50th Anniversary of the Moon Landing Google Doodle: अमेरिकेने चंद्रावर ‘अपोलो- ११’ हे समानव अवकाशयान पाठविल्याच्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. चंद्रावर मानवाने पहिलं पाऊल ठेवल्याच्या सुवर्णयोगाचं गुगलने डुडलच्या माध्यमातून खास सेलिब्रेश केले आहे. डूडलमध्ये असणाऱ्या प्ले बटणावर क्लिक केल्यास ‘अपोलो-११’च्या चंद्रमोहिमेच्या प्रवासाची सर्व माहिती मिळते.

डूडलमधील साडेचार मिनिटांच्या अॅनिमेटेड व्हिडिओत आपल्याला अपोलो ११ चा प्रवास पहायला मिळतो. या व्हिडीओमध्ये मायकल कोलिन्स यांच्या आवाजामुळे या मिशनमधील महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मिळते. नासाच्या मिशनमध्ये मायकल कोलिन्स यांनी कंमाड मॉड्युल्डला चंद्रावर नेले होते. नील आर्मस्ट्राँग आणि एडविन बज एल्ड्रीन हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले होते.

अपोलो अभियानाचे साध्य

अपोलोच्या एकूण अवकाश मोहिमेकरता जवळजवळ ३० अब्ज डॉलर्स एवढा खर्च आला. चंद्राची वारी केलेल्या या १२ अंतराळवीरांनी मिळून सुमारे ३६५ किलो वजनाचे चंद्रावरील मातीचे आणि खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले. अनेक देशांच्या वस्तुसंग्रहालयांना तसेच वैज्ञानिक प्रयोगशाळांना अभ्यासासाठी आणि लोकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी त्यातले काही तुकडे भेट म्हणून देण्यात आले. भूगर्भशास्त्रज्ञांसाठी ही एक पर्वणीच होती. अमेरिकेच्या ‘अपोलो’नंतरच्या अवकाश अभियानासाठी- म्हणजे ‘स्कायलॅब’ या अवकाशस्थानकासाठी (स्पेस स्टेशन) अपोलो यानाकरिता विकसित केलेल्या घटकांचा खूपच उपयोग झाला.

इतिहास –
केप कॅन्व्हेरलवरून १६ जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्राँग, एड्विन (बझ) ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या तीन अवकाशवीरांसह ‘अपोलो- ११’ यानाने चंद्राकडे झेप घेतली. तीन दिवसांनंतर १९ जुलै रोजी चंद्राभोवतीच्या १०० कि. मी.च्या कक्षेत ठरल्याप्रमाणे ते फिरू लागले. भारतीय वेळेनुसार २१ जुलै रोजी तेराव्या प्रदक्षिणेदरम्यान नील आर्मस्ट्राँग आणि बझ ऑल्ड्रिन ‘ईगल’मध्ये (चंद्रावर उतरणाऱ्या घटकाचे नाव) बसले आणि ‘ईगल’ संचालक घटकापासून वेगळे झाले. या संचालक घटकाचे नामकरण ‘कोलंबिया’ असे करण्यात आले होते. तिसरा अंतराळवीर कॉलिन्स हा कोलंबियामध्येच थांबून पृथ्वीप्रदक्षिणा करीत राहिला. दोन तास नऊ मिनिटांनी ‘ईगल’ चंद्रावरील ‘सी ऑफ ट्रँक्विलिटी’ या पूर्वनियोजित जागेवर हळुवारपणे उतरले तेव्हा अवघे २५ सेकंदांचे इंधन शिल्लक राहिले होते. म्हणजे चंद्रावर उतरायला अर्ध्या मिनिटाचा जरी उशीर झाला असता तरी ‘ईगल’ चंद्रावर आदळून अंतराळवीरांवर मृत्यूचा प्रसंग ओढवला असता. त्यानंतर सुमारे सहा तासांनी तो ऐतिहासिक क्षण आला- ज्याची सबंध जग श्वास रोखून वाट पाहत होतं. ‘ईगल’चा दरवाजा उघडून शिडीच्या नऊ पायऱ्या उतरून नील आर्मस्ट्राँग या पृथ्वीवासीयाचे पहिले पाऊल चंद्राच्या भूमीवर पडले. त्याचे त्यावेळचे उद्गार होते : ‘माणसाचे एक छोटे पाऊल.. पण मानवजातीची एक प्रचंड झेप!’ हे त्याचे उद्गार अवकाश इतिहासात अमर झाले आहेत. जगातील लक्षावधी लोकांनी ही घटना टीव्हीवर पाहिली. त्यानंतर ऑल्ड्रिनही आर्मस्ट्राँगला येऊन मिळाला. दोघांनी मिळून २२ तास चंद्रावर घालविले.