मुंबईतील दहशतवादी हल्ल्यास अकरा वर्षे पूर्ण झाली. पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्या १० दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते, त्या वेळी इतर ९ दहशतवादी मारले गेले तर अजमल कसाब हा जिवंत सापडला होता. नंतर त्याला भारतीय न्यायालयाच्या आदेशानुसार फाशी देण्यात आली. आज अकरा वर्षांनंतरही या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. आज सकाळपासूनच नेटकरी सोशल नेटवर्किंग साईट्सवरून या हल्ल्यात बळी गेलेल्या तसेच मुंबईच्या संरक्षणासाठी शहीद झालेल्यांना आदरांजली अर्पण करत आहेत आणि त्या दिवसाच्या आठवणींना उजाळा देताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेटपटूंनीदेखील त्यांना आदरांजली वाहिली.

याशिवाय, आजचा २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून भारत सरकारकडून देशभर साजरा केला जातो. यानिमित्त संविधान गौरवाचे कार्यक्रम, संविधान गौरव सप्ताहाचे आयोजन केले जाते. यंदा २६ नोव्हेंबर ते १४ एप्रिलपर्यंत भारत सरकारतर्फे संविधान गौरव अभियान साजरे केले जाणार आहे. संविधान दिनानिमित्त आज संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार आहेत. मात्र राज्यातील सत्तास्थापनेवरुन झालेल्या संघर्षानंतर शिवसेना आणि भाजपामधील संबंध ताणले गेले आहेत. सध्या महाराष्ट्रात दर दिवशी नाट्यमय घडामोडी घडत असून याचा परिणाम दिल्लीतही जाणवत आहे. एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेने संविधान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वात काही विरोधी पक्षदेखील संविधान दिनानिमित्त आयोजित संसदेतील संयुक्त बैठकीवर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.