एखाद्या व्यक्तीला चार किंवा पाच भाषा, काहीवेळा १० भाषा येणे ठिक आहे. पण मूळ भारतीय वंशाची असलेली आणि सध्या दुबई येथे राहत असलेली एक मुलगी चक्क ८० भाषांमध्ये गाणे गाते. विशेष बाब म्हणजे या मुलीचे वय आहे केवळ १२ वर्षे. तिचे नाव आहे सुचेता सतीश. सुचेता मूळची चेन्नई येथील आहे. आपल्या या कलेसाठी तिने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठीही नोंद केली आहे. इतकेच नाही तर २९ डिसेंबरला होणाऱ्या एका कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी आणखी ५ भाषा नव्याने शिकत आहे. म्हणजे या कॉन्सर्टमध्ये ती ८५ भाषांमध्ये गाणे गाणार आहे.

सुचेता सध्या दुबईतील इंडियन हायस्कूल येथे इयत्ता ७ वीमध्ये शिकत आहे. सुचेताने अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत ८० भाषांमध्ये गाणे तयार केले होते. यामध्ये पहिल्यांदा तिने जपानी भाषा शिकली. आता जपानीच का असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल तर त्याचे कारण म्हणजे तिचे वडिल जपानमध्ये त्वचारोगतज्ज्ञ म्हणून काम करतात.

परदेशी भाषेतील एक गाणे शिकण्यासाठी तिला साधार ण २ तासांचा कालावधी लागतो. एखाद्या गाण्याचे शब्द आणि उच्चार सोपे असतील तर त्याहून कमी वेळात ती ते आत्मसात करते. आतापर्यंत माहित असलेल्या ८० भाषांपैकी फ्रेंच, जर्मन आणि हंगेरियन भाषा सर्वात कठिण होत्या असे ती सांगते. याआधी सर्वाधिक भाषांमध्ये गाण्याचा रेकॉर्ड आंध्रप्रदेशमधील केसीराजू श्रीनिवास नावाच्या व्यक्तीवर होता. त्यांनी २००८ मध्ये ७६ भाषांमध्ये गाणे गाऊन हा रेकॉर्ड बनवला होता.