चेन्नईत एका सात वर्षाच्या मुलाच्या तोंडातून डॉक्टरांनी चक्क ५२६ दात शस्त्रक्रिया करुन काढले आहेत. रवींद्रनाथ असं या मुलाचं नाव असून त्याचा उजवा गाल सुजला होता. सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांना दात खराब झाला असावा अशी शंका होती. पण जेव्हा दंतचिकित्सकांनी तपासून पाहिलं तेव्हा त्या छोट्या जबड्यात ५२६ दात होते. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन हे दात बाहेर काढले.

या दातांची वाढ झालेली नव्हती. जबड्याच्या हाडाशी जोडलेले हे दात बाहेरुन पाहिलं असता दिसत नव्हते. अखेर दंतचिकित्सकांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यावा लागला. शस्त्रक्रिया केल्यानंतर डॉक्टरांनी त्याचे योग्य स्थितीत असणारे २१ दात पुन्हा बसवले. बुधवारी जेव्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे पोहोचले तेव्हा रवींद्रनाथला वडिलांनी उचलून घेतलं होतं. आपल्या गालाला हात लावत आता दुखत नाही असं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.

सविता डेंटल कॉलेजमध्ये मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, “मुलाच्या आई-वडिलांना सर्जरीसाठी तयार करण्यास जास्त वेळ लागला नाही. पण मुलाने सहकार्य करावं यासाठी विद्यार्थ्यांना अनेक तास त्याच्याशी गप्पा माराव्या लागल्या”. रवींद्रनाथ तयार झाल्यानंतर लगेचच सर्जरी करत त्याचे दात काढण्यात आले. ही सर्जरी पाच तास सुरु होती.

यामागे नेमकं काय कारण होतं हे डॉक्टर सांगू शकले नाहीत. पण मोबाइल टॉवरच्या रेडिएशनमुळे हे झालं असावं किंवा अनुवांशिक असावं अशी शक्यता त्यांनी वर्तवली.