चादर ट्रेक
‘प्लस व्हॅली अ‍ॅडव्हेंचर्स’तर्फे येत्या २२ ते ३१ जानेवारी, १ ते १० फेब्रुवारी आणि ११ ते २० फेब्रुवारी २०१६ दरम्यान लेह-लडाख परिसरातील चादर ट्रेकचे आयोजन केले आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंचीवर असलेल्या या बर्फाळ प्रदेशातून होणाऱ्या पदभ्रमंतीत बर्फवृष्टी अनुभवता येते. हिमालयातील जैवविविधता, निसर्ग या साऱ्यांचे या ट्रेकमध्ये विहंगम दर्शन होते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम संधी ठरू शकते. अधिक माहितीसाठी श्रीपाद (८३८००५४९८८) किंवा प्राजक्ता (८३८००५४९८९) यांच्याशी संपर्क साधावा.

कुआरी पास ट्रेक
हिमालयातील अनेक प्रसिद्ध ट्रेकपैकी एक असा हा कुआरी पास ट्रेक आहे. ‘हिमगिरी ट्रेकर्स’ तर्फे येत्या १४ ते २३ नोव्हेंबर दरम्यान या पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले आहे. या ट्रेकचा शोध लॉर्ड क्रुझन रिचर्ड यांनी १९०५ साली लावला. म्हणून याला ‘क्रुझन ट्रेल’ असेही म्हणतात. साधारण १५३०० फूट उंचीवर चालणाऱ्या या ट्रेकमध्ये गढवाल हिमालयातील अनेक हिमशिखरांचे सर्वागसुंदर दर्शन घडते. यामध्ये नंदा देवी, कामेत, द्रोणागिरी, त्रिशूल, बेरथोली, हाथी घोडी पर्वत, माना आणि नीलकंठ आदी शिखरांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान हिमालयातील निसर्गाचे सुंदर दर्शन घडते. रोडोड्रेडन, ओक देवदारच्या या जंगलातून अनेक प्रजातींचे पक्षी दिसतात. हिमनद्यांचे विहंगम दर्शन घडते. छायाचित्रणाची आवड असणाऱ्यांसाठी ही मोहीम विशेष आकर्षणाची ठरते. तरी इच्छुकांनी अधिक माहितीसाठी संतोष (९८२०९४७०९२) यांच्याशी संपर्क साधावा.

‘ट्रेक इट’
धकाधकीच्या, स्पर्धेच्या या युगात विश्रांतीचे, विरंगुळय़ाचे, आनंद देणारे चार क्षण आता साऱ्यांनाच आवश्यक झाले आहेत. दोन दिवस कुठेतरी जावे आणि भटकून रिफ्रेश व्हावे ही आता अनेकांची दैनंदिनी बनली आहे. यातूनच मग सहल, ट्रीप, टूर, आऊटिंग, विकएन्डपासून ते ट्रेकिंग, गिर्यारोहणापर्यंत अशा वेगवेगळय़ा नावांखाली भटकण्याची एक मोठी संस्कृती समाजात रुजू लागली आहे. भटकंतीच्या या वाटा, त्यावरचे सौंदर्यानुभव, गमतीजमती आणि थ्रिल घेऊन येणारी ‘ट्रेक इट’ आता आपल्याला दर गुरुवारी भेटणार आहे. ही पुरवणी आपल्याला कशी वाटते हे आम्हाला जरूर कळवा. तसेच नवीन स्थळांची माहिती, ट्रेकचा अनुभव, हटके छायाचित्र, आपल्या अनुभवांवर आधारित संक्षिप्त स्वरुपातील ब्लॉग लिहून आपण सहभागी होऊ शकता. संपर्कासाठी – ‘ट्रेक-इट’साठी , लोकसत्ता, ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट क्र. १२०५/२/६, शिरोळे पथ, शिवाजीनगर, पुणे – ४११००५. Email – abhijit.belhekar@expressindia.com