चांगला पाऊस पडावा यासाठी बेडकांचं लग्न लावण्यात आल्याचं तुमच्या ऐकिवात असेल पण बेडकांचा घटस्फोट करण्यात आला असल्याचं तुम्ही कधी ऐकलं किवा पाहिलं नसेल. पण मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये वरुण देवाकडे पाऊस थांबावा यासाठी विनंती करत चक्क बेडकांचा घटस्फोट करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे दोन महिन्यांपुर्वी याच बेडकांचा पाऊस पडावा यासाठी लग्न लावून देण्यात आलं होतं.
भोपाळमधील दुष्काळग्रस्त भागात १९ जुलै रोजी वरुण देवाकडे पाऊस पडावा अशी प्रार्थना करत बेडकांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. यानंतर इतका पाऊस पडला आहे की, मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत भोपाळमध्ये ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी भोपाळमध्ये पावसाने १३ वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे.
पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने धरणांचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. बुधवारी भोपाळमधील काही सखल भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचलं. परिस्थिती अजून बिघडू नये यासाठी इंद्रपुरी परिसरातील ओम शिव सेवा भक्ती मंडळाने बेडकांचा घटस्फोट केला आहे. अगदी पारंपरिक पद्धतीने हा घटस्फोट करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2019 12:50 pm