पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रमामध्ये झळकणार आहेत. कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनेच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे. बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन एक टिझर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ नक्की पाहा डिस्कव्हरी इंडियावर ऑगस्ट १२ रोजी रात्री नऊ वाजता.’

बेअरने केलेल्या या घोषणेनंतर ट्विटरपासून फेसबुकपर्यंत त्याच्याच नावाची चर्चा आहे. ट्विटरवर या कार्यक्रमासंदर्भातील #PMModionDiscovery हा हॅशटॅग पहिल्या क्रमांकावर तर Bear Grylls हा टॉपिक चौथ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत आहे. पण मोदींबरोबर झळकणाऱ्या बेअरचा आतापर्यंतचा प्रवास खूपच भन्नाट आहेत. त्याच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जगभरातील चाहत्यांमध्ये दिसून येते.

एखादा माणूस संकटात अडकला तर तो कसा वाचू शकेल याबद्दलचे प्रात्यक्षिके दाखवणारा बेअरचा चेहरा ‘डिस्कव्हरी’वरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मुळे घराघरात पोहचला आहे. जंगलामध्ये एकटेच अडकल्यावर आपण नैसर्गिक साधनांचा वापर करुन लोकवस्तीपर्यंत कशाप्रकारे पोहचू शकतो याबद्दल भाष्य करणारा ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रम प्रेक्षकांच्या खास पसंतीस पडला. या कार्यक्रमामध्ये बीलने अगदी जंगली वनस्पतींपासून ते झेब्रा, साप, विंचू, ऊंट, मगर किंवा अगदी मिळेल तो प्राणी जिवंत खाण्यापर्यंतचे चित्रिकरण दाखवण्यात आले. हेलिकॉप्टरमधून किंवा धबधब्यामध्ये उडी मारणे, ट्रेनच्या बोगद्यातून अगदी जीवाच्या अकांताने पळत बाहेर येत स्वत:चा जीव वाचवणे अशा अनेक जिवघेण्या प्रत्यक्षिकांमुळे बेअर अगदी थोड्या दिवसांमध्ये लोकप्रिय झाला. अगदी साध्या साध्या गोष्टी सांगायच्या झाल्याच तर कोणती फुलं पान खायची? कोणती नाही? या सगळ्याबद्दल वैज्ञानिक स्पष्टिकरणासहीत बेअर आपल्या कार्यक्रमामधून सांगतो. मोदींबरोबर प्रदर्शित होणाऱ्या खास भागानिमित्त जाणून घेऊयात बेअरबद्दलच्या २० खास गोष्टी…

१)
बेअर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला तो वयाच्या २३ व्या वर्षी. १९९८ साली तो जगातील सर्वोच्च माऊण्ट एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वात तरुण गिर्यारोहक ठरला. त्यावेळी गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने याची दखल घेतली होती. तेव्हापासून आत्तापर्यंत चार जणांनी हा विक्रम मोडला आहे.

२)
९० दिवसांमध्ये त्याने एव्हरेस्ट मोहिम फत्ते केली होती.

३)
बेअरचे खरे नाव एडव्हर्ड मिशेल ग्रिल्स असे आहे. तो एक आठवड्याचा असताना त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला ‘बेअर’ हे टोपण नाव दिले होते.

४)
बेअरने कराटेचे प्रशिक्षण घेतले आहे. त्याच्याकडे कराटेमधील सेकेण्ड डॅन ब्लॅक बेल्ट आहे.

५)
बेअरने तीन वर्ष ब्रिटीश स्पेशल एअर सर्व्हिसमधील ‘एसएएस २१’ दलामध्ये काम केले आहे.

६)
याच काळात त्याने त्याने पाण्यात खोलपर्यंत डायव्हिंग करणे, पॅरशूट वापरणे, शस्त्राशिवाय लढाई करणे, जंगलामध्ये राहणे आणि इतर गोष्टींचे प्रशिक्षण घेतले.

७)
१९९८ साली एव्हरेस्ट शिखर सर करण्याच्या एक वर्ष आधी म्हणजेच १९९७ साली पॅरशूट निकामी झाल्याने बेअरचा अपघात झाला. या अपघातामध्ये त्याच्या पाठीच्या कण्याला जबर मार लागून तीन जागी कण्याचा इजा झाली होती.

८)
बेअरने लिहिलेल्या ‘फेसिंग अप’ या पहिल्याच पुस्तकाला वाचकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. ब्रिटनमधील टॉप टेन पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाला स्थान मिळाले होते. नंतर हेच पुस्तक अमेरिकेमध्ये ‘द किड हू क्लाइम्ब माऊंट एव्हरेस्ट’ या नावाने प्रकाशित करण्यात आले.

९)
बेअरने आत्तापर्यंत ११ पुस्तके लिहिली आहेत.

१०)
२०१२ साली बेअरने ‘मड, स्वेट अॅण्ड टीअर्स: द ऑटोबायोग्राफी’ या नावाने आपले आत्मचरित्र प्रकाशित केले.

११)
बेअरच्या माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामधून तो पहिल्यांदा टिव्हीवर झळकला. बेअरच्या या मोहिमेवर आधारित मालिकेचे नाव होते ‘शोअर फॉर मॅन’

१२)
त्यानंतर २००६ साली त्याला ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये संधी मिळाली. पाच वर्ष चालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो अमेरिकेतील घराघरात ओळखीचा चेहरा झाला. अमेरिकेत हा कार्यक्रम पहिल्या क्रमांकावर होता.

१३)
अमेरिकेतील यशानंतर हा कार्यक्रम ‘डिस्कव्हरी’ने जगभरातील २०० देशांमध्ये प्रदर्शित केला.

१४)
२००६ ते २०११ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’चे सात सिझन प्रदर्शित करण्यात आले. सर्व भागांमध्ये बेअरच नैसर्गिक परिस्थितींशी दोन हात करताना दिसला.

१५)
‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या थिमवर आधारीत एक गेमही प्ले स्टेशनवर आहे. बेअरच्या हस्तेच या गेमचे अनावरण करण्यात आले होते. या गेममध्ये बेअरला अनेक नैसर्गिक संकटांचा समाना करत निश्चित स्थळी पोहचवण्याचा प्रयत्न गेमर्स करतात.

१६)
आपल्या ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ कार्यक्रमात बेअरने अगदी याकचे डोळे, ऊंटाचे मांस, बकऱ्याचे मांस कच्चेच खाल्ले आहे. याच कार्यक्रमात त्याने छोटे साप, किडे आणि कोळी जिवंत खाल्याचेही दाखवण्यात आले आहे.

१७)
बेअरचे विवाहित असून त्याला तीन मुले आहेत. जेसी, मार्माड्युके आणि हकलबेरी अशी त्याच्या मुलांची नावे आहेत.

१८)
बेअरच्या मोठ्या मुलाने वायाच्या सातव्या वर्षी स्वीमींगपूलमध्ये बुडणाऱ्या एका मुलीचे प्राण वाचवले आहेत.

१९)
अमेरिका आणि ब्रिटनमधील अनेक बड्या कार्यक्रमांमध्ये बेअरने उपस्थिती लावली असून अनेक नामांकित टॉक शोमध्ये त्याच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत.

२०)
beargrylls.com ही बेअरची वेबसाईट आहे.