माझ्यासमोर शब्दश: एक लक्षापेक्षा अधिक ‘अमूर’ ससाणे टोळधाड वाटावी असे उडत होते. भोवतालच्या दाट जंगलामध्ये प्रत्येक पानामागे जणू एकेक ससाणा! माझा कॅमेरा आणि माझी पंचेंद्रिये हे सर्व सामावून घेण्यासाठी अपुरी पडत होती. मी नि:शब्द झालो होतो.  
नागालँड! जिथे पहाटे चार वाजता सूर्य उगवतो आणि संध्याकाळी पाच वाजताच रात्र होते. संपन्न जंगल, निसर्गसौंदर्याने नटलेला हा प्रदेश. अशा या प्रदेशातच डोयांग प्रांतात दरवर्षी ऑक्टोबरमध्ये हजारो किलोमीटरचा प्रवास करत हे ‘अमूर फाल्कन’ पक्षी येतात. मग त्यांचे दर्शन, निरीक्षण, अभ्यास आणि संवर्धनासाठी या काळात दरवर्षी अनेक अभ्यासक धावतात. अशीच धाव मी आणि माझे मित्र डॉ.  श्रीराम भाकरे यांनी घेतली होती.
नागालँडची राजधानी कोहिमापासून ७५ किलोमीटरवर ओखा हे जिल्ह्य़ाचे गाव. या ओखापासून २४ किलोमीटरवर डोमांग भाग. इथे असलेले मोठे धरण, त्यावरील जलविद्युत प्रकल्पामुळे हा भाग ओळखला जातो. या डोमांग परिसरातच हे अमूर ससाण्यांची वारी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अवतरते. हा सोहळा पाहण्यासाठी आम्ही इथे दाखल झालो होतो.
भल्या पहाटेच या अमूरच्या शोधात आम्ही बाहेर पडलो. सभोवती घनदाट जंगल आणि उंच टेकडय़ा होत्या. या टेकडय़ा -जंगलातून मधोमध खोलवर पांढरी शुभ्र रंग घेत डोमांग नदी वाहत होती. या नदीवरच हे डोमांग धरण साकारले.
सुरुवातीला अंधारात आम्हाला काहीच दिसत नव्हते. केवळ पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. तो ऐकतच आम्ही त्या पाणवठय़ावर, उघडय़ा जागी आलो आणि धूसर प्रकाशातही असंख्य पक्ष्यांचा देखावा समोर उभा राहिला. एवढय़ा मोठय़ा संख्येने दिसलेला हा पक्षिसोहळा पहून थक्कच व्हायला झाले.
हे ‘अमूर’ ससाणे आहेत मूळचे ‘सबेरिया’ या रशियाच्या उत्तरपूर्व प्रांतातील, ‘अमूर’ नावाच्या जगातील दहा क्रमांकाच्या सर्वात लांब नदीच्या खोऱ्यामधील रहिवासी. कबुतरापेक्षा थोडेसेच मोठे, अंदाजे एक किलो वजन, पण कीर्ती मात्र महान! राखाडी रंग, लाल पाय हे त्यांचे अंगभूत वैशिष्टय़, स्त्री-पुरुष िलग भिन्नता आहेच. शिकारी पक्षांमध्ये सर्वात लांब स्थलान्तर करणारे आणि फक्त उडणारे टोळ आणि मोठे कीटक मटकावणारे! ‘फाल्कन’ या कुळातील सर्व पक्षी त्यांच्या आकारापेक्षा मोठय़ा पक्षांची आणि सापांची शिकार करण्यात प्रसिद्ध. पण हे ‘अमूर’ ससाणे मात्र टोळधाडीला मटकवतात आणि त्यामुळे आपोआपच शेती आणि शेतक ऱ्यांचे ते मित्र ठरतात.
अतिथंड भागात हिवाळा सुरू झाला, की अन्य पक्षांप्रमाणे अमूरची लगबग सुरू होते. सबेरियातून, मंगोलियामाग्रे ब्रह्मपुत्रचे खोरे ओलांडून ते भारताच्या उत्तर-पूर्व राज्यामध्ये, विशेषत अरुणाचल आणि नागालंड या राज्यातील घनदाट जंगल प्रदेशामध्ये, डोयांग धरणाच्या पाणीसाठय़ावर उतरतात. अंदाजे ऑक्टोबर मध्य ते नोव्हेंबरचा पहिला आठवडा एवढाच त्यांचा मुक्काम इथे असतो. यानंतर नोव्हेंबरमध्ये इथून उड्डाण करतात. या वेळी कुठेही न थांबता ते संपूर्ण बंगालचा उपसागर, मध्य भारत, अरबी समुद्र पार करून पूर्व आफ्रिकेतील सोमालिया, केनिया या देशांच्या पूर्व किनाऱ्यावरून थेट दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला म्हणजे ‘न्यू क्यासल’ या गावापर्यंत धडकतात. तिथे ते संपूर्ण उन्हाळा म्हणजे उत्तर गोलार्धातील हिवाळा संपेपर्यंत मार्चपर्यंत विसावतात. एप्रिलमध्ये पुन्हा एकदा सर्व जण एकत्र येतात आणि उड्डाण करतात ते त्यांच्या सायबेरिया या मूळ जागी जाण्यासाठी!
हा परतीचा प्रवास सुद्धा रहस्यमय आहे. या वेळी ते आल्या वाटेने परत जाण्याऐवजी सरळ उत्तर दिशा पकडून आफ्रिकेच्या भूभागावरून विषुवृत्त ओलांडून इजिप्त, इस्रायल, तुर्कस्तान, अफगाणिस्तान माग्रे संपूर्ण रशिया पार करत सायबेरिया मध्ये अमूर नदीकाठी विसावतात. तिथे ते प्रजनन करतात. उन्हाळ्यामध्ये तिथे खाण्यासाठी भरपूर टोळ, आळय़ा आणि इतर कीटक असतात. असा लंबवर्तुळाकार तब्बल २३ ते २५,००० किलोमीटरचा प्रवास हे छोटेसे जीव केवळ दोन छोटय़ा पंखांच्या आधाराने करतात. नेमके कुठे जायचे हे त्यांना कसे समजते हा मोठा चमत्कार आहे!  
अशा या विलक्षण पक्षिसोहळय़ाचे दर्शन घेत मी फिरत होतो. दुतर्फा झाडी, टेकडय़ा आणि मध्येच खोलवर गेलेले डोमांगचे पात्र. अमूरचा हा सोहळा चांगल्या रीतीने पाहता यावा म्हणून आम्ही आणखी पुढे पंगती गावापर्यंत गेलो आणि तिथे ती सर्वोत्तम जागा आली. भोवतीच्या टेकडय़ा, झाडीचा अडथळा दूर झाला. समोरचा भवताल एकदम मोकळा झाला. दूरवर केवळ डोमांगचे पाणी आणि त्याच्या डोईवर ते विस्तीर्ण अवकाश एवढेच आणि या साऱ्यांवर विसावलेला तो लक्षावधी अमूर पक्ष्यांचा सोहळा पुढय़ात उभा राहिला. विलक्षण असा हा देखावा होता. ज्याने सारे अवकाश भरून राहिले होते. त्यांच्या आवाज व हालचालींनी जणू सारा भवतालच जिवंत झाला होता. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी आणि अवकाशी सर्वत्र केवळ ‘अमूर आणि अमूर’च दिसत होते. जणू वाखरीच्या माळावरचा वैष्णवांचा हा मेळा. ..हा सोहळा पाहणे, नजरेत साठवणे आणि त्याला कॅमेऱ्यात टिपणे हे एवढेच काम माझे सुरू झाले.
                                              
अस्तित्वाच्या लढाईवर मात
प्रत्येक भव्यदिव्य गोष्टीला एक शाप असतो असे म्हणतात. नागालँड आणि सातही उत्तरपूर्व राज्ये ही वन्यप्राणी, पक्षी यांच्या अवैध शिकारीसाठी प्रसिद्ध आहेत. हलणारी, उडणारी, चालणारी प्रत्येक सजीव गोष्ट तिथे मारली आणि खाल्ली जाते. एवढय़ा जंगलात इतक्या प्रचंड संख्येने येणारे ‘अमूर’ तरी त्याला अपवाद कसे असतील. गेल्या काही वर्षांमध्ये या परिसरात दररोज १५ ते २० हजार ‘अमूर’ ससाणे अखंड तीन आठवडे मारले जायचे. म्हणजे अंदाजे एक ते दीड लाख पाहुण्यांची येथे हत्या व्हायची. कोहिमा-दिमापुर सारख्या स्थानिक बाजारपेठापासून ते अगदी थायलंड, चीन आणि मलेशियापर्यंत त्यांचा हा व्यापार व्हायचा. गेल्या वर्षी हा सर्व प्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आला आणि स्थानिक प्रशासनावर प्रचंड दबाव आला. चक्रे फिरू लागली, वनखात्याला जाग आली, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी कंबर कसली. स्थानिक ग्रामस्थ आणि वनखाते यांची संयुक्त सभा होऊन या आंतरखंडीय चिमुकल्या प्रवाशांना, पाहुण्यांना संरक्षण देण्याची योजना आखली गेली. यासाठी ‘व्हिलेज कौन्सिल मेम्बर’ची स्थापना झाली. त्यांना वाइल्ड लाइफ इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि नागालँड वाइल्ड लाइफ अँड बायोडायव्हरसिटी कॉनसेव्र्हेशन ट्रस्ट, वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया, न्यॅचरल नागा या स्वयंसेवी संस्थांनी पाठिंबा दिला. वोखा जिल्ह्यातील छोटय़ा छोटय़ा गावांतून चर्चा, मोर्चा, पोस्टर्स आदी जनजागृतीचे कार्यक्रम सुरू झाले. शिकारीच्या या अवैध धंद्यामध्ये गुंतलेल्या ५० ते ६० लोकांना बोलावून त्यांना संभाव्य परिणामांची, शिक्षेची कल्पना दिली. अगदी शाळातून मुलांमध्येही जागृती झाली. ‘सेव्ह दि अमूर फाल्कन’, ‘फ्रेंड्स ऑफ अमूर फाल्कन’, ‘अमूर, प्राइड ऑफ नागालंड’ या नावांचे मोठे फलक लावले गेले. यांच्या कार्यकर्त्यांना संरक्षण देण्यासाठी ‘आम्र्ड फोरेस्ट गार्ड्स’ प्रशिक्षित करण्यात आले. आणि पाहता-पाहता साऱ्या जनमानसात बदल होत गेले. आजवर अमूरला मारणारे हातच त्याच्या संरक्षणासाठी पुढे सरसावले.
..यंदाच्या वर्षी इथे आलेल्या लक्षावधी अमूरपैकी एकाचीही हत्या झालेली नाही. आम्ही इथे आलो, अमूरचे हे अपूर्व दर्शनही घडले. पण त्याएवढीच त्याच्या जगण्या-वाचण्याबद्दलची ही सुखावणारी बातमीही आम्हाला मोठा आनंद देऊन गेली.