News Flash

गावकऱ्यांनी वेडं ठरवल्यावरही पाण्यासाठी ‘त्याने’ २७ वर्षे कष्ट उपसले आणि …

ते आता या गावचे 'हिरो' ठरले

२७ वर्षे शामलालनं एकट्यानं घाम गाळून तळं खोदलं. (छाया सौजन्य : ANI )

जगात अशक्य असं काहीच नसतं, जर निश्चय दृढ असेल तर माणूस कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो आणि हेच दाखवून दिलं ते ४१ वर्षांच्या शामलाल यांनी. वयाच्या पंधराव्या वर्षांपासून ते फक्त जमीन खणत होते, गावकऱ्यांनी त्यांना वेडं ठरवलं होतं. जमीन खोदून तुझ्या हाती काय लागणार? असा प्रश्न जो तो खोचकपणे त्यांना विचारायचा. गेल्या २७ वर्षांपासून शामलाल गावकऱ्यांच्या चेष्टेचा विषय बनले होते. पण लोकांनी आपल्याला कितीही मूर्खात काढले तरी आपला हेतू जोपर्यंत पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत हार मानायची नाही हे त्यांनी मनात पक्क केलं होतं. त्यांच्या याच जिद्दीमुळे आज दुष्काळग्रस्त गावातील हजारो लोकांना पिण्यासाठी पाणी मिळालं आहे.

शामलाल छत्तीसगडमधल्या साजा पहाड गावातले. त्यांचे गाव दुष्काळग्रस्त भागात येते. त्यामुळे पाण्यासाठी गावकऱ्यांना शेकडो किलोमीटर वणवण करावी लागायची. पाण्याआभावी अनेक प्राणी मृत्युमुखी पडले होते. लहानपणापासूनच दुष्काळाची गावाला पोहोचलेली झळ त्यानं पाहिली होती. स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही मदत गावकऱ्यांना मिळेना. शेवटी गावकऱ्यांसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी त्यांनी मोठ तळं खोदायचं ठरवलं. या तळ्यात पाणी साठवता आलं तर उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न तरी मिटेल, अशी कल्पना त्यांच्या डोक्यात आली, ही कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लगेचच त्यांनी आपले प्रयत्नही सुरू केले. अनेक वर्षे तळं खोदण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली पण हाती काहीच लागेना. अनेकांनी त्यांना वेडं ठरवलं, काहींनी तर हे काम इथेच थांबवण्याचा सल्लाही त्यांना दिला पण मदतीसाठी मात्र कोणीच आलं नाही. २७ वर्षे शामलाल यांनी एकट्यानं घाम गाळून तळं खोदलं. एक एकर परिसरात हे तळं पसरलं आहे, आज या तळ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. या गावात आजही पक्के रस्ते, वीज नाही. कित्येक वर्षांपासून गावकऱ्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागायची. पण जवळपास तीन दशकांच्या अथक मेहनतीनंतर गावकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न सुटला. कोणे एकेकाळी गावकऱ्यांनी ज्या शामलाल यांना वेडं ठरवलं ते आता या गावचे ‘हिरो’ ठरले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 12:37 pm

Web Title: 42 year old chhattisgarh man digs pond for last 27 years
Next Stories
1 … आणि प्रणव मुखर्जींनाही सेल्फी काढण्याचा मोह अनावर
2 मुंबईत पावसाच्या पाण्यात सापडले ‘हे’ प्राणी
3 माश्या कधीच झोपत नाहीत, तर डॉल्फिन एक डोळा उघडा ठेवूनच झोपतो
Just Now!
X