आज काल अशा अनेक गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात की ते पाहून माणूसकीचा अंत झालाय की काय असा प्रश्न सारखा विचारावासा वाटतो. समोर एखादी व्यक्ती शेवटचे क्षण मोजत असताना फोटो काढण्याची किंवा ते व्हिडिओ लाईव्ह करण्याची दुर्बुद्धी सुचण्याएवढं आपलं काळीज दगडासारखं झालंय का? असा प्रश्न अनेकदा उभा राहतो. अपघात होत असताना सेल्फी काढून ते व्हिडिओ फेसबुक, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर लाईव्ह करण्याएवढी बौद्धिक पातळी खाली का उतरते हे कळत नाही. अशीच एक दुर्दैवी घटना कॅलिफोर्नियामध्ये घडली आहे. आपल्या बहिणीचा डोळ्यादेखत मृत्यू होत असताना तिची सख्खी बहिण मात्र तिच्या मृत्यूचा व्हिडिओ लाईव्ह करण्यात व्यस्त होती.

कॉलिफोर्नियामध्ये ही घटना घडली आहे. एक १८ वर्षांची मुलगी आपली बहिण आणि इतर मैत्रिणींसोबात गाडीने चालली होती. ती स्वत: गाडी चालवत होती. पण गाडी चालवताना वाहतुकीचे सारे नियम तिने धाब्यावर बसवले होती. गाडी वेगात होती. त्यातल्या एकानेही सीटबेल्ट लावला नव्हता. वेग अधिक असल्याने गाडीचा अपघात झाला आणि गाडी हवेत उडून रस्त्याच्या कडेला आदळली. यात तिच्या मैत्रिणी जखमी झाल्या. तिची १४ वर्षांचीही बहिण गंभीर जखमी झाली. तिला वाचवण्यासाठी तिने प्रयत्न करायला हवे होते. पण तिने मात्र लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात वेळ घालवला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या गुन्ह्यासाठी तिला शिक्षाही होऊ शकते