हिरव्या रंगात रंगलेला आसमंत, वाऱ्याच्या तालावर लय धरलेली हिरवीगार भातखाचरं, कडय़ावरून स्वत:ला झोकून देणारे धबधबे आणि धुक्यातून हळूच डोकं वर काढून आपल्याला दर्शन देणारा सह्याद्री! पाऊस सुरू झाला, की कुठल्याही डोंगरवाटेवर येणारा हा अनुभव. केवळ मंत्रमुग्ध करणारा नाही तर समृद्ध करणारा. पण यासाठी कुठे लांब जायची गरज नाही. पुणे-नाशिक महामार्गावरच्या राजगुरुनगरपासून जवळ असंच एक निसर्गनवल लपलंय भोरगिरी!

पुण्याहून राजगुरुनगरला गेलं की तिथून चासकमान-वाडा-टोकावडे-शिरगाव या रस्त्याने सुमारे पन्नास किलोमीटरचा टप्पा पार करून भोरगिरी मध्ये दाखल होता येतं. भोरगिरी गावाकडे येतानाच वर उल्लेख केलेली सगळी दृश्य ही भान हरपून टाकणारी असतात. भोरगिरी गावाच्या शेवटी गोलाकार आकाराचा एक डोंगर उभा आहे. अगदी छोटाच पण अद्वितीय निसर्गाने नटलेला भोरगड ! गावातील प्राचीन कोटेश्वर महादेवाचं दर्शन घ्यायचं आणि भातखाचरांमधून वाट काढत पाचेक मिनिटात किल्ल्याचा पायथा गाठायचा. किल्ल्याच्या पायथ्यालाच एक छोटासाच पण सुंदर असा एक धबधबा आहे. किल्ल्याच्या उजव्या अंगाच्या डोंगरामध्ये पाहिलं की तिथेही एक धबधबा दिसतो. थोडा मोठा पण बऱ्याचदा गर्दीने गिळंकृत केलेला. आपण त्याला लांबूनच दंडवत घालायचं. भोरगिरी पायथ्याच्या या छोटय़ा धबधब्याजवळच काही कोरीव वीरगळींचे दगड आहेत. ते बघायचे आणि तोल सांभाळत भोरगिरीची प्रशस्त गुहा गाठायची. गुहेत एक शंकराचं मंदिर असून शेजारीच पाण्याचं टाकं दिसतं. गुहेपासून उजवीकडच्या चिंचोळ्या पायवाटेने गेलं की मात्र एका मोठय़ा गुहेत खांबटाकं आढळतं. शंकराचं मंदिर असलेली ही गुहा मुक्कामासाठी अप्रतिमच. गडाच्या माथ्यावरही तुरळक अवशेष असून तिथेही एक चक्कर मारून यायची. पण गडावर जास्त वेळ घालवायचा नाही कारण आता आपला प्रवास सुरू होतोय भीमाशंकरकडे!
भोरगिरी-भीमाशंकर हा ट्रेकर्समध्ये प्रसिद्ध असणारा ट्रेक. भोरगिरी पासून फक्त ६ किलोमीटरवर भीमाशंकरचं प्राचीन देवस्थान आहे. दोन-तीन तासांचा हा प्रवास मात्र शब्दात वर्णन करणं खरोखरच अवघड आहे. गावातून संगतीला एखादं शाळकरी पोर घ्यायचं आणि किल्ला उजवीकडे ठेऊन प्रशस्त पायवाटेने चालू लागायचं. पंधरा-वीस मिनिटांतच निसर्ग तुम्हाला आपल्या कुशीत घेतो आणि सुरू होतो निसर्गाचा अविस्मरणीय सहवास. डावीकडे शेवटपर्यंत असणारी एका नितांत सुंदर अशा एका खळाळत्या ओढय़ाची साथ ही तर आपल्या भ्रमंतीला मिळालेलं सुरेख पाश्र्वसंगीत! आजूबाजूची हिरवाई डोळय़ाचं पारणं फेडते आणि मध्येच समोरून भुर्रकन उडून जाणारा एखाद्या खंडय़ा पक्षी मनावर हलकाच सूर छेडून जातो. त्यात पावसाची एखादी सर आली तर दुधात साखरच!
गावातून निघाल्यापासून तासाभरात आपण एका मोठय़ा पठारावर येतो आणि आता भीमाशंकर हाकेच्या अंतरावर राहिलेलं असतं. मग डावीकडच्या त्या जलौघाला अजून काही साथीदार येऊन मिळतात आणि आपल्या आनंदात अजून भर घालतात. ढगांचे कापसासारखे पुंजके मधूनच अंगावर येतात. उजवीकडे एखाद दुसरा धबधबाही साद घालत असतो. त्यात मनसोक्त खेळायचं एखादं लहान मूल होऊन! मन पूर्ण भरलं की पुन्हा पायवाटेवर यायचं आणि आता उदरात शिरायचं ते भीमाशंकाराच्या जटांमध्ये!
भीमाशंकर मंदिर जवळ आल्याची जाणीव अस्ताव्यस्त पसरलेला कचराच करून देतो. पर्यटकांची उसळलेली गर्दी आणि त्यात श्वास कोंडलेलं भीमाशंकर. आपण मात्र त्या गर्दीत न शिरता लांबूनच शिवाचं दर्शन घ्यायचं आणि परतीच्या वाटेवर निघायचे!
– ओंकार ओक