सामान्यपणे एखादा मुलगा मुलीला प्रपोज करताना गुलाबाचे फुल वगैरे देतो. अगदीच झालं तर एखादं छोटसं गिफ्ट किंवा थेट अंगठी देऊन मुलं मुलीला प्रपोज करतात. एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेमध्ये दिसणाऱ्या या अशा द्ष्यांमुळे मुलानेच मुलीला प्रपोज केलं पाहिजे असं सामान्यपणे मानलं जातं. मात्र चीनमधील एका तरुणीने तिच्या प्रियकराला लग्नासाठी मागणी घातली. बरं आता यात विशेष काय असं तुम्ही म्हणत असाल तर खरी गंमत पुढे आहे. या तरुणीने आपल्या प्रियकराला लग्नाची मागमी घालताना थेट बीएमडबल्यू गाडी आणि घर भेट म्हणून दिलं आहे. बसला ना धक्का. पण हे वत्त खरं आहे.

२४ वर्षीय शाओजींग या तरुणीने तिचा प्रियकर असणाऱ्या शाओक या तरुणाला लग्नासाठी मागणी घातली. या दोघांची भेट झाली त्या गोष्टीला एक वर्ष पुर्ण झाले त्याच दिवशी शाओजींगने शाओककडे एक मागणी केली. तिने त्याला आपण पहिल्यांदा ज्या मॉलमध्ये भेटलो होतो तिथेच जाऊ असा आग्रह केला. त्याच मॉलमध्ये शाओजींगने शाओकचे मित्र आणि परिवाराच्या मदतीने एक खास गिफ्ट दिले. मॉलमध्ये एक वर्षापूर्वी शाओकने शाओजींगला प्रपोज केलं होतं त्या मॉलमधील जागी हे दोघे पोहचले. वर्षभरापुर्वी काय कसं घडलं याबद्दल बोलत असतानाच शाओजींगने आपल्या प्रियकराला एक फुलांचा गुच्छ भेट दिला. त्या पुष्पगुच्छामध्ये बीएमडब्ल्यु गाडीची चावी होती. इतकच नाही या तरुणीने एक घरही या मुलाच्या नावे खरेदी केलं आहे. त्याचे कागदपत्रही तिने त्याला भेट म्हणून दिल्याचे एशिया वनने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

या आगळ्या वेगळ्या लग्नाच्या मागणीचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. शाओजींगने आपल्या आई-वडिलांच्या मदतीने गाडी आणि घर घेतल्याचे समजते.

“माझ्या प्रियकराने माझ्यासाठी जो त्याग केला आहे तो खूप खास आहे. मात्र या त्यागाच्या मोबदल्यात प्रेम व्यक्त करण्यासाठी मी त्याला काय देऊ शकते असा विचार केला. त्यावेळी मी त्याला गाडी आणि घर भेट देण्याचे ठरवले. मला आयुष्यभर त्याची सोबत हवी आहे,” असं शाओजींगने चीनमधील शिंग टाओ या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. अर्थात तिच्या या भन्नाट प्रपोजलमुळे शाओक भावूक झाला. त्याने तिला लग्नासाठी होकार कळवला आहे.