दररोज व्यायाम करणे शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी गरजेचे आहे. पण अनेक तरूण व्यायामापासून दूर पळतात. त्यांना व्यायाम नको वाटतो. पण पाच वर्षाच्या एका चिमुकल्याचा कारनामा पाहून तुम्हाला धक्का बसेल. पाच वर्षाच्या चिमुकल्याने १०० किंवा २०० नव्हे तर ४,१०५ पुश-अप मारले आहेत. हे पुश-अप त्याने दोन तास आणि २५ मिनीटामध्ये मारले आहेत.

पाच वर्षाच्या मुलाच्या या प्रेरणादायी कामगिरीमुळे खूश होऊन रशियन लष्करातील लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने त्याला चक्क मर्सिडीज गिफ्ट केली आहे. या मर्सिडीजची किंमत तब्बल २६ लाख रूपये आहे. दोन तासात चार हजार पुश-अप काढणाऱ्या चिमुकल्याचे नाव राखीम कुरायव असे आहे. लहानपणापासूनच राखीम कुरायव याला व्यायामाचा छंद आहे.
मर्सिडीज गिफ्ट करताना लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने चिमुकल्याला खास संदेशही दिला आहे. यामध्ये ते म्हणातात, ‘ तू ही कार आपल्या वडिलांना चालवायला दे. तू यामध्ये आरामत बस. तू जी कामगिरी केली ती कौतुकास्पद आहे. तू या महागड्या गाडीचा हकदार आहे. आपण आता फिटनेस सेंटरमध्ये भेटूयात आणि सोबत व्यायाम करूयात.’ लेफ्टिनेंट रमजान कद्दरोवने मर्सिडीज गिफ्ट केल्यानंतर राखीम कुरायव म्हणाला की, ‘ ही गाडी माझे वडिल चालवतील. मला जिममध्ये सोडण्यासाठी आता वडिलांना टॅक्सी घ्यावी लागणार नाही. ‘

राखीम कुरायवने ४,१०५ पुश-अप मारत जागतिक विक्रम केला आहे. पण व्हिडीओची क्वॉलिटी खराब असल्यामुळे नाकारण्यात आले. पण मर्सिडीज गिफ्ट मिळाल्यामुळे राखीम कुरायवचे कुटुंबीय आनंदात आहे.