लंडन आर्ट फेअरमध्ये ठेवण्यात आलेलं ४०० वर्षे जुनं अमुल्य टेबल त्याच्या किंमतीमुळे सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरला आहे. भारतीय मुल्याप्रमाणे आजच्या घडीला या टेबलची किंमत तब्बल ७८ कोटी ७१ लाखांहून अधिक आहे. आजच्या घडीतलं सर्वात महागडं टेबल म्हणून या टेबलकडे पाहिलं जातं.

खरं तर हे केवळ टेबल नसून कलेचा सर्वोत्तम नमुना म्हणून याकडे पाहिलं जातं . विशेष म्हणजे ही कला चित्रकार, वास्तूविशारद लेखक जॉर्जिओ वसारी यांची निर्मिती आहे. त्यामुळे त्याचे मोल हे सर्वाधिक आहे यात काहीच शंका नाही. २८ जून ते ४ जुलै या कालावधीच हे टेबल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. १५६८ मध्ये फ्रान्सेस्को दी मेडीसी यांनी जॉर्जिओ वसारी यांना ही कलाकृती तयार करायला सांगितली होती.

त्याकाळी जॉर्जिओ वसारी हे फ्लोरेन्समधले सर्वोत्तम कलाकार होते.  हे टेबल तयार करण्यासाठी त्यांनी वेगळी पद्धत वापरली होती. मौल्यवान दगडांचे असंख्य छोटे तुकडे एकसंघ करून त्यापासून हे टेबल तयार करण्यात आलं. यासाठी जॉर्जिओ यांना थोडी थोडकी नाही तर तब्बल दहा वर्षे लागली होती. म्हणूनच या टेबलला कलेचा सर्वोत्तम नमुना मानला जातो. १७४३ पर्यंत हे टेबल मेडीसी यांच्या राजघराण्याकडे होतं.  त्यानंतर ते रोमन सम्राट फ्रान्सिस पहिला यांच्या कुटुंबाकडे सुपूर्त करण्यात आलं. तीन पिढ्या हे टेबल सम्राट फ्रान्सिस यांच्या कुटुंबाकडे होतं.

या टेबलची आजच्या घडीची किंमत ही साधरणं ११ मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय मुल्याप्रमाणे ७८ कोटी ७१ लाखांहून अधिक आहे. पण कलेच्या या अमुल्य ठेव्याचं मोल न लावता कलारसिकानं त्याचा फक्त आस्वाद घ्यावा असं अनेकांनी म्हटलं आहे.