फोर्ब्सच्या यादीत नामांकन मिळणे आणि आपल्या कार्याची दखल घेतली जाणे ही जगभरातील लोकांसाठी अतिशय मानाची बाब असते. नुकतेच यामध्ये आणखीन एका मराठी तरुणाच्या नावाची नोंद झाली असून त्याच्या अनोख्या कल्पनेची दखल फोर्ब्सने घेतली आहे. सागर यरनाळकर असे या तरुणाचे नाव असून दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी शक्कल त्याने लढवली आहे. दूधवाल्यांचे प्रस्थापित नेटवर्क वापरुन त्याने घरपोच किराणा आणि फळे, भाजीपाला मिळेल अशी सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या डेली निंजा (DailyNinja) या अनोख्या अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. त्याचा मित्र अनुराग गुप्ता हाही त्याचा या व्यवसायातील पार्टनर आहे. सागर मूळचा ठाण्यातील असून त्याने इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ३० अंडर ३० या फोर्ब्सच्या मानाच्या यादीत २०१९ वर्षासाठी झळकल्यानंतर सागरच्या डोक्यातून आलेल्या या सुपिक कल्पनेबाबत ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने त्याच्याशी साधलेला खास संवाद…

दूधवाल्यांच्या माध्यमातून अशाप्रकारचा व्यवसाय करता येतो हे कसे सुचले?

सागर – नोकरीनिमित्त बँगलोरला राहत असताना माझ्यासोबत एक मित्र राहायचा. तो अतिशय आळशी होता त्यामुळे उशीरा उठायचा. मग ऑफीसला जायला घाई होत असल्याने तो आपल्या दूधवाल्यालाच ब्रेड, इडलीचे पीठ किंवा आणखी काही आणायला सांगायचा. त्याच्या याच गोष्टीवरुन ही व्यवसायाची एक संकल्पना आहे असे वाटून मी आणि माझा मित्र अनुराग यांनी हा व्यवसाय करायचे ठरवले.

इंजिनिअरची नोकरी सोडून अशाप्रकारच्या व्यवसायात उडी घेण्याचा निर्णय कसा झाला?

भारतीय घरांमध्ये रोज सकाळी दूध येणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. त्याच्याचसोबत जर आपण टायअप करुन इतर सामानही पाठवले तर ग्राहकांचीही सोय होईल आणि नव्याने रोजगारही उपलब्ध होतील. मग ही यंत्रणा चालवायची कशी याविषयी विचार सुरु झाला आणि ठराविक दूधवाल्याकडे विशिष्ट ऑर्डर कशी पोहोचेल याचे प्लॅनिंग सुरु झाले. मग प्रायोगिक तत्वावर सुरु झालेली या यंत्रणेचे जाळे कमी कालावधीत पसरले.

या अॅप्लिकेशनबाबत खास गोष्ट काय सांगाल?

रात्रीच्यावेळी आपण दूध किती हवे यासाठी दारात कूपन ठेवतो. दुसऱ्या दिवशी दूधवाला ठेवलेल्या कूपनप्रमाणे पिशव्या ठेऊन जातो. त्याचप्रमाणे रात्री उशीरा म्हणजे अगदी ११ वाजेपर्यंतही आपल्याला दुसऱ्या दिवशी आवश्यक असणाऱ्या वस्तू सांगितल्यास रात्रीत त्या दूधवाल्यापर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा राबवली जाते. दुसऱ्या दिवशी आपण झोपेतून उठायच्या आत आपल्याला हवे ते सामान दारात पोहोचलेले असते. रात्री झोपेच्या कालावधीत हे सामान मिळाल्याने आपला सामान आणण्याचा ताण वाचतो. तसेच दुधाचे ज्याप्रमाणे महिन्याला बील भरावे लागते, त्याच बीलाबरोबर हे बील महिन्याला भरावे लागणार आहे.

इतक्या लहान वयात फोर्ब्सकडून सन्मान झाला त्याबद्दलच्या तुमच्या काय भावना आहेत

आम्ही ही संकल्पना सुरु करुन आता साडेतीन वर्षे होत आली आहेत. सुरुवातीला केवळ बँगलोरमध्ये सुरु केलेल्या या प्रकल्पाचा आता मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. बँगलोरबरोबरच मुंबई, पुणे, हैद्राबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आता कंपनीचे ५८ हजारांहून अधिक ग्राहक आहेत. मागील ३ ते ४ महिन्यांपूर्वी आम्हाला अचानक फोर्ब्सकडून फोन आला. आमची ही संकल्पना त्यांना आवडली असल्याचे त्यांनी कळवले. त्यानंतर ४० ते ५० स्पर्धकांमधून आमची निवड करण्यात आली.

सायली जोशी

sayali.patwardhan@loksatta.com