तुंग म्हणजे ‘उत्तुंग’, ‘उंच’! हे उत्तुंग, कठीणपण लक्षात घेऊनच शिवाजीमहाराजांनी गडाचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. या उत्तुंग तुंगला पवनेच्या पाण्याने तीन बाजूंनी वेढा घातला आहे. यामुळे हा गड, त्याची ही डोंगररचना अधिकच अद्भुत झाली आहे. पावसाळय़ात तर पाऊस, ढग, धबधबे आणि रानफुलांनी या वाटेचे सौंदर्य अधिकच खुलते.

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Bhandara District Jail, Female Guard, Assaulted, Detainee, crime news,
धक्कादायक! कारागृहातील बंदीवानाचा महिला रक्षकावर प्राणघातक हल्ला
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला
Abhishek suffered a heart attack during a visit to Delhi zoo
हृदयविकाराच्या झटक्याने पतीचा मृत्यू, मृतदेह पाहताच पत्नीने सातव्या मजल्यावरुन उडी मारत संपवलं आयुष्य

पायांना एकदा मातीच्या स्पर्शाची आणि नाकाला तिच्या ओल्या वासाची सवय जडली, की डांबरी सडकांकडे पाहावेसेही वाटत नाही. या पाऊलवाटाही कितीतरी तऱ्हेच्या, ऋतुमानानुसार बदलणाऱ्या. कुठे रस्ता, कुठे फुफाटा, कुठे पाऊलवाट तर कुठे डोंगररानातून धावत अचानक गडप होणाऱ्या, फसव्या ढोरवाटा! ..पहाटेच्या वेळी अनवाणी पायांना शिरशिरी आणणाऱ्या, कधी उन्हात चटका देणाऱ्या, तर कधी पाऊसकाळी चिंब गोठवणाऱ्या! ..कधी काळय़ा खडकावरून केवळ व्रणांच्या रूपात धावणाऱ्या, कधी गर्द जंगलात पालापाचोळय़ात झाकलेल्या, कधी दाट गवतातून मधोमध रेष ओढणाऱ्या, कधी आषाढातल्या चिखलाने बरबटलेल्या तर कधी श्रावणातील रानफुलांच्या सहवासात फुलणाऱ्या..पाऊलवाटांचे हे आठवणीतले एकेक रूप आणि प्रत्येक ठिकाणची तिची वेगळी ओळख!
लोणावळय़ाच्या दक्षिणेला मुळशी-भांबुडर्य़ापर्यंत अशीच एक वाट गेली आहे, जिच्यावर विसावली आहेत तुंग, कोरीगड, धनगडासारखी अपरिचित अन् अनगड दुर्गशिल्पं! पाऊस सुरू झाला, की या वाटेवर स्वार होण्याचा मोह खऱ्या भटक्यांना नेहमी होतो. अंगावर पाऊस झेलत, चिखलात माखत, ढगात हरवत आणि श्रावण-भाद्रपदातील रानफुलांमध्ये गुंतत या वाटांवरून भटके त्यांची पावले नित्य उमटवतात. यातल्याच तुंगच्या वाटेवर आज जाऊयात.
लोणावळा ते भांबुर्डा वाटेवरील घुसळखांब फाटय़ाहून या तुंगकडे यायला रस्ता. भांबुडर्य़ाकडे जाणाऱ्या कुठल्याही एसटी बसने इथे उतरायचे आणि तुंग गडाच्या पायथ्याच्या तुंगी गावाकडे चालू पडायचे. लोणावळय़ातून या तुंगी गावासाठीही थेट एसटी सुटते. पण तिच्या वेळा लक्षात घ्याव्या लागतात. याशिवाय तळेगाव आणि स्वारगेटहून सुटणाऱ्या शिळीम एसटी बसनेही तुंगचा पायथा गाठता येतो. यातील कुठल्याही वाटेने आलो, तरी पावसाळय़ात या वाटांचे आणि समोरच्या तुंगचे सौंदर्यही उमललेले असते.
सारा रहाळ जिवंत, सजग झालेला. भोवतीचे सारे डोंगर हिरवाई ल्यायलेले, त्यांच्या अंगाखांद्यावरून वाहणाऱ्या असंख्य शुभ्र जलधारा. डोंगररानी हुंदडणारे हे धबधबे तळातून वाहणाऱ्या खळाळत्या ओढय़ांना येऊन मिळणारे. मातीत लोळत मातकट झालेले. या ओल्या हिरवाईवरही जागोजागी नाना तऱ्हेची, नाना रंगांची रानफुले उमललेली. सोनकी, कवल्या, तेरडा, भारंगी, जांभळी मंजिरी, सीतेची आसवं, गौरीहार, रानहळद, चवर ..किती नावे घ्यावीत. जणू पाऊलवाटांवर पायघडय़ा घातलेल्या. तुंगच्या या वाटांवर गुंग व्हायला होते. घुसळखांब मार्गे येणारी वाटही अशीच. फाटा सोडताच वाट झाडावेलींमध्ये शिरते. एरवी माती-फुफाटय़ाची असणारी ही वाट पाऊसकाळी चिखलपाण्याची होते. पक्ष्यांचा किलबिलाट आणि ओढय़ानाल्यांचा खळखळाट मनात साठवत पाऊलगाडय़ा अध्र्या वाटेवरच्या चढापर्यंत आल्या, की समोरच एक उंच डोंगर तुंग किल्ला भासवत पुढे येतो. खऱ्या तुंगला झाकणारा हा खोटा तुंगी. त्याचे नावही असेच ‘खोटा तुंगी’! त्याच्यावर लक्ष ठेवत वाटेतली एक खिंड गाठावी. पाठीवरचे ओझे सांभाळत आणि कपाळावरचा घाम पुसत एक क्षण समोर पाहावे तो समोर डोंगरांच्या गर्दीतून सुरूच्या झाडाप्रमाणे आकाशात उंच उंच घुसलेले आणखी एक शिखर खुणावू लागते; ज्याच्या शिरांना तटबंदीची शेलापागोटी चढवून अधिकच देखणे केलेले. नाव ‘तुंग’ ऊर्फ ‘कठीणगड’, वय अंदाजे हजार वर्षे आणि उंची साडेतीन हजार फूट!
तुंगी किंवा तुंगवाडी हे तुंगच्या पायथ्याचे गाव! शंभरएक उंबऱ्याचे! गडाची एकेकाळची बाजारपेठ असल्याने गावात आजही प्राचीन मंदिरे, जोती नजरेस पडतात. इथल्याच शिवारात ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर यांची ‘पवनाकाठचा धोंडी’ कादंबरी आकारास आली. तुंग गडाच्या हवालदाराचीच ही संघर्षकथा! तुंगला येण्यापूर्वी एकदा ती वाचली तर सारा पवन मावळ ओळखीचा होऊन जातो.
या गावातच गडाला खेटून भैरवनाथाचे मंदिर. तुंग वारीच्या मुक्कामासाठी सोयीचे. अंगणात ओळीने कुणा अज्ञात वीरांच्या स्मरणार्थ तयार केलेले वीरगळ! गावच्या रक्षणासाठी वा अन्य लढाईत कोणी मरण पावल्यास त्याच्या स्मरणार्थ अखंड दगडात चबुतरे (स्मारक) तयार करण्याची आपल्याकडे जुनी परंपरा आहे. याला ‘वीरगळ’ असे म्हणतात. इथे भैरवनाथाच्या मंदिरासमोर असे दहा-बारा वीरगळ आहेत. यातील एकाला स्थानिक लोक ‘तुळाजीराव’ असेही म्हणतात. या वीरगळांसोबत काही सतीचे हात असलेल्या शिळाही आहेत. वीर पुरुषाच्या मागे त्याची पत्नी सती गेल्यास तिच्या स्मरणार्थ ही सतीशिळा! असेच काही वीरगळ या मंदिराच्या मागे एका जुन्या वृक्षाच्या पायथ्याशीही आहेत. तुंगी गाव आणि हे मंदिर पाहात आपली पथारी लावायची आणि गडाकडे निघायचे. तुंगच्या तीनही बाजूने पवनेचा वेढा, तर दक्षिणेला ताशीव उभा कडा आहे. या उभ्या कडय़ातूनच या कठीणगडाची कठीण चढाई सुरू होते. हनुमान मंदिरापासून ही वाट निघते. तुळतुळीत कडय़ामध्ये खोबण्या, पायऱ्या खोदत हा मार्ग तयार केला आहे. या वाटेवर एक-दोन ठिकाणी खोदलेल्या टाक्याही दिसतात. या दरम्यान लागणारी मारुती व गणपतीची छोटी घुमटी आपल्याला दिशा दाखवत सोबत करते. शेवटी कडय़ातली ही वाट संपवत आपण गडाच्या दरवाजात पोहोचतो. एकापाठोपाठ दोन दरवाजे. कडय़ाला समांतर अशी रचना केल्याने हे दरवाजे इथे पोहोचेपर्यंत कळत नाहीत. या दरवाजांच्या कमानी अद्याप शाबूत, पण वेळीच मलमपट्टी न केल्यास इतर गडांप्रमाणे त्यादेखील लवकरच माना टाकतील.
शिखरवजा या गडाचा घेर मुळातच कमी. पूर्व-पश्चिम माची आणि त्याच्या पूर्व टोकावर शिवलिंगातील शाळुंकेप्रमाणे उंचावलेला बालेकिल्ला. सारा परिसर गवत आणि झाडाझुडपांमध्ये झाकून गेलेला. यातूनच मग सदर, किल्लेदाराचा वाडा, गणेश मंदिर, त्याच्या शेजारचे बांधीव तळे, खोदीव टाक्या असे एकेक अवशेष शोधत फिरावे लागते.
हा गड कधी अस्तित्वात आला याचा नेमका पुरावा नाही. पण गडाच्या पोटातील खोदकामे पाहता तो नि:संशय प्राचीन असावा. तुंगचा पहिला उल्लेख निजामशाहीत मिळतो. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या घोडदौडीतही तो लवकरच सहभागी झाला. औरंगजेबाच्या दक्षिण स्वारीत अन्य गडांबरोबर तुंगही मुघलांच्या कब्जात गेला. त्या वेळी औरंगजेबाने याचे नाव ठेवले- बंकीगड! पण हा बंकीगडचा इतिहास अगदी अल्पकाळाचा, औरंगजेबाची पाठ फिरताच मराठय़ांनी पुन्हा तुंगवर भगवा फडकवला आणि पुढे तो ब्रिटिशांच्या सत्तेनंतरही भोर संस्थानच्या रूपाने अखेपर्यंत फडकत राहिला. या साऱ्या राजवटींची पायधूळ या गडाने आपल्या माथी लावली. त्याचाच इतिहास सांगणारे हे अवशेष!
माचीतले हे सारे अवशेष पाहून झाल्यावर गडाच्या बालेकिल्ल्यावर निघावे. तळातून तुंग किल्ल्याचे हे टोक अगदी तासून टोकदार केल्याचे भासते. प्रत्यक्षात वर पोहोचल्यावर तर बालेकिल्ल्याची ही जागा आणखी टीचभर वाटते.
तुंग म्हणजे ‘उत्तुंग’, ‘उंच’! हे उत्तुंग, कठीणपण लक्षात घेऊनच शिवाजीमहाराजांनी गडाचे ‘कठीणगड’ असे नामकरण केले. आता या उत्तुंग अशा गडाला पवनेच्या पाण्याने तीन बाजूंनी वेढा घातला आहे. यामुळे हा गड, त्याची ही डोंगररचना अधिकच अद्भुत वाटते. कधी तो साऱ्या पवन मावळावर नजर रोखून बसलेल्या ढाण्या वाघाप्रमाणे दिसतो, तर कधी एखाद्या बुजुर्ग थकलेल्या पुराण पुरुषासारखा भासतो. त्याचे हे वैशिष्टय़पूर्ण रूपच मनात कायमचे घट्ट होऊन बसते आणि मग इथवर केलेली दमछाकही विसरायला होते.
गडाच्या या टोकावरच गडदेवता तुंगाईचे मंदिर आहे. मंदिराभोवती जेमतेम प्रदक्षिणा घालण्याएवढीच जागा. थोडे इकडेतिकडे झाले की खोल कडा! या टोकावर फिरतानाच इथे उभ्या कडय़ात खोदलेले एक आश्चर्य दिसते. उभ्या कडय़ातच बारा फूट लांब आणि सात-आठ फूट रुंदीची एक भुयारवजा खोली खोदली आहे. काहींच्या मते हे पाण्याचे टाके आहे. पण या खोलीच्या तळाशी हवा व प्रकाशासाठी एक छिद्रही दिसते. यामुळे बहुधा ही धान्य-साहित्य साठविणे, टेहळणी किंवा संरक्षणासाठी ऐन कडय़ात खोदलेली खोली असावी. पावसाळा सोडल्यास गडावर राहण्यासाठी ही एक चांगली जागा आहे. आडवाटांवर भटकणाऱ्यांनी कधीतरी या सर्वोच्च टोकावर मुक्कामाचा अनुभव नक्की घ्यावा. सकाळ-संध्याकाळी विविध रंगांत न्हाऊन निघणारा पवन मावळ पाहावा, पवनेच्या पाण्यात थरारणारी प्रतिबिंबे पाहावीत आणि रात्रीच्या गर्भात लगडलेले ते चांदणेही अनुभवावे. ..डोंगरवाटांवरचे हे असे क्षण जगण्याचे बळ देऊन जातात!