सध्या जगभरातील बहुतांश देशांना करोनानं आपल्या विळख्यात ओढलं आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्याही वाढत चालली आहे. अशा परिस्थितीत सर्वांनाच करोनाची लस केव्हा येणार हा प्रश्न पडलेला आहे. दरम्यान, करोनाचे उपचार लवकरात लवकर उपलब्ध व्हावे, यासाठी १०३ वर्षीय डॉक्टरानं वॉकींग मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी सुरू केलेली ही मॅरेथॉन १ जून रोजी सुरू झाली असून ती ३० जूनपर्यंत चालणार आहे. याद्वारे जमा होणारी रक्कम ते करोनाच्या उपचारासाठी सुरू असलेल्या शोध मोहिमेसाठी देणार आहेत.

रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार १०३ वर्षीय डॉक्टर अल्फोन्स लिम्पोल्स हे बेल्जिअममधील आहे. ते आपल्या गार्डनमध्ये रोज ४२.२ किलोमीटरचं वॉकींग मॅरेथॉन करत आहेत. यासाठी ते १ जूनपासून रोज १० लॅप्समध्ये १४५ मीटर चालतात. तसंच ३० जून पर्यंत ते थोडं थोडं चालून आपली मॅरेथॉन पूर्ण करणार आहेत. तसंच आपण किती लॅप्स चाललो हे लक्षात ठेवण्यासाठी ते प्रत्येक लॅपनंतर एका वाडग्यात एक स्टीक टाकतात.

ब्रिटनमधील १०० वर्षीय टॉम मूर यांनी अशाच प्रकारे आपल्या गार्डनमध्ये चालू आरोग्य सेवांसाठी रक्कम जमा केली होती. त्यावरून ही कल्पना आल्याचे ते सांगतात. “माझ्या मुलांनी मला सांगितलं की टॉम मूर यांच्या एवढा चालू शकणार नाही. त्यावेळी त्यांनी काहीतरी करायला हवं असं सुचवलं. तसंच मी माझ्या नातीलाही एक दिवस तुझ्यासारखा मॅरेथॉनमध्ये मीदेखील धावणर असं म्हटलं होत.” असं अल्फोन्स लिम्पोल्स यांनी सांगितलं. अल्फोन्स लिम्पोल्स यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत त्यांनी ६ हजार युरो इतकी रक्कम जमा केली आहे.