जगात ८ हजार मीटरहून उंच अशी एकूण १४ हिमशिखरे आहेत. ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ २७ गिर्यारोहक आहेत. या अष्टहजारी शिखरांपैकी एव्हरेस्ट, ल्होत्से आणि मकालूच्या यशानंतर उर्वरित ११ हिमशिखरांना साद घालण्याचाही ध्यास ‘गिरिप्रेमी’ संस्थेने घेतला आहे. यातूनच ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहिमेचा जन्म झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिमालय हे नाव ऐकताच अनेकांच्या शरीरावर रोमांचकारी शहारे उभे राहतात, त्यातील मी एक होय. अफगाणिस्तान-पाकिस्तान व भारताच्या सीमेजवळ सुरू होणारी हिमालयाची ही पर्वतरांग काही हजार किलोमीटरवर असलेल्या म्यानमापर्यंत गेली आहे. या संपूर्ण हिमाच्छादित पट्टय़ामध्ये अनेक निसर्गनिर्मित हिमशिखरे डौलाने उभी आहेत. हिमालयामध्ये असंख्य डोंगररांगा काही हजार मीटर उंच आहेत. यातील नेपाळमध्ये वसलेल्या ‘अन्नपूर्णा’ पर्वत रांगेमध्ये १६ शिखरांची उंची ६००० मीटरहून अधिक आहे, तर संपूर्ण हिमालयामध्ये ८ हजार मीटरहून उंच अशी एकूण १४ हिमशिखरे आहेत. त्यांना अष्टहजारी हिमशिखरे असे संबोधतात. अनेक गिर्यारोहकांनी या शिखरांवर चढाई करण्यासाठी अक्षरश: आपले आयुष्य वेचले आहे, पण हे यश आतापर्यंत केवळ २७ गिर्यारोहकांच्याच वाटय़ाला आले आहे. या चौदा शिखरांपकी सात शिखरे नेपाळमध्ये, पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये तर प्रत्येकी एक शिखर भारत व तिबेटमध्ये वसलेले आहे.
गिर्यारोहण जगतात प्रत्येक गिर्यारोहकाला आणि संस्थेला ही सर्व शिखरे सर करण्याची इच्छा असते. ‘गिरिप्रेमी’ने २०१२ साली ‘माउंट एव्हरेस्ट’, २०१३ साली ‘माउंट ल्होत्से व माउंट एव्हरेस्ट’ आणि २०१४ साली ‘माउंट मकालू’ अशा सलग तीन वर्षे तीन अष्टहजारी मोहिमा यशस्वी केल्या. या मोहिमांच्या यशस्वीतेनंतर संस्थेत ही सर्वच अष्टहजारी शिखरे सर करण्याचा विचार पुढे आला आणि ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहिमेचा जन्म झाला.
‘माउंट एव्हरेस्ट’ मोहिमेनंतर अनेकांनी विचारले होते, ‘‘सर्वोच्च शिखर झाले, आता पुढे काय?’’ तेव्हा माझ्या मनामध्ये एकच भावना येत असे, ती म्हणजे, ‘‘अरे ही तर फक्त सुरुवात आहे, अजून हिमालयाशी खूप गप्पा मारायच्या आहेत, त्याच्या कवेत बसून हसायचे आहे, आपली दु:ख त्याच्या सोबत वाटून रडायचे देखील आहे. याच आपल्या हिमालयाला कडकडून भेटायचे आहे, एकदा नव्हे तर अनेकदा.’’ याच भावनेचा आविष्कार म्हणजे ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहीम होय. यामध्ये आम्ही येत्या काही वर्षांमध्ये सर्व चौदा अष्टहजारी शिखरांवर चढाई मोहीम आखणार आहोत. त्यातील ‘माउंट एव्हरेस्ट’, ‘माउंट ल्होत्से’ व ‘माउंट मकालू’ या तीन शिखरांवरील मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. आता क्रमाक्रमाने आम्ही इतर शिखरे पादाक्रांत करण्याचे उद्दिष्टय़ ठेवले आहे. याचा पुढचा टप्पा म्हणून एप्रिल-मे २०१६ मध्ये ‘माउंट चो ओयू’ व ‘माउंट धौलागिरी’ या अष्टहजारी शिखरांच्या मोहिमा निघणार आहेत.
‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ ही ‘गिरिप्रेमी’ची महत्त्वकांक्षी मोहीम आहे. गिर्यारोहण क्रीडाप्रकाराला अधिक उत्तेजन मिळावे, या खेळाला लोकाश्रय प्राप्त व्हावा, अशी अनेक ध्येये आम्हाला या मोहिमेसमवेत प्राप्त करावयाची आहेत. साहसी खेळांना प्रोत्साहन दिल्याचा अप्रत्यक्ष फायदा देशाला व तेथील व्यवस्थेला होतो. साहसी खेळांमुळे व्यक्तीची कार्यक्षमता वाढते, परिस्थितीला धर्याने तोंड देण्याचा आत्मविश्वास जागृत होतो, निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते, असे एक ना अनेक फायदे साहसी खेळांमुळे सामान्य माणसाला होतात. या खेळांमध्ये कुठलीही हार-जीत नाही. फक्त ध्येय गाठल्याचे अपूर्व समाधान आहे. तुम्हीही एकदा कधी छोटी टेकडी चढून बघा, तुम्हाला या समाधानाची प्रचीती येईल. असे अनेक उद्दिष्टय़े गाठण्यासाठी खेळाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर होणे आवश्यक आहे. हा प्रसार अधिक वेगाने करण्यासाठी ‘क्वेस्ट ऑफ एटथाउजंडर’ मोहीम हातभार लावेल यात शंका नाही.

मराठीतील सर्व Trek इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Peak expedition
First published on: 24-12-2015 at 10:19 IST