बांगलादेशातल्या एका प्राणी संग्रहालयात जंगलाच्या राजाचा शाही विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला. या विवाहाला जवळपास ४०० व-हाडी मंडळींनी उपस्थिती लावली. बांगलादेशमधल्या चित्तागाँग संग्रहालयात हा शाही विवाह साजरा करण्यात आला. या प्राणी संग्रहालयात गेल्या ११ वर्षांपासून सिंहिण राहत आहे तर गेल्याच महिन्यात रंगापूर प्राणी संग्रहालयातून येथे सिंह आणला गेला. या दोघांनाही वेगवेगळ्या पिंज-यात ठेवण्यात आले होते नंतर मात्र त्यांना एकाच पिंज-यात ठेवण्यात आले. तसेच या जोडप्यांचा विवाह देखील लावण्यात आलाय. या दोघांना पाहण्यासाठी अनेक लोक येतील असा विश्वास या संग्रहालयाला वाटतो. या जोडप्यांसाठी खास मांसाहाराची मेजवानी ठेवण्यात आली होती. या लग्नातले विशेष आकर्षण होते ते मांसाहारी केक. मांस, अंडी वापरून हृदयाच्या आकाराचा हा केक बनवण्यात आला होता. या दोघांच्या लग्नानिमित्त संग्रहालय सजवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी आजूबाजूच्या शाळेतील लहान मुलांना बोलावून प्री वेडिंग पार्टी देखील देण्यात आली होती. १ महिन्यांपूर्वी आणलेल्या या सिंहाचे नामकरण नाभा असे करण्यात आले तर या सिंहिणीला नोवा या नावाने या संग्रहालयात ओळखले जाते. यांच्या लग्नाच्यानिमित्ताने बांग्लादेशच्या प्राणी संग्रहालयातील या शाही जोडप्यांचा फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.