ज्याप्रमाणे महिलांना २६ आठवडे म्हणजेच ६ महिन्याची प्रसूती रजा दिली जाते.त्याचप्रमाणे झोमॅटोनं पुरूषांनाही सहा महिने रजा मिळणार आहे. शिवाय झोमॅटोकडून ६९ हजार रूपयांचा बोनसही देण्यात येणार आहे. अशा प्रकारची रजा पुरुषांना देणारी झोमॅटो ही भारतातली पहिली मोठी कंपनी आहे. पुरूषांनाही सहा महिने रजा देण्यात येणार असल्याची माहिती झोमॅटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

बाळाचा सांभाळ करण्यासाठी आई आणि वडिलांची दोघांची गरज पडते. संगोपनात माता व पित्याची समान भूमिका निश्‍चित करण्यासाठी पुरूषांनाही रजा मिळायला हवी. आईशिवाय कुटुंबातील इतर नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या रजेला ‘सेकंडरी केअरगिव्हर लिव्ह’ अर्थात ‘दुय्यम देखभाल रजा’ असे म्हटले जाते. बाळाच्या पित्याला देण्यात येणारी रजाही याच श्रेणीत येते, असे दिपेंदर यांनी म्हटले आहे.

झोमॅटोशिवाय फर्निचरची एक दिग्गज आंतरराष्ट्रीय कंपनी आयकिया आपल्या कर्मचाऱ्यांना सहा महिने पॅटर्निटी रजा देते. भारतातल्या बऱ्याच कंपन्या पुरुषांना पॅटर्निटी रजा दोन आठवडेच देतात.

या निर्णयानंतर झोमॅटोवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.