तुम्हा सर्वांना ट्विटर म्हणजे काय ठाऊक असेलच. पण तुम्ही कधी ट्विच या सोशल नेटवर्किंग साईटबद्दल ऐकले आहे का? शक्यता तशी कमीच दिसतेय. पण याच वेबसाईटच्या मदतीने एका मुलाने आपल्या वडिलांवरील कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे गोळा करत आहे. विशेष म्हणजे हे पैसे तो केवळ व्हिडिओ गेम खेळून गोळा करत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे.

ट्विच या सोशल नेटवर्किंग साईटवरुन युझर्सला त्यांची आवडती अॅक्टीव्हीटी करताना लाइव्ह स्ट्रीमींग करता येते. त्यातही या लाइव्ह स्ट्रीमींगमध्ये युझर्सला त्यांच्या फॉलोअर्सबरोबर गप्पा मारता येतात. एखाद्या कारणासाठी पैसे जमा करण्यासाठी अशाप्रकारे ट्विचवरुन लाइव्ह स्ट्रीमींग केले जाते. कधीकधी येथील फॉलोअर्स एकमेकांवर टिकेचा भडीमार करतात तर कधीकधी एकत्र येऊन काहीतरी भन्नाट गोष्ट करतात. येथील फॉलोअर्सन अशाच पद्धतीने एका गेमरच्या वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी त्याची मदत करत आहेत.

ट्विचवर झेलटीव्ही (झेडव्हायएलटीव्ही) नावाने अकाऊण्ट चालवणारा मुलगा लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसत आहे. हा मुलगा या लाइव्हमध्ये फोर्टनाइट हा ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळताना दिसतो. त्याने मी माझ्या वडिलांसाठी लाइव्ह स्ट्रीमींग करत असल्याचे सांगितले आहे. ‘माझ्या वडिलांना कॅन्सरने ग्रासले आहे. हा कॅन्सर अखेरच्या टप्प्यातील असून सध्या ते केमोथेरिपीच्या माध्यमातून उपचार घेत आहेत.’ असं हा मुलगा लाइव्ह स्ट्रीमींगमध्ये सांगतो. आमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने मी मला शक्य त्या मार्गाने माझ्या कुटुंबाला या कठीण काळात मदत करण्याचा प्रयत्न करत असून हा त्याचाच एक भाग असल्याचे तो आपल्या फॉलोअर्सला सांगतो.

ट्विचवर अकाऊण्ट सुरु करण्यासाठी कमीत कमी वय १३ वर्षे असावे लागते. त्यामुळेच हा मुलगा १३ वर्षांचा असल्याचे समजते. हा मुलगा रोज सलग १० तास फोर्टनाइट हा ऑनलाइन व्हिडिओ गेम खेळून आपल्या फॉलोअर्सकडे वडिलांच्या इलाजासाठी मदत करण्याची विनंती करताना दिसत आहे. या मुलाला हे लाइव्ह स्ट्रीमींग करण्याचा फायदा झाला. रेडइटवर या मुलाची स्टोरी व्हायरल झाली आणि अनेक गेमर्सने त्यांच्या फॉलोअर्सला या मुलाला मदत करण्याची विनंती केली. ‘माझ्या वडिलांना मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे समजले होते. मात्र त्यांना हा कॅन्सर त्यांच्या शरीरामध्ये पसरत गेला आणि त्यांचा परिणाम त्यांच्या फुफुसांवर आणि यकृतावरही झाला,’ असं झेलटीव्ही हॅण्डलवरुन लाइव्ह करणाऱ्या या मुलाने लाइव्ह चॅटमधील कमेंटमध्ये सांगितले. ‘केमो थेरपीने उपचार न केल्यास एका वर्षात मृत्यू, तीन वर्ष कमेथेरपी केल्यास जगण्याची शक्यता २० टक्के आहे असे दोन पर्याय माझ्या वडिलांना डॉक्टरांनी दिले आहेत. त्यामुळेच मला शक्य त्या पद्धतीने मदत करा. तुम्ही दिलेले सगळे पैसे त्यांच्या उपचारासाठी वापरले जातील. माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला सर्वांना खूप सारे प्रेम,’ असं या मुलाने लाइव्ह दरम्यानच्या एका कमेंटमध्ये लिहिले आहे.

आपल्या मुलाच्या या प्रयत्नांमुळे त्याचे वडिलही खूप खुष आहेत. त्यांनी एका लाइव्हमध्ये सहभाग घेऊन त्यांच्या आजाराची माहितीही दिली. मला खूप अशक्तपणा आला असून मागील अनेक दिवसांपासून मी बेडवरच असून मला चालणेही शक्य होत नसल्याचे ते या स्ट्रीमींगमध्ये सांगताना दिसतात. या मुलाचे ट्विटर अकाऊण्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा तर ट्विच अकाऊण्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.