जगभरामध्ये करोनामुळे ओढावलेल्या संकटाची चर्चा सुरु असतानाच चीनमधून वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. येथील शॅनडाँगमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यामधून चार इंचांचा गंजलेला चाकू बाहेर काढला. धक्कादायक बाब म्हणजे या रुग्णावर २६ वर्षांपूर्वी हल्ला झाला होता. मात्र मागील २६ वर्षांपासून हा चाकू या व्यक्तीच्या डोक्यामध्येच होता.

मिळालेल्या माहितीनुसार चीनमधील शेतकरी असणाऱ्या ड्युओरोजी (Duorijie) यांच्यावर १९९० च्या दशकामध्ये एक हल्ला झाला होता. या हल्ल्यामध्ये चार इंचाचा चाकू त्यांच्या डोक्यामध्ये घुसला होता. तेव्हापासून हा चाकू त्यांच्या डोक्यामध्येच होता. त्यांनी यासंदर्भात अनेक डॉक्टरांच्या भेटी घेतल्या. २०१२ साली तर त्यांना डोकेदुखी आणि उजव्या डोळ्याने दिसण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेत हा चाकू काढता येईल का याबद्दल विचारणा केली मात्र तेव्हाही हा चाकू काढणे शक्य नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

त्यानंतर पुन्हा त्रास जाणवू लागल्याने हा चाकू काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. हा चाकू काढल्यास रुग्णाच्या जीवाला धोका पोहचू शकतो असं डॉक्टरांचे म्हणणे होते. मात्र वारंवार डोके दुखत असल्याने आणि औषधांचाही काही परिणाम होत नसल्याने अखेर डॉक्टरांनी हा चाकू काढण्याचा निर्णय घेतला.  डॉक्टरांनी दोन मोठ्या शस्त्रक्रीया करुन फळं कापणाऱ्या चाकूच्या आकाराचा हा चाकू या व्यक्तीच्या कवटीमधून बाहेर काढला. डोळ्याच्या खोबण्यांपासून हा चाकू अगदी डोळ्याच्या मुख्य नसेला दाबून टाकेपर्यंत आत शिरल्याचे स्कॅनमध्ये दिसून आले.

Photo: ASIAWIRE/SFMU 1ST HOSPITAL

ही शस्त्रक्रीया कऱणारे मुख्य न्युरोसर्जन लुई गुआंगकन यांनी रुग्णाला होणारा त्रास थांबवण्यासाठी हा चाकू बाहेर काढण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. “रुग्णाच्या तब्बेतीमध्ये चांगली सुधारणा असून आता ते चालूही लागले आहे. आता त्यांना डोकेदुखीचा त्रास होत नाही आणि त्यांना स्पष्ट दिसू लागलं आहे,” असं डॉक्टरांनी सांगितलं.