कोयना म्हटले, की पाणी आणि जंगल या दोनच गोष्टी डोळय़ांपुढे येतात. कोयनेच्या या जल-अरण्यात एक वाघ कधीचा ठाण मांडून बसलेला आहे.. त्याचीच ही गोष्ट !

सातारा सोडून कास-बामणोलीच्या वाटेला लागेपर्यंत निशेला मागे हटवत उषेने प्रकाशाची दारे किलकिली केली. पठारावर येईपर्यंत पूर्वेची ती उबदार किरणे साऱ्या सृष्टीवरच बरसू लागली होती. त्यांचे ते चैतन्य अंगावर घेत बामणोलीकडे उतरलो आणि कोयनेचे ते विलक्षण निसर्गदृश्य सामोरे आले. दरीखोऱ्यात दूरवर पसरलेली ती हिरवाई, त्यात मधोमध अडकलेला तो विशाल जलाशय आणि या साऱ्यांवर पसरलेली ती धुक्याची दाट साय! कोवळी सकाळ या साऱ्यांना अलवारपणे उठवू पाहात होती. या निसर्गपटातच दूरवर एक शिखरही जागे होत होते. नाव वासोटा ऊर्फ व्याघ्रगड!

उगवतीचे हे रंग पाहातच बामणोलीत दाखल झालो. त्या गोठवणाऱ्या थंडीतून गाव अजून उजाडत होते. या बामणोलीतूनच वासोटय़ाला जाण्यासाठी एक जलरस्ता आहे. वासोटा गड कोयनेच्या या खोऱ्यात मधोमध उंच जागी वसलेला आहे. हे खोरे म्हणजे घनदाट जंगलाचा प्रदेश. भोवतीने पुन्हा हा विशाल जलसाठा. नुकतेच या भागाला ‘सह्याद्री व्याघ्र प्रकल्प’ असे बिरुद लागले आहे. तेव्हा अशा या राखीव क्षेत्रात पाऊल ठेवायचे असेल तर वन विभागाची परवानगी लागणारच. बामणोलीत या प्रवेशाचे सोपस्कार पार पाडायचे आणि मग लाँचवाटे वासोटय़ाकडे मार्गस्थ व्हायचे.

आपली बोट निघते तसे या जलाशयात पाय सोडून बसलेल्या भोवतीच्या डोंगररांगा खुणावू लागतात. जणू पाण्यावर आलेल्या गायींप्रमाणेच या रांगा. स्वत:चेच प्रतिबिंब न्याहाळत बसलेल्या. एका मागे एक उंचच उंच, झाडीने भरलेली ही गिरिशिखरे पाहण्यात गुंतायला होते. दुसरीकडे त्यांना कवेत घेणारा हा शिवसागरही मन अथांग करतो. साऱ्या अवकाशाची निळाई तो प्यायलेला. त्याच्या पाण्यावर दूरवर सकाळची सोनेरी किरणे अजूनही चमचमणाऱ्या झालरी लावून बसलेली असतात. बोट पुढे धावत असते. मागे पाहावे तो तिच्या आठवणीची एक रेष दूपर्यंत उमटलेली दिसते. मधेच या पाण्यात अडकलेले एखादे बेटही बोट पकडत येते. रिकाम्या मऊ गवताळ पठारांच्या या जागा. असे वाटायचे बोटीतून हळूच या बेटांवर उडी मारावी, थोडा वेळ तंबू लावत इथे बसावे आणि मग पुढच्या प्रवासाला निघावे.

शिवसागरातील हा प्रवास सुरू असतानाच अचानक एका वळणावर, त्या डोंगरझाडीतून ‘त्याचे’ दर्शन घडले. एक क्षण सगळय़ांचेच डोळे चमकून तिकडे वळाले. त्याच्या त्या दर्शनाने साऱ्या भिरभिरत्या नजरेला एक अर्थ प्राप्त झाला. सह्याद्रीच्या ऐन धारेवर, उंच जागी, कोयनेच्या त्या गच्च रानात पाय रोवून बसलेला तो जणू एखादा ढाण्या वाघच की! साऱ्या जंगलावर त्याची ती भेदक नजर. उगाच नाही त्याला म्हणत- व्याघ्रगड!

त्याच्यावर स्थिरावलेली नजर ढळू न देता बोट काठाला लागली. मेट इंदवली असे या धक्क्याचे नाव. गडावर जायला या मेट इंदवली गावातून रस्ता. खरेतर गाव कसले, कधीकाळच्या गावाच्या नावाची तेवढी खूण. कोयनेचा जलाशय तयार झाला आणि तो होताना त्याने जी पाच-पन्नास गावे पोटात घेतली त्यातलेच हे एक . मेट इंदवलीशिवाय कोकणाकडूनही वासोटय़ावर चढणाऱ्या दोन वाटा. एक खेड तालुक्यातील चोरवणे गावातून नागेश्वर गुहे मार्गे तर दुसरी चिपळूणकडच्या तिवरे घाटातून रेडे घाट मार्गे गडावर जाणारी. पण या दोन्ही वाटा अंगावर येणाऱ्या आणि झाडीतून चालणाऱ्या. आपण आपली ही वाट धरायची आणि कोयनेच्या त्या झाडीत शिरायचे.

चार पावले टाकताच जंगलातील गारव्याने स्पर्श केला. खरेतर सकाळची कोवळी किरणे सर्वत्र शिरलेली होती. पण इथे रात्रीचा तो गारवा अजून मुरलेला. वाटेवरील दवबिंदूमधून तो भिजवत होता. थोडे चालताच या गारव्यापाठी जंगलात खोलवर पसरलेली शांतताही मनावर आरूढ झाली. झाडीतील ‘किरऽर्रऽऽ’ आवाज कानी रुंजी घालू लागला. मधेच त्या हिरवाईतून उमटणारा पक्ष्यांचा किलबिलाटही मन जागे करत होता. झाडे, वेली, फुले, मातीचे नाना गंध स्पर्श करू लागले. या वाटेभोवती फुललेली विविध रंगछटांची गवतफुले आणि त्यावर हिंडणारी फुलपाखरे डोळय़ांना नाचवत होती. जंगलातील हा प्रवेशच एका वेगळय़ा जगाची जाणीव करून देत होता. निसर्गाचा हा जिवंत-कोरेपणा मनाला खूप सृजन आणि संवेदनशील करत होता.

निसर्गात बुडालेले हे मन एका ओढय़ाच्या खळखळाटाने भानावर आले. या वाहत्या निर्झराने तृषार्त मन आणि शरीराला शांत केले. या ओढय़ाकाठीच जुन्या मेट इंदवलीतील घरांचे काही चौथरे आणि गणेश-हनुमंताचे एक सुरेख शिल्प त्या जुन्या गावच्या आठवणी सांगत होते. त्यांचे दर्शन घेतले आणि गड चढू लागलो.

वाट त्या निसर्ग मांडवाखालून जात होती. उंच वाढलेली झाडे जंगलाची संपन्नता सांगत होती. ऐन, साग, पिसा, जांभूळ, बेहडा, हिरडा, आवळा, आंबा, पळस, पांगारा, सावर किती नावे घ्यावीत. त्यांच्या जोडीने पुन्हा अंजन, कांचन आणि करवंदीच्या जाळय़ा. या झाडांवर पुन्हा नाना वेलींनीही आपले हात-पाय पसरलेले. वृक्ष-वेलींचा हा संगही कित्येक र्वष जुना. जणू एकमेकांच्या गळय़ात गळे घालूनच ते दोघेही मोठे झाले. कीटक, फुलपाखरे, सरपटणारे जीव, नाना जातीचे पक्षी, प्राणी अशा सर्व वनचरांचे हे आश्रयस्थान. अगदी प्राण्यांचे बघायला गेले तर वानर, माकड, भेकर, साळिंदर, अस्वल, कोल्हे, रानकुत्री, बिबटे आणि वाघदेखील अशी मोठी शृंखला इथे सुखनैव नांदते आहे. या साऱ्यांचेच कुतूहल, आश्चर्य, शोध आणि भय मनात घेऊन वरवर सरकत होतो.

तासा-दोन तासांत गड सर झाला. एकामागे एक दोन दरवाजे. पण त्यांच्या कमानींनी कधीचीच मान टाकलेली. गडात शिरताच हनुमंताचे मंदिर येते. छत कोसळलेले, पण आतील मारुतीरायाची भलीमोठी मूर्ती अभय देत उभी असते. त्याचे दर्शन घ्यावे आणि दक्षिण बाजूने गडप्रदक्षिणेला निघावे.

गडाचा आकार काहीसा शिवलिंगासारखा. गडाला आवश्यक तिथे तट घातला आहे. त्याची आठवण देतच पूर्वेकडच्या बुरुजाजवळ चुन्याची घाणी दिसते. पुढे दोन खोदीव टाकी दिसतात. अगदी सख्ख्या भावंडाप्रमाणे. वाटेत काही घरांचे अवशेषही दिसतात. हे सारे पाहात दक्षिण टोकावर यावे तो काळजात धस्स करत एक भलीमोठी दरी आपल्या पुढय़ात येते. वासोटय़ाच्या दक्षिण अंगाला खेटूनच आणखी एक डोंगर. त्याला खोटा वासोटा म्हणतात. या दोन पर्वतांदरम्यानची ही दरी. पाताळात खोल गेलेली. तिचे ते भीषण कडे भय दाखवतात. बाबू कडा असे याचे नाव. या कडय़ावरूनच पश्चिमेकडे जाऊ लागलो, की खोलवर पसरलेल्या कोकणाचे दर्शन घडते. गडाच्या मध्यभागी झाडीने भरलेला बालेकिल्ला आहे. तिथे एका तालेवार वाडय़ाचे जोते दिसते. नंतर महादेवाचे मंदिर ओलांडत उत्तरेकडे आलो, की लोहगडाच्या विंचूकाटा माचीप्रमाणे इथेही एक माची दिसते. काळकाईचे ठाणे असे नाव असलेल्या या माचीवर आलो, की वासोटय़ाचा खरा थरार अंगावर काटा उभा करतो. ‘दुर्ग म्हणजे दुर्गम’ या उक्तीने वासोटय़ासाठी निवडलेली ही जागाच विलक्षण आहे. ११७१ मीटर उंचीच्या या गडाच्या एका अंगाला अरण्य तर दुसऱ्या बाजूला पाताळात गेलेले खोल कडे. याचा उल्लेख वनदुर्ग म्हणून होतो तो उगाच नाही. इसवी सन १८०८ सालची एक आठवण इतिहासाने नोंदवून ठेवली आहे. पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यात काही कारणाने दुरावा निर्माण झाला. पेशव्यांचे सेनापती बापू गोखले हे पंतप्रतिनिधींच्या ताब्यातील या किल्ल्यावर चालून आले होते. त्या वेळी किल्ला तर दूरच, पण भोवतीच्या या झाडी-कडय़ांनी त्यांना रडवले. ते लिहितात, ‘‘डोंगरझाडी मनस्वी, अडचण बहुत. किल्ला बहुत बाका. सात कोस, अडीच मास झाडी तोडली तेंव्हा मार्ग झाला!’’

शिलाहारांनी या गडाची निर्मिती केली. यानंतर तो शिर्के-मोरे घराण्याकडे काही काळ होता. इसवी सन १६६०मध्ये जावळीबरोबर कोयनेचा हा वाघही स्वराज्यात आला. या वेळी महाराजांनी त्याचे हे नामकरण ‘व्याघ्रगड’ केले. पुढे तो इंग्रजांच्या आगमनापर्यंत मराठय़ांकडेच होता. या दरम्यान बराच काळ या गडाचा उपयोग तुरुंग म्हणूनच झाला. अगदी हंटर आणि मॉरिसन या बडय़ा इंग्रज अधिकाऱ्यांनाही वासोटय़ाच्या या तुरुंगाची हवा खावी लागली.

असा हा वासोटा आणि त्याचे हे इतिहास, भूगोल आणि निसर्गाचे संमिश्र भाव. ते साठवून घेतच उतरू लागायचे. खाली उतरेपर्यंत सकाळच्या कवडशांच्या जागी सावल्यांचे फराटे उमटू लागलेले असतात. ‘संध्याछाया भिवविती हृदया’ तसे त्या अरण्यातून पावले भरभर बाहेर पडतात. लाँचमध्ये बसून पुन्हा त्या शिवसागरात झेपावेपर्यंत मावळतीला सूर्यास्ताची तयारी सुरू झालेली असते. झाडे, पाने, फुले, पशू, पक्षी; झरे-निर्झर, नद्या-सरोवर, माती-डोंगर आणि या साऱ्यांच्या हृदयी स्थिरावलेला तो व्याघ्रदुर्ग, सारेच आता त्या काळोखात पुन्हा निजू पाहतात. ज्ञानेश्वरीत एका ठिकाणी ‘वसौटा’ असा शब्द आलेला आहे. त्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला जातो. खरेच, की चराचरातील प्रत्येक जिवांचा हा दुर्गही एक आश्रयस्थान! मावळतीच्या त्या गहिऱ्या रंगात निसर्गाच्या या ‘आश्रया’ला डोळय़ांत साठवत, भरून घेत होतो. ..जगण्याचा श्वास आणि बळ देणारी ‘मुशाफिरी’ त्या दिनकराबरोबर अंतर्धान पावत होती!

अभिजित बेल्हेकर

abhijit.belhekar@expressindia.com