गेला. या साऱ्यांचाच मनस्ताप करत पुढे निघालो.
आता डोंगर चढाई सुरू झाली. एका भल्यामोठय़ा सुळक्यापाठीमागून आमचा रस्ता निघाला. काही अंतरावर दोन डोंगरांच्या मधून एका घळीतून वर सरकणारी ही वाट मिळाली. डोंगरावरील पाण्याच्या प्रवाहाने हा नळीसारखा मार्ग तयार झालेला. काही अंतर मुक्त चढाई केल्यावर लगेचच पहिला उभा कातळ (रॉकपॅच) सामोरा आला. कडय़ाला दोन हात करायचे होते. दगडांचा, त्यातील खोबण्यांचा आधार घेत कसेबसे वर आलो.
घळीत आता गार वारा सुटला होता. तो अंगाला झोंबत होता. काही अंतरावर दुसरा ‘रॉकपॅच’ आला. हा पहिल्यापेक्षा थोडा अवघड. मग दोर बांधले आणि दोरीच्या साहाय्याने आम्ही वर आलो. हा टप्पा ओलांडताच हरिश्चंद्रगडावरील रोहिदास शिखर दिसू लागले.
आता पुन्हा थोडीशी झाडी लागली. या झाडीतून वर जात असतानाच पाऊस सुरू झाला. ऐन घाटमाथ्यावरचा हा पाऊस टोचत होता. पावसापाठी पुन्हा धुके आले. थोडय़ा अंतरावर पुन्हा कातळकडय़ाचा तिसरा टप्पा आला. पुन्हा दोर बांधले गेले. हा चढून वर आलो आणि कोकणकडय़ाचे दर्शन घडले. हरिश्चंद्रगडाची ही खास ओळख. त्याचे दर्शन होताच सगळय़ांनाच स्फुरण आले. काही वेळातच आमची ही जीवघेणी चढाई पूर्ण झाली आणि आमची पावले हरिश्चंद्रगडाच्या माथ्याला लागली. एका वेगळय़ा वाटेने गडचढाई करण्याचा हा अनुभव वेगळा होता. ऐन पावसाळय़ात कडय़ाला दोन हात करण्यात थरार होता. हा सारा अनुभव आम्ही घेतला आणि धुक्याच्या त्या चादरीमध्ये हरिश्चंद्रगडाच्या गुहेत लुप्त झालो.
– महेश पांढरे