हत्ती असे म्हटले तरी अनेकांचे धाबे दणाणते. हा प्राणी अवाढव्य असल्याने त्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच भिती वाटते. नुकतीच अशीच एक घटना घडली असून तामिळनाडूतील मुदुमलाई व्याघ्र अभयारण्यात चेकपोस्ट जवळ दोन हत्ती समोरासमोर आले. या दोघांमध्ये जोरदार जुंपली आणि ते एकमेकांच्या अंगावर जात असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडियो कॅमेरात कैद झाला आणि तो सोशल मीडियावर व्हायरलही झाला. ही घटना इथवरच थांबली नाही तर त्यांच्या या भांडणाचा परिणाम याठिकाणच्या वाहतुकीवरही झाला. काही काळ येथील वाहतुक खोळंबली, मात्र हे हत्ती वाटेतून हटल्यावर ती पूर्वपदावर आली.

सुरुवातीला हे दोन हत्ती डोक्याने एकमेकांना ढोसत असल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यावेळी ते झाडी आणि गवतात असल्याचे दिसते. मात्र काही वेळाने ते रस्त्यावर येतात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही दुर्घटना घडली नाही हेच नशीब. याआधीही हत्तीच्या वेगवेगळ्या करामतींच्या बातम्या समोर आल्या आहेत. नुकतेच जंगलातून आलेल्या एका हत्तीने जवळच्या वस्तीत असलेल्या घराच्या बाहेर ठेवलेले अन्नपदार्थ खाल्ले होते. ही घटनाही कॅमेरात कैद झाली होती.