नवरा, नवरी, करवली, शेंडी, टोक आणि त्यांचा सोबत जोडलेले तिथले ठिकाण अशी बरीच नावे सुळक्यांच्या बाबतीत परिचयाची आहेत. पण ‘फंटय़ा’ हे नाव का, असा प्रश्न मला आजही सतावत आहे. नावातच ‘फन’ असल्याने बहुधा आम्हीही त्याच्याकडे आकर्षित झालो आणि त्याच्यावर चढाईसाठी सरसावलो. 

माळशेज घाट परिसराची भूमी म्हणजे उभे कडे, सुळके यांनी नटलेला प्रदेश आहे. बहादुरांसाठीची तर ही जणू पंढरीच आहे. इथे जागोजागी असलेले अनेक बेलांग कडे, सुळके सतत साहसवीरांना आव्हान देत असतात. याच घाटाच्या मध्यावर एक सुळका आम्हाला नेहमीच खुणावत होता. त्याला स्थानिक जीवनात काही विशेष ओळख नसल्याने नाव-गावही नाही मग आमच्या सारख्या भटक्यांनीच कधीकाळी त्याचे नामकरण केले-फंटय़ा! आता हे असे का केले कळले नाही, पण सह्याद्रीच्या परिवारात हे तितकेसे जुळत नाही.
असो, तर हा फंटय़ा सुळका आहे, ऐन माळशेज घाटात. घाटातील बोगद्याच्या अलीकडे साधारण अर्धा किलोमीटरवर एका वळणाजवळ. फंटय़ा म्हणजे ना धड सुळका ना धड कडा.. अशा प्रकारातील भूशास्त्रीय रचना आहे. पण मग या अशा अवस्थेमुळेच त्यावरील प्रस्तरारोहणात खूप मजा दडलेली आहे. उंची दीडशे फूटच आहे, पण त्यावरची चढाई तांत्रिक स्वरूपाची असल्याने ती अवघड श्रेणीतील मानली जाते. फंटय़ाची हीच मजा घेण्यासाठी, तो थरार अनुभवण्यासाठी ‘बाण हायकर्स’ने फंटय़ाची मोहीम निश्चित केली. या मोहिमेसाठी ललित राणे, विश्राम मरगज, मुनीश महाजन, कमलेश चव्हाण, संतोष देवलकर आणि मी स्वत: असा आमचा सहाजणांचा चमू माळशेजकडे आदल्या रात्रीच रवाना झाला. मध्यरात्री तीन वाजता आम्ही माळशेज गाठले. रस्त्याच्या कडेला गाडी लाऊन आम्ही तिथेच आमची पथारी लावली. घाटात सुटलेला वारा आणि रात्रीची वाहतूक यामुळे झोप लागणे अवघडच होते. पण आम्ही त्याही स्थितीत तो रस्त्याकडेचा मुक्काम पार पाडला. सकाळी सूर्यदेवाचे दर्शन होताच आवरा आवर करत चढाईची सुरुवात केली.
माळशेज िलगी आणि फंटय़ा यात गल्लत करतात. माळशेज िलगी अगदी बोगद्याला लागूनच उभी आहे, तर फंटय़ा सुळका हा बोगद्याअलीकडे मुरबाडच्या अंगाला एका वळणावर आपली वाट पाहात असतो. या फंटय़ाच्या सुळक्यावर सुरुवातीला एक सरळसोट प्रस्तरिभत येते. यावर हाताची बोटे मावतील अशी अरुंद भेग आणि पुढे मुरमाची माती यामुळे प्रस्तरारोहणाचे सारे कसब इथेच लागते.
फंटय़ाचा चढाईचा मार्ग सुळका आणि त्याचा बाजूच्या डोंगरामधून आहे. त्यामुळे सुरुवातीला गिर्यारोहण परिभाषेतील ‘चिमणी’ पद्धतीने आम्ही वर सरकू लागलो. हा चढाईचा प्रकार म्हणजे दोन प्रस्तरांमध्ये असणाऱ्या अरुंद भेगेत आपले पूर्ण शरीर सामावून घ्यायचे आणि आपले हात आणि पायांनी एकमेकांच्या विरुद्ध बल लावून पाठीचा आधार घेत वर-वर सरकत आरोहाण करायचे. अंगा खांद्यावर प्रस्तरारोहणाची साधने घेत चढाई करणे घाम काढणारे ठरते. पुढे प्रत्यक्ष दोर लावूनच चढाई करावी लागते. यामध्येही पहिल्या गिर्यारोहकाला थोडे साहस दाखवावेच लागते. या साऱ्या चढाईत उभा कडा आपली परीक्षा पाहात असतो. अगदी शेवटी तर मुरमाड दगड असल्याने त्यावर निटशी पकडही मिळत नाही. पण या साऱ्यांना तोंड देत आमच्या पहिल्या विराने फंटय़ाचा हा माथा गाठला आणि त्या पाठी आम्हा डोंगरवेडय़ांची पावलेही फंटय़ाच्या त्या माथ्यावर विसावली.
ऐन माळशेज घाटात असलेल्या या सुळक्याच्या माथ्यावरून भोवतीचे जग पाहणे हाही एक स्वर्गीय अनुभव होता. माळशेज घाटाचा नागमोडी वळणाचा रस्ता तळाशी खुणावत होता. त्या भोवतीने असलेले डोंगर आम्हाला बोलावत होते. यात अनेक ओळखीचे अनोळखी असेही होते. पण या साऱ्यातून भटक्यांच्या विश्वात मानाचे स्थान असलेला हरिश्चंद्रगड मात्र सतत लक्ष वेधून घेत होता. सह्याद्रीचे हे वैभव पाहतानाच मग हे असे कडे-सुळके चढण्याचे सारे श्रम-कष्ट गळून पडतात आणि नव्या मोहिमेची आखणी सुरू होते.