आंध्रप्रदेशमध्ये राहणाऱ्या २४ वर्षीय शेतकऱ्यानं आपल्या बागेत एक नवा प्रयोग केला आहे. त्याच्या या प्रयोगाला यश आलं असून आंब्याच्या एकाच झाडाला १८ प्रकराचे आंबे लागले आहे. विविध प्रकारच्या आंब्यांनी भरलेलं हे झाड पाहण्यासाठी गावातल्या लोकांनी गर्दी केली आहे. या भागातील जिल्ह्याधिकारी लक्ष्मीकांत यांनी तरुणाच्या प्रयोगचं कौतुक केलं आहे. कृषीक्षेत्रात विविध प्रयोग करण्यासाठी त्याला हरप्रकारे मदत करण्याचं आश्वासनही दिलं आहे आहे.

कुप्पाला रमा गोपाल कृष्णा या तरुण शेतकऱ्यांची आमराई होती. पण या आमराईतून हवं तेवढं उत्पन्न त्याला मिळत नव्हतं. त्यामुळे आंब्यांची झाडं तोडून त्याजागी दुसरं काहीतरी करण्याचा सल्ला अनेकांनी त्याला दिला. पण, कुप्पालच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार सुरू होते. वेगवेगळ्या प्रजातीचे कलम एकत्र वाढवण्याचा अभिनव प्रयोग त्यानं केला. अर्थात यावर त्याचं हसंही झालं. पण अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आलं आज त्याच्या आमराईत असलेल्या झाडाला १८ प्रकारचे आंबे लागतात. एकाच झाडाला, हापूस, पायरी, तोतापुरी, बेंगनपल्ली, दशेरा, लंगडा, मल्लिका, हिमायती असे एकूण अठरा प्रकारचे आंबे लागतात.  विविध प्रकारच्या आंब्यांनी बहरलेलं हे झाड पाहण्यासाठी तसेच हे तंत्र शिकून घेण्यासाठी अनेकजण कुप्पालाच्या शेतावर येतात. तो देखील मोठ्या आनंदानं त्यांना याचे धडे देतो.

आंब्याच्या एकाच झाडाला ३५० प्रकारचे आंबे
लखनऊपासून हरदोई रस्त्यावर २५ किलोमीटर अंतर पार केल्यानंतर मलीहाबाद परिसरात कलीमुल्ला यांची आंब्याची बाग आहे. त्यांच्याही बागेत आंब्याचे एक अनोखे झाड असून, बागेतील ते मुख्य आकर्षण आहे. आंब्याच्या या एकाच झाडाला ३५० प्रकारचे आंबे फळतात. एकाच आंब्याच्या झाडाच्या वेगवेगळ्या फांद्यांना एकाच वेळी ३५० प्रकारचे आंबे लागणे हे जगातील पहिलेच उदाहरण असण्याची शक्यता आहे. यातील काही आंबे दिसायला कारल्यासारखे, तर काही आंबे वांग्याच्या आकारासारखे आहेत. काहींचा आकार बदामासारखा आहे, तर कोणाचे वजन जवळजवळ एक किलो इतके आहे. कलीमुल्ला या झाडास भारत नावाने संबोधतात. आपल्या देशात ज्याप्रमाणे विविध जाती-धर्माचे लोक राहातात त्याचीच प्रतीमा या आंब्याच्या झाडात पाहायला मिळते असे त्यांचे म्हणणे आहे. जर विविधतेने नटलेले हे आंबे मिळूनमिसळून राहातात, तर आपण का राहू शकत नाही, असा प्रश्नदेखील ते उपस्थित करतात. कलीमुल्ला यांना २००८ साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

कलीमुल्ला या झाडास भारत नावाने संबोधतात.