एक वयस्कर महिला रुग्ण मेंदूची शस्त्रक्रीया सुरु असताना स्वयंपाकाची तयारी करत होती असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र इटलीमध्ये खरोखरच अशा प्रकार घडला आहे. येथील एका ६० वर्षीय महिलेची ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रीया सुरु असतानाच ती चक्क स्टफ ऑलीव्ह बनवत होती. या महिलेने शस्त्रक्रीया पूर्ण होईपर्यंत एका तासामध्ये ९० स्टफ ऑलिव्ह तयार केल्याचे इटलीमधील वृत्तसंस्था ‘अनसा’ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती या महिलेवर उपचार करणारे अँकोना हॉस्पिटलमधील न्यूरो सर्जन रॉबर्टो त्रिगानी यांनी सांगितले. “सर्वकाही अगदी नियोजित पद्धतीने घडलं,” असं रॉबर्टो यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सध्या ट्विटरवर या शस्त्रक्रीयेची तुफान चर्चा आहे. एकीकडे डॉक्टर या वृद्ध महिलेचा ब्रेन ट्यूमर काढण्याची शस्त्रक्रीया करत असतानाच दुसरीकडे ही महिला बेडवर पडून ऑलिव्हमध्ये सारण भरण्याचं काम करताना दिसत आहे. “तुम्ही स्वयंपाक घरात चांगलं काम करु शकता असं तुम्हाला वाटत असेल तर या ६० वर्षीय महिलेकडे बघा. या महिलेने एका तासामध्ये ९० अस्कोलीक ऑलिव्हस तयार केले. या महिलेच्या मेंदूच्या डाव्या बाजूला असलेल्या ट्यूमरवर शस्त्रक्रीया सुरु असताना तिने हे काम केलं,” अशा कॅप्शनसहीत एका व्यक्तीने हा फोटो  शेअर केला आहे.

हे ट्विट व्हायरल झालं असून एक हजारहून अधिक जणांनी ते रिट्विट केलं आहे. तर सात हजारहून अधिक जणांनी ते लाइक केलं आहे.

नक्की वाचा >> सलाम! लॉकडाउनमुळे निराधार झालेल्या रुग्णाला डॉक्टरने स्वत:च्या हाताने भरवलं जेवण

काय म्हणतात या शस्त्रक्रीयेला आणि ती अशापद्धतीने का करतात?

रॉबर्टो यांनी अशाप्रकारे ६० हून अधिक शस्त्रक्रीया केल्या आहेत. या शस्त्रक्रीयांदरम्यान रुग्ण त्याच्या आवडीचे काम करत असताना त्याच्यावर शस्त्रक्रीय करतात. यामुळे आम्हाला रुग्णाच्या मेंदूमधील हलचालींवर लक्ष ठेवता येतं, असं डॉक्टर सांगतात. सामान्यपणे अशा वेळी रुग्ण गाणं गातो किंवा एखादे वाद्य वाजतो. अशा पद्धतीच्या शस्त्रक्रीयांना अवेक सर्जरी असं म्हणतात. मेंदूशी संबंधित अनेक आजारांमध्ये अशासप्रकारची शस्त्रक्रीया केली जाते. सामान्यपणे ऐकणे, बोलणे आणि दिसण्याशी संबंधित असलेल्या मेंदूच्या भागांवर शस्त्रक्रीया करताना या पद्धतीचा अवलंब केला जातो. अनेकदा रुग्णाला काहीच करण्याची इच्छा नसली तर डॉक्टर या रुग्णाशी गप्पा मारत शस्त्रक्रीया करतात.