सहा वर्षाच्या चिमुरड्याने आठ वर्षांपूर्वी घडलेला चोरीचा गुन्हा उलगडला असून पोलिसांनाही आश्चर्यचकित केलं आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे ही घटना घडली आहे. क्नॉक्स असं या चिमुरड्याचं नाव असून आपल्या कुटुंबासोबत मासेमारी करण्यासाठी तो गेला होता. यावेळी चुंबकाच्या आधारे तो तलावाच्या तळाशी असणाऱ्या धातूच्या गोष्टींचा शोध घेता होता. लॉकडाउनमुळे वेळ घालवण्यासाठी आपण येथे आलो होतो असं कुटुंबाने सांगितलं आहे.

यावेळी चिमुरड्याने समुद्रात चुंबक टाकलं असताना एक जड वस्तू त्याला चिकटली असल्याचं त्याच्या लक्षात आलं. तिथे उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीच्या सहाय्याने मुलाने ती वस्तू बाहेर काढली. यावेळी हा एक लॉकबॉक्स असल्याचं लक्षात आलं. बॉक्स उघडून पाहिलं असता त्याच्यात दागिने, क्रेडिट कार्ड, चेकबूक असल्याचं समोर आलं.

यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांना यासंबंधी कळवलं. पोलिसांनी तपास केला असता या सर्व वस्तू तिथेच जवळ राहणाऱ्या एका महिलेच्या असल्याचं सांगितलं. आठ वर्षांपूर्वी या महिलेच्या घऱी चोरी झाली होती. अनेक महागड्या वस्तू यामधून गायब असल्या तरी हा शोध महत्त्वाचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी महिलेला हा बॉक्स सोपवला असता तिच्या भावना अनावर झाल्या. या बॉक्सचा शोध लावल्याबद्दल महिलेने चिमुरड्याचे आभार मानले आहेत.